अमोल परांजपे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्रिटनमध्ये या वर्षअखेरीस किंवा २०२५च्या सुरुवातीला पार्लमेंटच्या कनिष्ठ सभागृहासाठी (हाऊस ऑफ कॉमन्स) निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीपूर्वी आजवरचे सर्वात मोठे सर्वेक्षण अलीकडेच झाले. त्याचे निष्कर्ष सत्ताधाऱ्यांसाठी अनुकूल नाहीतच, पण पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासाठी तर ते प्रचंड घातक आहेत. हे निष्कर्ष काय, त्याचा ब्रिटन आणि पर्यायाने युरोपवर काय परिणाम होईल, आगामी काळात या देशाचे राजकारण कसे राहील, याचा हा आढावा…

सर्वेक्षणातील ठळक मुद्दे कोणते?

ब्रिटनमध्ये अवघ्या आठ-नऊ महिन्यांत होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी ‘बेस्ट फॉर ब्रिटन’ या स्वयंसेवी संस्थेसाठी ‘सर्वेशन’ या संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. देशभरातील १५,०२९ नागरिकांकडून भरून घेण्यात आलेल्या प्रश्नावलीच्या आधारे झालेले हे सर्वेक्षण आजवरचे सर्वांत मोठे असल्याचा दावा या संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार विरोधी मजूर पक्षाला (लेबर पार्टी) ६५० जागांपैकी तब्बल ४६८ जागांवर विजय मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेली १४ वर्षे सलग सत्तेत असलेल्या हुजूर पक्षाला (कन्झर्व्हेटिव्ह पार्टी) १०० जागाही जिंकता येणार नाहीत, असा अंदाज या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. मजूर पक्षाला ‘हुजुरां’पेक्षा १९ टक्के जास्त, ४५ टक्के मते मिळतील, असे हे सर्वेक्षण सांगत आहे. मागच्या वेळी झालेल्या सर्वेक्षणापेक्षा ही टक्केवारी तिप्पट आहे, हे विशेष. या सर्वेक्षणाचे अंदाज खरे ठरले, तर मजूर पक्षाकडे २८६ जागांचे घसघशीत बहुमत असेल आणि ब्रिटिश लोकशाहीच्या इतिहासात हुजूर पक्षासाठी हा आजवरचा सर्वात मोठा पराभव ठरेल.

हेही वाचा >>> रेडीरेकनर वाढीला निवडणुकीची वेसण; घरांच्या किमती घटणार? रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवर काय परिणाम?

पंतप्रधान सुनकदेखील पराभवाच्या छायेत?

हुजूर पक्षामागे लागलेले शुक्लकाष्ठ या पराभवावर संपणारे नाही. सध्या पक्षाचे नेते असलेले पंतप्रधान ऋषी सुनक यांची जागाही धोक्यात असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. रिचमंड अँड नॉर्दलर्टन या त्यांच्या मतदारसंघात मजूर पक्ष आता केवळ २.४ टक्के मागे आहे. याचा अर्थ, सुनक यांची लोकप्रियता आपल्याच मतदारसंघात सातत्याने घटत असून त्यांना पराभवाचा धक्का बसू शकतो. ब्रिटनचे अर्थमंत्री (चान्सेलर ऑफ एक्सचेकर) जेरेमी हंट यांच्या गोडलमिंग अँड ॲश या नव्या मतदारसंघात लिबरल डेमोक्रेटिक पक्ष हुजूर पक्षाच्या केवळ १ टक्का पिछाडीवर आहे. विद्यमान सरकारमधील पहिल्या दोन मंत्र्यांच्याच विजयाची खात्री नसल्याचीही ब्रिटनच्या इतिहासातील पहिलीच घटना असावी. या सर्वेक्षणानुसार विद्यमान मंत्रिमंडळातील २८ जण निवडणूक लढण्याची शक्यता असून त्यातील केवळ १३ जणांच्या विजयाची शक्यता आहे.

सर्वेक्षणावर हुजूर पक्षातून प्रतिक्रिया काय?

माजी ‘ब्रेग्झिट’ सरचिटणीस आणि सुनक यांचे प्रमुख पक्षांतर्गत टीकाकार लॉर्ड डेव्हिड फ्रॉस्ट यांनी या परिस्थितीचे वर्णन ‘हताश’ असे केले आहे. एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत, जसजसा काळ पुढे सरकत आहे तसतशी परिस्थिती अधिक खराब होत चालल्याचे फ्रॉस्ट यांनी अधोरेखित केले. दुसरीकडे सुनक यांच्या पाठीराख्यांना त्यांच्या नेतृत्वालाच आव्हान दिले जाऊ शकेल, अशी भीती आहे. २ मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्था व महापौरपदाच्या निवडणुका होणार आहेत. यात पक्षाचा अपमानास्पद पराभव झाला, तर पक्षातील शांत झालेली बंडखोरी पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. या निवडणुका झाल्या, तर कनिष्ठ सभागृह विसर्जित होण्यापूर्वी हुजूर पक्षात पुन्हा एकदा नेतृत्वबदलाची मागणी जोर धरेल व सुनक यांना पायउतार व्हावे लागेल, अशी धास्ती त्यांच्या समर्थकांना सतावते आहे. मात्र त्यामुळे पक्षासमोर असलेले प्रश्न सुटणार की वाढणार, हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचा >>> तुमच्या म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट काय सांगते? म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट महत्त्वाची का?

धरसोड वृत्ती, प्रस्थापितविरोधी लाटेचा फटका?

२०१० पासून हुजूर पक्षाकडे बहुमताची सत्ता असतानाही या ना त्या कारणाने सातत्याने पंतप्रधान बदलण्यात आले. २००७ ते २०१० या कालावधीत गॉर्डन ब्राऊन हे मजूर पक्षाचे अखेरचे पंतप्रधान… त्यानंतरच्या १४ वर्षांत हुजूर पक्षाने डेव्हिड कॅमेरॉन, थेरेसा मे, बोरीस जॉन्सन, लिझ ट्रस आणि आता सुनक असे पाच पंतप्रधान दिले. यातील अखेरचे तिघे हे गेल्या पाच वर्षांतील बदल आहेत. ट्रस यांनी तर सर्वांत कमी, केवळ ५० दिवस ‘१० डाऊनिंग स्ट्रीट’वर राहण्याचा आगळा विक्रमही प्रस्थापित केला आहे. सातत्याने नेतृत्वबदल तसेच आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत धोरणांबाबत धरसोड वृत्ती दाखविल्यामुळे हुजूर पक्षाची लोकप्रियता आजवरच्या नीचांकावर पोहोचलेली आहे. परिणामी आगामी निवडणुकीत ब्रिटनमध्ये सत्तांतर होणे क्रमप्राप्त असले, तरी या ताज्या सर्वेक्षणानुसार घडले, तर हुजूर पक्षाला पुन्हा सत्तेत येण्यासाठी अपार कष्ट व दीर्घकालीन प्रतीक्षा करावी लागू शकते. amol.paranjpe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis survey in britain predict uk pm rishi sunak s seat at risk print exp zws