देशातील शहरांना यंदाच्या उन्हाळ्यात वाढलेल्या आर्द्रतेसह दिवसा उष्णतेच्या झळांचा आणि उष्ण रात्रींचा सामना करावा लागला. त्याचे परिणाम किती गंभीर आहेत, त्या विषयी…
यंदाच्या उन्हाळ्यात नेमके काय झाले?
दिल्लीस्थित सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हायर्न्मेंट (सीएसई) या संस्थेने यंदाच्या उन्हाळ्याविषयी एक अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यात देशभरात यंदा कडक उन्हाळा जाणवल्याचे म्हटले आहे. प्रामुख्याने राजस्थान, पंजाब, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश आणि विदर्भाने यंदा उष्णतेच्या लाटांचा सामना केला. एकीकडे पश्चिमी विक्षोपामुळे म्हणजे उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे आणि स्थानिक पातळीवरील तापमानवाढीमुळे दिवसा तापमानात वाढ होत होती आणि दुसरीकडे रात्रीही तापमान फारसे कमी होत नव्हते. रात्रीही असह्य उकाड्याचा नागरिकांनी सामना केला. शहरांत प्रामुख्याने तापमानवाढ आणि उकाड्याचा त्रास जाणवला. शहरांमधील वाढते काँक्रीटीकरण आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे रात्रीही उकाडा जाणवत असल्याचे दिसून आले. ‘सीएसई’ने पुणे, दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बेंगळूरु आणि चेन्नई या शहरांतील जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२४ या काळातील उन्हाळ्यातील हवेचे तापमान, जमिनीचे तापमान आणि आर्द्रतेच्या माहितीचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण: या वीकेण्डला मुंबईत तब्बल ९३० उपनगरीय गाड्या रद्द; रेल्वे प्रवाशांनी नेमकी काय काळजी घ्यावी?
उष्णतेसह हवेतील आर्द्रताही का वाढली?
तापमानवाढ झालीच. पण, त्या सोबत हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढल्याचे दिसून आले आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे सामान्यपणे आर्द्रतेेचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरतात. आर्द्रता वाढल्यामुळे रात्रीचे तापमान दमट राहून त्यात किरकोळ घटही होऊ शकली नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. अपवाद वगळता शहरांतील आर्द्रतेच्या प्रमाणात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. केवळ वृक्षलागवड करून रात्रीची उष्णता कमी होणार नाही, असेही अहवालात म्हटले आहे. अतिउष्ण किंवा उष्ण रात्रींमुळे भविष्यात मृत्यूचा धोका सहा पटींनी वाढू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांत आर्द्रतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २००१ ते २०१० च्या तुलनेत २०२३ मध्ये मोसमी पावसाच्या आगमनापूर्वी आर्द्रतेच्या प्रमाणात २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२३ मध्ये मोसमी पावसाच्या आगमनापूर्वी आर्द्रतेचे प्रमाण ४९.१ टक्क्यांवर गेले होते. मोसमी पावसाच्या काळात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण सरासरी ७३.२ टक्के असते. तापमान आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे मानवाच्या शरीरातून घामावाटे पाण्याचे वेगाने उत्सर्जन होते. नैसर्गिकरीत्या शरीर थंड होत नाही. त्यामुळे नागरिकांना अस्वस्थ वाटते.
हेही वाचा >>> विश्लेषण : राज्याच्या अभ्यासक्रम आराखड्यात नेमके काय आहे?
अहवालातील ठळक निरीक्षणे काय?
दिवसाच्या तापमानाच्या तुलनेत रात्रीच्या तापमानात फारशी घट होत नाही. कोलकातामध्ये सर्वाधिक काँक्रीटीकरण होऊन वृक्षांची संख्या कमी झाली. दिल्लीत अन्य शहरांच्या तुलनेत कमी काँक्रीटीकरण झाले, हरित कवचही अन्य शहरांच्या तुलनेत जास्त आहे. गेल्या दोन दशकांत मुंबई, कोलकाता आणि चेन्नईत बाधकाम क्षेत्र दुप्पट झाले आहे. देशातील शहरांमधील वृक्षांची संख्या १४ टक्क्यांनी घटल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. दिल्लीबाबतचे दिवसाच्या तापमानाच्या तुलनेत रात्रीच्या तापमानात फारशी घट होत नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. बेंगळूरुचा अपवाद वगळता शहरांतील आर्द्रतेचे प्रमाण वाढतच आहे. २००१ ते २०१० च्या तुलनेत यंदा हैदराबादमध्ये आर्द्रतेचे प्रमाण दहा टक्क्यांनी वाढले. दिल्लीत आठ टक्क्यांनी, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईत २५ टक्क्यांनी आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. दिल्लीत दिवसाच्या तापमानाच्या तुलनेत पारा १२.२ अंशांनी खाली जात होता. यंदा तो फक्त ८.५ अंशांनी खाली जात आहे.
तापमानवाढ, आर्द्रता वाढीचे परिणाम काय?
तज्ज्ञांच्या मतानुसार, तापमानवाढ, आर्द्रता वाढीमुळे आरोग्याच्या समस्या गंभीर होऊ शकतात. लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. गर्भवती महिलांना जास्त त्रास होतो. ज्येष्ठ नागरिकांना उष्माघाताचा त्रास होतो. ‘युनिसेफ’च्या माहितीनुसार, जास्त उष्णतेमुळे लहान मुलांच्या बौद्धिक विकासावर परिणाम होतो. नवीन ज्ञान ग्रहण करणे, लक्षात ठेवणे किंवा स्मरणात ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. लहान मुलांच्या शरीराचे तापमान वाढल्यामुळे हृदयाचे ठोके वेगाने पडतात, डोकेदुखी वाढते, अंगदुखी वाढते. अनेकदा लहान मुले बेशुद्धही पडतात. ज्येष्ठ नागरिक किंवा वृद्धांचे शरीर थकलेले असल्यामुळे बदलत्या तापमानानुसार त्यांच्या शरीरात आवश्यक ते बदल होत नाहीत. त्यामुळे त्यांना उष्माघाताला सामोरे जावे लागते. गर्भवती महिलांमध्ये मुदतपूर्व प्रसूती किंवा गर्भातच बाळाचा मृत्यू होण्याच्या घटना वाढतात.
dattatray.jadhav@expressindia.com