आसिफ बागवान
सध्या महाराष्ट्रासह पश्चिम भारतात उष्णतेची लाट सुरू आहे. अनेक ठिकाणी पारा चाळिशीच्या पुढे उसळी मारू लागला आहे. अशा उकाड्यात मानवी जीव जिथे कासावीस होतो तिथे स्मार्टफोनसारख्या गॅजेटचे काय? स्मार्टफोन तापण्याची समस्या तशी बारमाही. मोबाइल सतत कार्यरत राहिला की तो तापणे स्वाभाविकच. पण सध्याच्या चाळिशीपार तापमानात स्मार्टफोन गरम होण्याची समस्या तीव्र होऊ लागली आहे. एवढेच नव्हे तर स्मार्टफोनचे चार्जिंगही मंदावल्याचे दिसून येत आहे. यामागे नेमकी कारणे काय आणि ही समस्या टाळण्यासाठी काय करता येईल, हे सांगण्याचा प्रयत्न…
वाढत्या तापमानाचा स्मार्टफोनवर परिणाम काय?
कोणतेही गॅजेट सुसंगत तापमानात कार्यक्षम असते. उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेरील वातावरणात उष्णता वाढत असल्याने स्मार्टफोनचे तापमानही वाढते. अशा वेळी व्हॉट्सॲपवरील मेसेजची देवाणघेवाण करताना किंवा अगदी वेब ब्राऊजरवरून इंटरनेट हाताळत असतानाही फोन तापतो. स्मार्टफोनना अधिकाधिक कार्यक्षम ठेवण्यासाठी त्यात अधिकाधिक ऊर्जा वापरावी लागते. त्यामुळे एकाच वेळी अनेक ॲपचा वापर सुरू असल्यास फोन तापतो. त्यातच उन्हाळ्यात वाढलेल्या बाह्य तापमानामुळे स्मार्टफोन अधिक लवकर गरम होतो.
उन्हाळ्यात चार्जिंग मंद होण्याची कारणे काय?
स्मार्टफोन तापण्याची समस्या तशी सामान्य आहे. अर्थात उच्च दर्जाच्या स्मार्टफोनमध्ये ही समस्या कमी जाणवते. मात्र, हे एखाद्या वाहनाच्या इंजिनाप्रमाणे आहे. इंजिन सुरू असते तेव्हा त्यातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा उत्पन्न होते. त्यामुळे ते तापते. स्मार्टफोनच्या बाबतही तेच घडते. अनेकदा स्मार्टफोन प्रमाणापेक्षा अधिक तापून त्याचा स्फोट होणे, त्यात बिघाड होणे असे प्रकार घडतात. याला आवर घालण्यासाठी स्मार्टफोनचे तंत्रज्ञान स्वत:च एक संरक्षण व्यवस्था उभी करते. ही यंत्रणा फोन एका विशिष्ट तापमानापेक्षा अधिक तापू न देण्यासाठी काम करते. फोनचे चार्जिंग उन्हाळ्यात मंदावण्याचे कारण ही यंत्रणाच आहे. अलीकडे सर्वच स्मार्टफोनचे चार्जर वेगाने बॅटरी चार्ज करणारे असतात. स्मार्टफोन चार्ज होत असताना चार्जर वेगाने फोनमध्ये ऊर्जा फेकत असतात. त्यातून उष्णताही उत्सर्जित होते. त्यामुळे फोनचे तापमान वाढते. स्मार्टफोनमधील सेन्सर या तापमानाची नोंद घेत असतो. जेव्हा तापमान मर्यादेपेक्षा जास्त वाढते. तेव्हा हा सेन्सर एकतर चार्जिंगचा वेग कमी करतो किंवा चार्जिंग पूर्णपणे बंद करतो.
हेही वाचा >>> एटीएमचा नवा कार्ड ट्रॅप घोटाळा; कफल्लक व्हायचं नसेल तर हे वाचाच
फोन कमी तापण्यासाठी काय करू शकतो?
स्मार्टफोनचे तापणे ही नियमित प्रक्रिया असली तरी, त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य असते. सर्वप्रथम फोन तापत असल्यास आपल्या स्मार्टफोनच्या बॅकग्राऊंडला सुरू असलेले अनावश्यक ॲप बंद करणे आवश्यक आहे. आपण एकाच वेळी अनेक ॲप हाताळत असतो. एकामागून एक ॲप चालवत असताना आपल्या स्क्रीनवर एकच ॲप दिसते. मात्र, आधी हाताळलेली ॲप्स स्मार्टफोनच्या यंत्रणेत सुरूच असतात. ही ॲप बंद केल्यास त्यासाठी वापरली जाणारी ऊर्जा आणि त्यातून उत्सर्जित होणारी उष्णता कमी होते. कॅमेरा, व्हिडीओ काढणारे इतर ॲप एकाच वेळी जास्त वेळ सुरू ठेवल्यानेही फोन अधिक तापतो. त्यामुळे आपल्या फोनच्या क्षमतेनुसार हे ॲप हाताळावेत. थेट सूर्यप्रकाशात स्मार्टफोनचा वापर टाळावा. अलीकडे सर्वच कंपन्या उठावदार डिस्प्ले असलेले स्मार्टफोन बनवतात. हे डिस्प्लेही मोठ्या प्रमाणात ऊर्जा वापरतात. अशा वेळी प्रखर सूर्यप्रकाशात त्यांचे तापमान अधिक वाढण्याची शक्यताही असते.
फोन तापत असल्यास काय करावे?
चार्जिंग सुरू असताना मोबाइल वापरणे टाळायलाच हवे. चार्जिंगमुळे मोबाइलमधून उष्णता उत्सर्जित होत असताना फोनचा वापर केल्यास उष्णता उत्सर्जित होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे फोन लवकर तापण्याचा धोका संभवतो. विशेषत: चार्जिंग सुरू असताना मोबाइल गेम खेळणे, कॅमेऱ्याचा वापर करणे आदी गोष्टी टाळल्या पाहिजेत. मात्र, तरीही फोन तापत असल्यास फोनच्या चार्जरची तपासणी करणे आवश्यक आहे. वायरलेस चार्जिंगदरम्यान उष्णता निर्माण होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे फोन तापत असल्यास वायरलेस चार्जिंगऐवजी नियमित चार्जरचा वापर करणे कधीही चांगले. स्मार्टफोनमध्ये बॅटरीची स्थिती तपासण्याची सुविधा असते. त्यात आपल्या फोनची बॅटरी किती सक्षम आहे, हे दिसते. ते अधूनमधून पाहणे आवश्यक आहे.