ठाणे जिल्हा हा रेल्वेप्रमाणे रस्ते वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातून मुंबई-नाशिक महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा, भिवंडीतील जुना मुंबई-आग्रा रोड, घोडबंदर मार्ग, मुरबाड मार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग असे महत्त्वाचे रस्ते जातात. तसेच शहरांतर्गातील रस्तेदेखील वाहतुकीसाठी महत्त्वाचे आहेत. परंतु सध्या या मार्गांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळे दररोज कोंडीचा सामना ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. कोंडी आणि खड्ड्यांमुळे भिवंडीत शाळकरी मुलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे खड्डे आणि कोंडीमुक्त करू असे जाहीर केले होते. परंतु अद्यापही ठाण्यात कोंडीची समस्या सुटलेली नाही. त्यामुळे कोंडी केव्हा फुटेल असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला आहे.
शहरातील रस्ते वाहतूक महत्त्वाची का?
ठाणे जिल्ह्यात राज्यमार्ग आणि महामार्गांचे जाळे पसरले आहे. उरण येथील जेएनपीटी बंदर, भिवंडी, नाशिक येथून हजारो अवजड वाहने घोडबंदरमार्गे गुजरातच्या दिशेने वाहतूक करत असतात. ही वाहने मुंब्रा बाह्यवळण मार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग, घोडबंदर मार्ग आणि भिवंडीतील जुना आग्रा रोड मार्गे मार्गक्रमण करत असतात. ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे. रेल्वेसेवा आता अपुरी पडू लागल्याने अनेक नोकरदार त्यांच्या खासगी वाहनांनी मुंबई गाठत असतात. त्यामुळे हलक्या वाहनांची वाहतूकदेखील मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. भिवंडीतील ग्रामीण भागातील नागरिकांना रस्ते वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागते. ठाण्यात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे सध्या तरी रस्ते वाहतुकीशिवाय नागरिकांना चांगला पर्याय नाही.
हेही वाचा >>> बांगलादेशातील अराजकामुळे महाराष्ट्रातील संत्री उत्पादकांना चिंता? संत्र्याचे भाव कोसळण्याची शक्यता?
दरवर्षी रस्ते खड्ड्यांत का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे खड्डेमुक्त करणार असल्याचे जाहीर केले होते. पंरतु यावर्षीदेखील ठाण्याला खड्डे आणि कोंडीने छळले आहे. मुख्य मार्ग आणि महामार्ग खड्ड्यांत गेला आहे. घोडबंदर येथील गायमुख घाटात दररोज वाहतूक कोंडी होत असते. मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते अंजुरदिवे, पूर्व द्रुतगती महामार्गावरील आनंदनगर ते कॅडबरी जंक्शन हे कोंडीचे केंद्रस्थान झाले आहेत. खड्डे, अरुंद रस्ते आणि नियोजनाअभावी कोंडीतून सुटका होत नाही. त्यात अवजड वाहनांची वाहतूक धोकादायक पद्धतीने सुरू असते. रस्त्यांची व्यवस्थित देखभाल होणे आवश्यक होते. परंतु पावसाळा तोंडावर आल्यानंतर सुरू केलेल्या उपाययोजना आणि दरवर्षी रस्त्यांची पुरेशी देखभाल केली जात नसल्याने ही स्थिती झाल्याचे बोलले जाते. जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यामध्ये रस्त्यावर मोठे खड्डे पडतात. सर्वाधिक परिणाम मुंबई-नाशिक महामार्ग, भिवंडीतील अंतर्गत जुना आग्रा रोड, अंतर्गत रस्ते आणि घोडबंदर भागावर होत असतो. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळेदेखील रस्त्यांचा दर्जा घटत असल्याचे अभियंत्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा >>> शेख हसीना भारतात! भारताचे निर्वासितांबाबतचे धोरण काय सांगते?
कोंडीमुळे काय हाल होतात?
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडीमुळे रहिवासी विटले आहेत. नोकरदारांना कोंडी टाळण्यासाठी दररोजच्या वेळेपेक्षा काही तास आधी घरातून बाहेर पडावे लागत आहे. जेणेकरून कोंडी झाली तरीही वेळेत कार्यालये गाठता येतील. तर सायंकाळी शाळेच्या विद्यार्थ्यांना घरी परतताना वेळेत पोहचणे कठीण होत आहे. त्यामुळे पालक चिंताग्रस्त असतात. रस्त्यावर वाहन चालकांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होत आहेत. त्यामुळे वाहन चालकांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. भिवंडीमध्ये त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून खड्डे बुजविण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
अवजड वाहनांबाबत नियमन का नाही?
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेतच अवजड वाहनांना परवानगी आहे. ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी हा भाग ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतो. या वेळेव्यतिरिक्त ही अवजड वाहने पोलीस आयुक्तालयाच्या बाहेरील हद्दीत उभी करण्याचा नियम आहे. असे असतानाही अवजड वाहनांची घुसखोरी इतर वेळी सुरूच असते. खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आल्याने तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांसोबत बैठक घेतल्यानंतर आता अवजड वाहनांचे नियम पाळले जात आहेत. परंतु इतर वेळी अवजड वाहनांची घुसखोरी सुरू असतानाही कारवाईबाबत पोलीस दुर्लक्ष करत असतात.
प्रकल्प उभे राहिल्यानंतर कोंडी सुटेल?
ठाण्यातील घोडबंदर भागात वडाळा-घाटकोपर- कासारवडवली या मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहेत. तर मुंबई-नाशिक महामार्गावर समृद्धी महामार्गाच्या निर्मितीचे काम सुरू आहे. हे प्रकल्प जिल्ह्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाची आहेत. असे असले तरी समृद्धी महामार्गावरील वाहनांचा भार वाढल्यानंतर त्याचा परिणाम पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवर येणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन येथील रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्ग निर्माण करताना, येथेही उपाययोजना करणे आवश्यक आहे. मेट्रो प्रकल्पांची कामे घोडबंदर येथे सुरू असून या प्रकल्पांच्या पूर्णत्वास आणखी काही वर्षे जाणार आहेत. घोडबंदर भागात दरवर्षी मोठी गृहसंकुले उभी राहात आहेत. त्यामुळे आणखी नागरीकरण या भागात वाढणार आहे. मेट्रो हा भार पेलू शकते का हा प्रश्नदेखील उपस्थित होणार आहे.