ब्रिटनमध्ये गुरुवारी झालेल्या स्थानिक निवडणुकीत सत्ताधारी हुजूर पक्षाला (कन्झर्व्हेटिव्ह पार्टी) अपेक्षेप्रमाणे पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे आता पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर स्वपक्षीय विरोधक तसेच मजूर पक्षाचा (लेबर पार्टी) दबाव वाढला आहे. मजूर पक्षाचे नेते मुदतपूर्व निवडणुकीची मागणी करीत असतानाच सुनक सरकारवर अविश्वास प्रस्तावही आणला जाऊ शकतो. स्थानिक निवडणुकांचे निकाल ऋषी सुनक यांचे पंतप्रधानपद धोक्यात आणणार का, पार्लमेंटच्या निकालावर परिणाम किती संभवतो, हुजूर पक्ष पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता किती असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्थानिक निवडणुकीचा निकाल काय?

इंग्लंडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हुजूर पक्षाने ११पैकी १० शहरांमधील सत्ता गमावली असून त्यांच्या नगरसेवकांची संख्या तब्बल ४७०ने घटली आहे. यापूर्वी पक्षाचे १ हजार नगरसेवक होते. लंडनचे महापौरपद मजूर पक्षाने कायम राखले आहे. तेथे पाकिस्तानी वंशाचे सादिक खान पुन्हा निवडून आले आहेत. ब्लॅकपूल साऊथ या पार्लमेंटच्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीतही हुजूर पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. ही जागा आधीपासून मजूर पक्षाचीच असली, तरी मतांची टक्केवारी हुजूर पक्षासाठी चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे. याखेरीज ब्रिटनमधील छोट्या पक्षांनीही यावेळी चांगले विजय नोंदविले आहेत. लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे ५२१ नगरसेवक निवडून आले असून ग्रीन पार्टीनेही आतापर्यंतची सर्वाधिक चांगल्या कामगिरीची नोंद केली आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : उत्तर प्रदेशात यंदा भाजप ७० पार? विरोधकांची राज्यात किती ताकद

सुनक यांच्यासाठी निकालाचा अर्थ काय?

बोरीस जॉन्सन आणि लिझ ट्रस या पूर्वसुरींच्या कारभाराने डागाळलेली पक्षाची प्रतिमा साफ करण्यात सुनक यांना फारसे यश आले नसल्याचे ताज्या निकालांवरून दिसते. २०१०पासून सलग सत्तेत असलेल्या त्यांच्या पक्षासाठी हा सर्वात मोठा धोक्याचा इशारा मानला जात आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये पार्लमेंटच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून आतासारखेच मतदान झाले, तर मजूर पक्ष १४ वर्षांनी सत्तेत परतण्याची शक्यता आहे. सुनक यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना पक्षासाठी ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहे. त्याच वेळी सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्रिशंकू पार्लमेंट अस्तित्वात येण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखविली. ब्रिटनसाठी ती फारशी चांगली परिस्थिती नसेल, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र आता सुनक यांच्यावर मुदतपूर्व निवडणुकीसाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे. मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टॅर्मर यांनी तशी जाहीर मागणी केली आहे. 

सुनक यांना स्वपक्षीय आव्हान देणार?

सार्वत्रिक निवडणुका अगदी जवळ आल्यामुळे आता पुन्हा एकदा नेतृत्वबदलाचा खेळ हुजूर पक्षात होण्याची शक्यता नाही. पक्षातील अतिउजव्या गटाच्या नेत्या आणि सुनक यांच्या पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी सुएला ब्रेव्हरमन यांनी ही बाब स्पष्ट केली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा पराभव झाला असला, तरी आता पक्षाचा नेता बदलणे योग्य नाही असे त्यांचे म्हणणे आहे. सर्वत्र पराभव होत असताना ईशान्य इंग्लंडमधील टीस व्हॅलीचे महापौरपद हुजूर पक्षाने कायम राखले आहे. सुनक यांच्यासाठी ही जमेची बाजू मानली जात आहे. त्यामुळे आता त्यांच्याच नेतृत्वाखाली हुजूर पक्ष सार्वत्रिक निवडणुकीला सामोरा जाणार असल्याचे ज‌वळजवळ स्पष्ट आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : उच्चशिक्षितांमधील बेरोजगारीचा प्रश्न किती गंभीर?

मजूर पक्षाला सत्तेत येण्याची संधी किती?

स्थानिक निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाने दमदार कामगिरी केली असली, तरी हमासविरोधात इस्रायलची बाजू ठामपणे घेणे पक्षाला काही ठिकाणी महागात पडले आहे. वायव्य इंग्लंडमधील ब्लॅकबर्न, ओल्डहॅम आदी मुस्लिमबहुल भागांमध्ये पक्षाला फटका बसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे पक्षाचा पारंपरिक मतदार काहीसा दुरावल्याचे चित्र आहे. गेल्या निवडणुकीत मजूर पक्षाची ८४ वर्षांतील सर्वात सुमार कामगिरी झाली होती. सर स्टॅर्मर यांनी पक्षाला पुन्हा एकदा ब्रिटनच्या राजकारणात केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यांना एकहाती सत्ता मिळण्याबाबत साशंकताच आहे. त्यामुळे जानेवारीत मजूर पक्ष सर्वांत मोठा पक्ष ठरला, तरी त्यांना लिबरल डेमोक्रेट्स आणि ग्रीन यांची मदत घ्यावी लागेल. विशेष म्हणजे, सुनक यांनीदेखील हेच भाकित वर्तविले आहे. 

amol.paranjpe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis uk pm rishi sunak under pressure after conservative party historic loss in uk local elections zws
Show comments