घर भाड्याने घ्यावे की विकत घ्यावे, हा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. यात दोन्ही बाजूंनी मते व्यक्त केली जातात. देशातील सात महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा गेल्या ३ वर्षांचा अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात घरांच्या किमती आणि घरांचे भाडे यातील वाढीचा आढावा घेण्यात आला आहे. देशात गेल्या ३ वर्षांत घरांच्या सरासरी किमतीतील वाढ घरभाड्यातील वाढीच्या तुलनेत जास्त आहे. मात्र, सर्वच महानगरांमध्ये हे चित्र नसून काही महानगरांमध्ये घरभाड्यातील वाढ घरांच्या किमतीच्या तुलनेत जास्त आहे.

नेमकी स्थिती काय?

देशातील मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, कोलकता आणि चेन्नई या सात महानगरांच्या मालमत्ता क्षेत्राचा आढावा घेणारा अहवाल अनारॉक ग्रुपने जाहीर केला. यात सात महानगरांत २०२१ च्या अखेरच्या तुलनेत २०२४ अखेरीस घरांच्या किमती आणि घरांचे भाडे यातील वाढीचे तुलनात्मक चित्र मांडण्यात आले. त्यात १ हजार चौरस फुटांच्या (२ बीएचके) घरांचा विचार करण्यात आला आहे. देशात गेल्या ३ वर्षांत घरांच्या किमतीत १२८ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविण्यात आली आहे. याच वेळी घरांच्या भाड्यातील सरासरी वाढ ७६ टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे एकूण चित्र पाहता घरांच्या किमतीतील वाढ घरभाड्याच्या तुलनेत जास्त दिसून आली आहे.

किमतीत जास्त वाढ कुठे?

घरांच्या किमतीत सर्वाधिक वाढ दिल्लीत नोंदविण्यात आली आहे. दिल्लीमध्ये नोएडा सेक्टर १५० मध्ये गेल्या ३ वर्षांत घरांच्या किमतीत १२८ टक्के वाढ झाली आहे. त्या खालोखाल हैदराबादमधील गच्चीबाऊलीमध्ये घरांच्या किमतीत ७८ टक्के वाढ नोंदविण्यात आली. ही वाढ बंगळुरुतील थनिसँड्रा मेन रोडवर ६७ टक्के आणि सर्जापूर रोडवर ६३ टक्के, हैदराबादमधील हायटेक सिटीत ६२ टक्के, दिल्लीतील सोहना रोडवर ५९ टक्के आहे. कोलकाता आणि चेन्नई घरांच्या किमतीतील वाढ तुलनेने कमी आहे. ही वाढ कोलकत्यातील राजारहाट आणि ईएम बायपासवर अनुक्रमे ३२ टक्के व १९ टक्के आहे. चेन्नईत ही वाढ पेराम्बूर आणि पल्लावरममध्ये अनुक्रमे २३ व २१ टक्के आहे.

घरभाड्यात वाढ कुठे?

देशात गेल्या ३ वर्षांत घरभाड्यात सर्वाधिक वाढ बंगळुरूमध्ये झाली आहे. बंगळुरूतील सर्जापूर रोडवर घरभाड्यातील वाढ ७६ टक्के आणि थनिसंड्रा रोडवर ती ६२ टक्के आहे. हैदराबादमध्ये घरभाड्यातील वाढ गच्चीबाऊली आणि हायटेक सिटीत अनुक्रमे ६२ व ५४ टक्के आहे. दिल्लीत ही वाढ नोएडा सेक्टर-१५० आणि सोहना रोडवर अनुक्रमे ६६ व ४७ टक्के आहे. कोलकत्यात ही वाढ ईएम बायपास आणि राजारहाटमध्ये अनुक्रमे ५१ व ३७ टक्के आहे. चेन्नईत ही वाढ पल्लावरम आणि पेराम्बूरमध्ये अनुक्रमे ४४ व ३६ टक्के आहे.

मुंबईत काय स्थिती?

मुंबईत घरभाड्याच्या तुलनेत घरांच्या किमतीतील वाढ जास्त आहे. मुंबईत गेल्या तीन वर्षांत घरांच्या किमतीत चेंबूरमध्ये ४८ टक्के आणि मुलुंडमध्ये ४३ टक्के वाढ झाली आहे. चेंबूरमध्ये घरांच्या किमती प्रतिचौरसफूट १८ हजार ७३५ रुपयांवरून २७ हजार ८०० रुपये आणि मुलुंडमध्ये १६ हजार ९१७ रुपयांवरून २४ हजार २०० रुपयांवर पोहोचल्या आहेत. गेल्या ३ वर्षांत मुंबईत घरभाड्यातील वाढ चेंबूर आणि मुलुंडमध्ये अनुक्रमे ४२ व २९ टक्के आहे. घरभाडे चेंबूरमध्ये ४६ हजारांवरून ६५ हजार ५०० रुपये आणि मुलुंडमध्ये ३९ हजार ५०० रुपयांवरून ५१ हजार रुपयांवर पोहोचले आहे.

पुण्यात काय चित्र?

पुण्यात घरांच्या किमतीच्या तुलनेत घरभाड्यातील वाढ जास्त आहे. पुण्यातील गृहनिर्माण बाजारपेठेत हिंजवडी आणि वाघोली हे भाग अग्रस्थानी आहे. या दोन्ही भागांमध्ये गेल्या ३ वर्षांत घरांच्या किमतीत प्रत्येकी ३७ टक्के वाढ झाली आहे. हिंजवडीतील घरांच्या किमती प्रति चौरसफूट ५ हजार ७१० रुपयांवरून ७ हजार ८०० रुपयांवर पोहोचल्या आहे. वाघोलीत या किमती प्रति चौरसफूट ४ हजार ९५१ रुपयांवरुन ६ हजार ८०० रुपयांवर गेल्या आहेत. गेल्या ३ वर्षांत पुण्यात घरभाड्यातील वाढ हिंजवडी आणि वाघोलीत अनुक्रमे ५७ व ६५ टक्के आहे. घरभाडे हिंजवडीत १७ हजार ८०० रुपयांवरून २८ हजार रुपयांवर आणि वाघोलीत १४ हजार २०० रुपयांवरून २३ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे काय?

घरांच्या किमतीतील वाढीबरोबरच भाड्यातील वाढीचा वेगही जास्त आहे. त्यामुळे किमतीतील वाढ जास्त असलेल्या ठिकाणी घर खरेदी करण्यातून दीर्घकालीन मोठा परतावा मिळण्याची हमी मिळते. घरांच्या किमतीपेक्षा भाडेवाढ अधिक असलेल्या भागात घर खरेदी केल्यास त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकतो. त्यामुळे स्वत:साठी घर विकत घेताना गुंतवणूकदारांनी किंमत वाढत असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करावी. घर घेऊन भाड्याने देणारे गुंतवणूकदार भाड्यामध्ये जास्त वाढ होत असलेल्या ठिकाणांची निवड करू शकतात, असा सल्ला अनारॉक ग्रुपचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी दिला आहे.

sanjay.jadhav@expressindia.com