नागझिरा अभयारण्यात वर्षभरापूर्वी स्थलांतरित होऊन आलेल्या वाघाने नऊ वर्षांपूर्वीपासून नागझिऱ्यात स्थिरावलेल्या १२ वर्षांच्या ‘टी ९’ या वाघाला आणि एका बछड्याला मारल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.

नव्या वाघाच्या शोधासाठी कोणते प्रयत्न?

बारा वर्षांच्या ‘टी-९’ वाघाला आणि ‘टी-४’ या वाघिणीच्या बछड्याशी संघर्ष करून त्यांना ठार करणाऱ्या वाघाच्या शोधासाठी नागझिरा अभयारण्य प्रशासनाने ठिकठिकाणी ‘ट्रॅप कॅमेरे’ लावले आहेत. त्याचबरोबर गस्तीतदेखील वाढ केली आहे. कान्हा-पेंच कॉरिडॉरमधून तो आला स्थलांतर करून आल्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वाघ कोणत्या वनक्षेत्रातून आला आहे आणि त्याने कोणत्या ठिकाणी त्याचे वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे, हे ‘ट्रॅप कॅमेऱ्या’तून कळेल. ही माहिती मिळाल्यानंतर इतर वाघांशी वर्चस्वाची लढाई करून त्याने आणखी वाघ मारू नये यासाठी प्रयत्न करता येतील.

हेही वाचा >>> तालिबानने पोलिओ मोहिमेला स्थगिती दिल्याने अफगाणिस्तानमध्ये विनाशकारी परिणाम? नक्की घडतंय तरी काय? भारतावरही परिणाम होणार का?

वर्चस्वाची लढाई म्हणजे काय?

नुकतेच वयात आलेले किंवा स्थलांतर करून आलेले वाघ त्यांचा अधिवास निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्या क्षेत्रावर इतर वाघांचे साम्राज्य असेल तर मग त्यांचे साम्राज्य निर्माण करण्यासाठी तिथल्या वाघांसोबत ते लढाई करतात. प्रामुख्याने स्थलांतर करून आलेला वाघ वृद्धत्वाकडे झुकलेल्या वाघांचे क्षेत्र आपला अधिवास म्हणून निवडतात. त्यामुळे त्या वृद्ध वाघांशी लढाई करताना त्यांना फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. मध्यम वयाच्या वाघाचे क्षेत्र असेल तर ते त्यांच्या बछड्यांना लक्ष्य करतात. नागझिऱ्याच्या घटनेत जे दोन वाघ मृत्युमुखी पडले, त्यातील एक ‘टी-९’ हा १२ वर्षांचा होता. तर ‘टी-४’चा बछडा हा नुकताच वयात येऊ लागलेला होता.

टी-९ऊर्फ बाजीराव कोण?

‘टी-९’ ऊर्फ ‘बाजीराव’ वयाच्या बाराव्या वर्षी वर्चस्वाच्या लढाईत मरण पावला. बाजीराव हा मूळ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा वन परिक्षेत्रातील वाघ होता. डिसेंबर – २०१६ मध्ये हा वाघ ताडोबावरून वाघांच्या नियमित नैसर्गिक भ्रमणमार्गाने नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दाखल झाला. नागझिरा अभयारण्यात त्याने साम्राज्य स्थापन केले. ‘टी-९’ ऊर्फ ‘बाजीराव’ हा अतिशय बलाढ्य असा वाघ होता आणि काही वर्षांतच त्याने ‘नागझिऱ्याचा राजा’ अशी ओळख मिळवली होती. तब्बल नऊ वर्षे त्याने या जंगलावर आपले अधिराज्य गाजवले. मात्र, स्थलांतर करून आलेल्या दुसऱ्या वाघाने लढाईत त्याचा बळी घेतला.

हेही वाचा >>> सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार, ‘स्पेसएक्स’च्या क्रू-९ चे यशस्वी प्रक्षेपण; मोहिमेला विलंब का झाला? याचा नक्की परिणाम काय?

नागझिरा अभयारण्यातील वाघांची स्थिती काय?

जुने नागझिरा, नवे नागझिरा आणि कोका अभयारण्य मिळून या ठिकाणी सध्या चार वाघिणी आहेत. तर या चार वाघिणींपासून झालेले १५ बछडेदेखील नागझिरा अभयारण्यात आहेत. बऱ्याच वर्षांपूर्वी नागझिरा अभयारण्यात वाघांची संख्या मोठी होती. तर इथले वाघदेखील इतर अभयारण्यातील वाघांच्या तुलनेत मोठे होते. मात्र, शिकारीचा अभाव, गवताळ प्रदेश, खुल्या जागा यांसारख्या काही गोष्टींमुळे येथील वाघ इतरत्र स्थलांतर करून जाऊ लागल्याने या ठिकाणी वाघांची संख्या कमी झाली. दरम्यान, येथे वाघांची संख्या वाढावी म्हणून चंद्रपूर वनक्षेत्रातील वाघिणींना सोडण्यात आले. त्यातील एका वाघिणीने इतरत्र स्थलांतर केले.

नागझिरा अभयारण्यात दाखल वाघिणी कोणत्या?

अलीकडच्या काही महिन्यांत नागझिरा अभयारण्यात तीन वाघिणी दाखल झाल्या. चंद्रपूर वनक्षेत्रातून या वाघिणी स्थलांतर करून आणण्यात आल्या. मे २०२३ मध्ये ‘एनटी १’ आणि ‘एनटी २’ या दोन वाघिणी सोडण्यात आल्या. त्यातील ‘एनटी २’ वाघिणीने काही दिवसांतच अभयारण्याची सीमा ओलांडून मध्य प्रदेशकडे स्थलांतर केले. तर ‘एनटी १’ ही वाघीण सातत्याने बफर आणि गाभा क्षेत्रात दिसून येते. एप्रिल २०२४ मध्ये ‘एनटी ३’ ही वाघीण या जंगलात सोडण्यात आली. ती या अभयारण्याच्या आतच आहे.