रोहित वेमुला या हैदराबाद विद्यापीठातील तरुण हुशार ‘दलित’ विद्यार्थ्याच्या आत्महत्येने २०१६ साली देशातील राजकारण तापले होते. दलित विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात देशभर रान उठले. पण हाच रोहित दलित नाही असा निष्कर्ष तेलंगणा पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये काढला आहे. यामुळे एकीकडे रोहित प्रकरणातील विरोधकांची हवा काढण्याचा आणि दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या हंगामात रोहित वेमुला प्रकरण पुन्हा तापवण्याचा प्रयत्न दिसत आहे.
रोहित वेमुला कोण होता?
१७ जानेवारी २०१६ रोजी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाचा २६ वर्षीय तरुण संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला याचा मृतदेह वसतिगृहाच्या एका खोलीत आढळला. भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाल्याने रोहितला वसतीगृहातून काढून टाकण्यात आले होते. रोहितने मृत्यूपूर्वी विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र लिहून तक्रार केली होती की त्याचा छळ होत आहे, त्याच्याविरोधात चुकीचे आरोप लावले जात आहेत. ‘माझा जन्मच एक भयंकर अपघात होता,’ असे वाक्य रोहितने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत होते. या वाक्याने रोहितला दलित विद्यार्थ्यांवरील अत्याचाराचे प्रतिक बनवले.
हेही वाचा >>> विश्लेषण : इंग्लंडमध्ये पंतप्रधान ऋषी सुनक यांचे पद धोक्यात? स्थानिक निवडणुकांत दारुण पराभवाचा परिणाम काय?
रोहितच्या आत्महत्येनंतर काय पडसाद?
रोहितवर आत्महत्येची वेळ का आली असा प्रश्न केंद्र सरकारला विचारत देशभरात विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली. सामाजिक आणि राजकीय पडसाद उमटले. केंद्र सरकार दलित विद्यार्थ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. भाजपच्या नेत्यांच्या सांगण्यावरूनच रोहितला वसतिगृहातून काढून टाकण्यात आल्याचा काँग्रेसचा आरोप होता. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर चहूबाजुंनी टीकेची झोड उठली होती. राहुल गांधी यांनी हैदराबाद विद्यापीठात येऊन एक दिवसीय उपोषणही केले होते.
आरोप कोणत्या नेत्यांवर?
रोहितच्या आत्महत्येनंतर आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले होते. भाजपचे सिकंदराबादचे तत्कालीन खासदार बंडारू दत्तात्रेय, आमदार एन. रामचंद्र राव यांनी हैदराबाद विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू सी. अप्पा राव यांच्यावर वेमुलावर कारवाई करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला गेला. स्मृती इराणी यांनीही या प्रकरणात जातीने लक्ष घालून पाठपुरावा केला, असा आरोप होता.
हेही वाचा >>> विश्लेषण : उत्तर प्रदेशात यंदा भाजप ७० पार? विरोधकांची राज्यात किती ताकद?
क्लोजर रिपोर्टमध्ये काय?
तेलंगणा पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दोनच महत्त्वाचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. एक म्हणजे रोहित दलित नव्हे तर अन्य मागास जातीचा आहे आणि दुसरा निष्कर्ष म्हणजे त्याला आत्महत्येस कोणीही प्रवृत्त केले नाही. रोहित हा आंबेडकरी विद्यार्थी संघातील चळवळी, आंदोलनांमध्ये सक्रिय असल्याने त्याची अभ्यासात कामगिरी ढासळली होती, तसेच आपल्या आईने बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्यानेही रोहित तणावात होता. आपली खरी जात कळेल ही भीती त्याला होती. त्यातून त्याने आत्महत्या केली. सबळ पुराव्यांअभावी कोणाही आरोपीवर आरोपपत्र दाखल केले जाणार नाही, असे हा अहवाल सांगतो.
या प्रकरणाचा तपास २०१६ मध्ये मधापूर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त एम. रमन्ना कुमार यांनी केला, नंतर पुढे दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे हा तपास गेला. रोहितच्या शाळा, महाविद्यालयातून कागदपत्रे गोळा करण्यात आली. रोहितचे वडील नागा मणी कुमार, आजोबा वेंकटेशवरलु यांनी ते वड्डेरा समुदायाचे असल्याचे सांगितले. आई राधिका बनाला ही देखील वड्डेरा समुदायाची आहे, असे त्यांचे म्हणणे होते. राधिका यांनी तिची जात एससी असल्याचे का सांगितले ते आपणास ठाऊक नाही, असे ते म्हणाले, असेही अहवालात म्हटले आहे.
रोहित वेमुला नक्की कोणत्या जातीचा?
रोहितच्या आत्महत्येनंतर काही महिन्यांनी ए. के. रुपनवाल यांच्या एक एकसदस्यीय न्यायालयीन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यांनीही रोहित एससी समुदायाचा नसल्याचा अहवाल दिला. पण त्यावेळी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष पी. एल. पुनिया यांनी त्याला विरोध केला होता. जात पडताळणीचा अंतिम प्राधिकारी जिल्हाधिकारी असतो आणि रोहित अनुसूचित जातीचा असल्याचा पुरावा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे, असे पुनिया यांचे म्हणणे होते. दरम्यान, ८ फेब्रुवारी २०१६ रोजी रोहितच्या आत्महत्येनंतर काही दिवसांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना रोहितच्या आईची आई बनाला अंजनी देवी यांनी सांगितले होते की त्यांनी राधिकाला एका एससी माला जातीच्या दाम्पत्याकडून दत्तक घेतले. राधिका यांनी त्यांची मूळ माला जात त्यांच्या पतीशी झालेल्या घटस्फोटानंतर लावली. रोहितच्या मृत्यूनंतर महिनाभरात २३ फेब्रुवारी २०१६ रोजी अंजनी देवी यांचेही निधन झाले. त्यामुळे त्यांची साक्ष पोलिसांना नोंदवता आली नाही.
वेमुलाच्या जातीमागे कोणते राजकारण?
येत्या १३ मे रोजी तेलंगणात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदानाच्या अगोदर बरोबर दहा दिवस आधी ३ मे रोजी रोहितच्या आत्महत्येचा क्लोजर रिपोर्ट जाहीर झाला आहे, हा योगायोग नक्कीच नाही. गेल्या डिसेंबरमध्ये काँग्रेस पक्ष तेलंगणात सत्तेत आला आहे. काँग्रेसने रोहित वेमुला याच्या नावानेच कायदा करून दलित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. क्लोजर रिपोर्ट २०१८ मध्ये बीआरएस पक्षाच्या काळातील असून यावर्षी २१ मार्च २०२४ तो न्यायालयात सादर झाला. या रिपोर्टवर रोहितची आई आणि भावाने आक्षेप घेतल्यानंतर तेलंगणाच्या पोलीस महासंचालकांनी याचा तपास करण्याचा निर्णय घेतला आहे.