देशाचा उसाचा गळीत हंगाम मेअखेर संपला. देशाची गरज पूर्ण होण्याइतके साखरेचे उत्पादन झाले आहे का? साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात नेमकी कशी स्थिती राहिली. त्या विषयी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हंगामात ऊस गाळपाची स्थिती काय?

देशातील यंदाचा उसाचा गळीत हंगाम मेअखेर संपला आहे. देशभरात मेअखेर सुमारे ३१३७ लाख टन उसाचे गाळप होऊन, ३१६ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा १७९ लाख टनांनी गाळप कमी झाले आहे. महाराष्ट्रात मात्र १६ लाख टनांनी उसाचे गाळप वाढले. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये १,०९१ लाख टन उसाचे गाळप झाले होते; तेथे यंदा अपुरा पाऊस, रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ९७७ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. कर्नाटकात गेल्या वर्षी ५८० लाख टनांचे गाळप झाले होते, यंदा ५६५ लाख टनांवर आले. गुजरातमध्येही उसाचे गाळप ९५ लाख टनावरून ८९ लाख टनांवर आले आहे. आंध्र प्रदेशातही दोन लाख टनांची घट झाली आहे.

हेही वाचा >>> विमान प्रवासादरम्यान मद्यसेवन का टाळावं?

देशाचे साखरेचे किती उत्पादन झाले?

तमिळनाडूतील केवळ तीन कारखान्यांचा अपवाद वगळता देशभरातील ५३१ कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. मेअखेर देशात एकूण ३,१३७.८० लाख टन उसापासून ३१६.७० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऊस गाळप १७९ लाख टनांनी आणि साखरेचे उत्पादनही १० लाख टनांनी घटले आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात आघाडीवर असून, राज्यात ११०.२० लाख टन साखर उत्पादन झाले. उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर असून, १०३.६५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. त्या खालोखाल कर्नाटकात ५२.६०, गुजरातमध्ये ९.२०, तमिळनाडूत ८.८५, बिहारमध्ये ६.८५, पंजाबमध्ये ६.२०, हरियाणात ५.९०, मध्य प्रदेशात ५.२०, उत्तराखंडमध्ये ३.१०, आंध्र प्रदेशात १.६० व उर्वरित राज्यांत १.५० लाख टन साखर, असे एकूण ३१६.७० लाख टन उत्पादन झाले. कर्नाटक, तमिळनाडूत काही कारखाने ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये गाळप हंगाम सुरू करतात. त्यामुळे सप्टेंबरअखेर देशपातळीवर एकूण ३२१.२५ लाख टन इतके निव्वळ साखर उत्पादन होणे अपेक्षित आहे.

इथेनॉल निर्मितीची स्थिती काय?

उसाच्या मागील गळीत हंगामात सुमारे ४१ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्यात आली. यंदा २०२३-२४ मध्ये ४५ लाख टन साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी उपयोग केला जाण्याचा अंदाज होता. पण साखरटंचाईच्या भीतीने केंद्र सरकारने प्रथम १७ लाख टन साखरेपासून इथेनॉल उत्पादनाची परवानगी दिली. त्यात वाढ होऊन हंगामअखेर सुमारे २१ लाख टन साखरेचा उपयोग इथेनॉल निर्मितीसाठी होण्याचा अंदाज आहे. केंद्राच्या इथेनॉल प्रोत्साहन धोरणांमुळे देशभरातील साखर कारखान्यांनी मोठ्या क्षमतेचे आणि मोठे प्रकल्प उभारणीला सुरुवात केली होती. निर्बंधांमुळे हे कारखाने आर्थिक अडचणीत आले आहेत.

हेही वाचा >>> Indo-China relations:अरुणाचल प्रदेश आणि चीनची रणनीती; तिबेटच्या माध्यमातून भारताचे प्रत्युत्तर, चर्चा नेमकी काय?

केंद्र साखर निर्यातीला परवानगी देणार?

इंडियन शुगर अँड बायो- एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) २०२३-२४ हंगामातील साखर उत्पादनाचा अंदाज घेऊन चालू हंगामात २० लाख टन साखर निर्यात करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. देशांतर्गत उत्पादन ३२० टनांवर जाण्याचा इस्माचा अंदाज असून, देशांतर्गत साखर वापर आणि इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामसाठी पुरेसा साठा आहे. निर्यातीतून कारखान्यांना आर्थिक दिलासा मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले देणे शक्य होईल, असेही इस्मा, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने म्हटले आहे.

महाराष्ट्रातील हंगामाची स्थिती काय?

राज्यात यंदा १०३ सहकारी व १०४ खासगी साखर कारखान्यांनी १०७३ लाख टन उसाचे गाळप करून ११० लाख टन साखरेचे उत्पादन घेतले. कारखान्यांनी सरासरी दैनंदिन नऊ लाख टन क्षमतेने १०७३.९८ लाख टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.२७ टक्के साखर उताऱ्याने ११० लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. मागील वर्षी १०५५ लाख टन उसाचे गाळप करून ९.९८ टक्के साखर उताऱ्याने १०५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. साखर विभागनिहाय कोल्हापुरात सर्वाधिक २८ लाख टन, पुण्यात २५ लाख टन, सोलापुरात २० लाख टन आणि नगर विभागात १४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. कोल्हापुरात सर्वाधिक ११.५९ टक्के, पुण्यात १०.५४ टक्के, सोलापुरात ९.४ आणि नगरमध्ये ९.९८ टक्के साखर उतारा मिळाला. हंगामाच्या सुरुवातीस राज्यात ९० लाख टन उत्पादनाचा अंदाज होता. पण, अवकाळी पावसामुळे राज्यभरात उसाची चांगली वाढ झाली. हंगामअखेर आता ११० लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

dattatray.jadhav @expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis sugarcane crushing season for india in fy 24 zws