एकेकाळी राज्य दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) काम करणे प्रतिष्ठेचे होते. पण राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) स्थापनेनंतर एटीएसचे महत्त्व कमी झाले. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुख पदी नवल बजाज यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. एटीएसला गतवैभव प्राप्त करून देण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे.
एटीएस पथकाची पार्श्वभूमी काय?
राज्यात दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना २००४मध्ये करण्यात आली. त्यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी असलेले के. पी. रघुवंशी या पथकाचे प्रमुख होते. एटीएसने २००६मध्ये औरंगाबाद, परभणी, बीड, मालेगाव, पुणे आदी जिल्ह्यांत छापे टाकून एके-४७ रायफल, हॅण्डग्रेनेड, पिस्तुल, आरडीएक्सचा मोठा साठा जप्त केला होता. या प्रकरणात अनेकांना अटक केली होती. ११ जुलै २००६ रोजी मुंबई लोकलगाड्यांत ७ बॉम्बस्फोट झाले होते. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात १३ अतिरेक्यांना अटक केली, तर एका पाकिस्तानी अतिरेक्याला अँटॉप हिल येथे चकमकीत ठार केले. २९ सप्टेंबर २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोटात ११ जणांना अटक केली होती. या कारवाईबाबत अनेक वादही निर्माण झाले. मुंबईतील २०१३ मधील तिहेरी बॉम्बस्फोटांचा गुंताही एटीएसने सोडवून इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित अनेकांना अटक केली. दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या या यंत्रणेला एक प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. केंद्रीय गुप्तहेर यंत्रणांशी समन्वय साधून तसेच बऱ्याच अंशी स्थानिक पातळीवरून माहिती गोळा करून एटीएस पथक काम करत होते.
हेही वाचा >>> खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंग घातल्यास जन्मठेप; कर्नाटक सरकारने घेतलेला निर्णय नेमका काय आहे?
केंद्राचा वाढता हस्तक्षेप?
बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (यूएपीए), स्फोटकांच्या प्रकरणांचा देशभरातील तपास एका संस्थेमार्फत व्हावा व संस्थेचा केंद्रीय गुप्तहेर यंत्रणांशीही चांगला समन्वय असावा या कारणामुळे पुढे दहशतवादाशी संबंधित प्रकरणे एनआयएला दिली जाऊ लागली. परिणामी एटीएसचे महत्त्व कमी झाले. केवळ स्थानिक पातळीवर दहशवादाशी संबंधित गुप्त माहिती गोळा करणारी संस्था म्हणून एटीएसचे काम मर्यादित राहिले. मागील काही दिवसांमधील एटीएसची कारवाई पाहिल्यास हत्यारे जप्ती, बांगलादेशी नागरिकांना अटक, अमली पदार्थविरोधी कारवाया, हत्येप्रकरणी सुरेश पुजारी या गुंडाचा ताबा, उत्तर प्रदेशातील सीमकार्ड प्रकरणातील आरोपीला अटक, मनसुख हिरेन हत्येचा तपास अशा प्रकारचे गुन्हे या पथकाकडून सोडवण्यात आले आहेत. त्यामुळे दहशवादी व दहशतवादाचा बिमोड करणाऱ्या यंत्रणेला इतर कारवाया करणे व केवळ गुप्त माहिती गोळा करणे अशा जबाबदाऱ्या गेल्या काही वर्षांत दिल्या जात आहेत. संवेदनशील गुन्ह्यांचा तपास एनआयएकडे सोपवला जात आहे. कल्याणमधील २०१४ सालातील आयसिस प्रकरण, २०१५ मधील मालवणीतील प्रकरण काही दिवसांतच एटीएसकडून काढून एनआयएकडे देण्यात आले होते. अँटिलियाजवळ सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरणही एटीएसकडून काढून एनआयएकडे देण्यात आले होते. एटीएसने गेल्या काही वर्षांमध्ये हनी ट्र्रॅपमध्ये अडकलेल्या नौदल व माझगाव डॉक येथील कर्मचाऱ्यांना अटक केले आहे. तसेच आयसिस विरोधात महत्त्वाची कारवाईही केली होती.
एटीएसचे नवे प्रमुख कोण?
वरिष्ठ पोलीस अधिकारी नवल बजाज यांची राज्याच्या पोलीस दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदानंद दाते हे प्रतिनियुक्तीवर केंद्रात गेल्यामुळे मार्च महिन्यापासून हे पद रिक्त होते. १९९५ तुकडीचे पोलीस अधिकारी असलेले नवल बजाज केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. त्यावेळी ते केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) सहसंचालक होते. त्यापूर्वी बजाज केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महानिरीक्षक पदावर कार्यरत होते. ते राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेतही अतिरिक्त महासंचालक पदावर कार्यरत होते. त्याशिवाय अतिरिक्त पोलीस आयुक्त विशेष शाखा अशा महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. सीबीआयमध्ये सहसंचालक म्हणून कोळसा घोटळ्याचा तपास नवल बजाज यांनी केला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा महाराष्ट्रात परत पाठवण्यात आले होते. लोकसभेच्या आचारसंहितेमुळे त्यांना नियुक्ती मिळाली नव्हती. अखेर त्यांची एटीएसच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> ब्लड मनी म्हणजे काय? या इस्लामिक कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा कशी रद्द होते?
एटीएसपुढील आव्हाने कोणती ?
दहशतवादाच्या वाढत्या धोक्याला प्रतिसाद देण्यासाठी भारतात दहशतवादविरोधी पथकाची स्थापना करण्यात आली. भारतात अनेक वर्षांपासून दहशतवाद हा एक प्रमुख चिंतेचा विषय आहे. एटीएस दहशतवाद, नक्षलवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या इतर गंभीर गुन्ह्यांचा तपास करते. यामध्ये गुप्त माहिती गोळा करणे आणि त्याचे विश्लेषण करणे, पुरावे गोळा करणे आणि जतन करणे, चौकशी आणि अटक करणे यांचा समावेश आहे. तसेच एटीएस गुप्त माहिती गोळा करून, पाळत ठेवून आणि दहशतवादी गट आणि गुन्हेगारी संघटनांच्या कारवायांमध्ये व्यत्यय आणून दहशतवाद आणि इतर गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी कार्य करते. पण पोलीस दलातील इतर विभागांप्रमाणे एटीएसमध्येही संख्याबळ अपुरे आहे. अशा समस्यांवर मात करून महत्त्वपूर्ण कारवाया करण्याचे महत्त्वाचे आव्हान एटीएस प्रमुखांपुढे आहे.