निशांत सरवणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरातच्या पोरबंदर येथे चरस, मेथाअॅम्फिटामाईन (क्रिस्टल मेथ या नावे अधिक प्रसिद्ध), मॉर्फिन या अमली पदार्थांचा ३३०० किलो इतका प्रचंड साठा नौदल आणि अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने संयुक्त कारवाईत हस्तगत केला. हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा साठा मानला जात आहे. त्याआधी राज्यात पुणे पोलिसांनी १८०० किलो मेफेड्रोन (मियाव मियाव) हस्तगत करताना त्याचे दुवे दिल्लीपर्यंत असल्याचे शोधून काढले. देशात गेल्या काही महिन्यातच अमली पदार्थांचे साठे मोठ्या प्रमाणात का सापडत आहेत, यामागील कारणांचा हा आढावा.

आतापर्यंत सापडलेले अमली पदार्थ…

गुजरातच्या पोरबंदर येथे ३३०० किलो अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. पुण्यात सापडलेल्या सर्वात मोठ्या प्रमाणातील अमली पदार्थाच्या साठ्यामुळे संपूर्ण यंत्रणा हादरली आहे. अमली पदार्थविरोधी विभागाने नौदलाच्या सहकार्याने गेल्या दोन वर्षांत भारतीय महासागरात तीन मोठ्या कारवाया केल्या आहेत. ‘समुद्रगुप्त’ या नावे परिचित असलेल्या कारवाईत ७ मे २०२३ रोजी कोची येथे २५०० किलो मेथाअॅम्फिटामाईन हस्तगत केले गेले होते. त्याआधी २०२१ मध्ये गुजरातच्या मुंद्रा बंदरात तीन हजार किलो इतके अफगाण हेरॉईन हस्तगत केले होते. कोची येथेच उच्च प्रतीचे हेरॉईनही ऑक्टोबर २०२२ मध्ये हस्तगत करण्यात आले होते. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने जारी केलेल्या एका पत्रकानुसार, अमली पदार्थविरोधी विभागाने गेल्या वर्षांत ११६ छापे टाकून ७० हजार किलो इतके हेरॉईन, ब्राऊन शुगर, चरस, खसखसचा पेंढा, अफू आदी साठा हस्तगत केला आहे. याशिवाय महसूल गुप्तचर यंत्रणेकडूनही अमली पदार्थ हस्तगत करण्याची कारवाई केली जाते. अमली पदार्थांची प्रमुख बाजारपेठ मुंबईसह आता गुजरात, दिल्ली होऊ पाहत आहेत. 

हेही वाचा >>> शेअर बाजाराने आज विशेष ट्रेडिंग सत्र का केले आयोजित? जाणून घ्या

कोणत्या अमली पदार्थांना मागणी? 

मेथाअॅम्फिटामाईन म्हणजेच क्रिस्टल मेथला सर्वाधिक मागणी आहे. खरे तर याआधी हा रासायनिक पदार्थ अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कक्षेत येत नव्हता. याचा वापर व्यसनमुक्तीसाठी केला जात असल्याचा दावा होता. परंतु व्यसनमुक्तीपेक्षा आता तो व्यसनाधीनतेसाठीच अधिक केला जातो. हा अमली पदार्थ स्पीड, अप्पर, मेथ, क्रिस्टल मेथ, चॉक, आईस, ग्लास, ख्रिस्तमस ट्री, क्रँक आदी किती तरी नावाने प्रसिद्ध आहे. याशिवाय मेफेड्रॉन (मियाव मियाव), मॉर्फिन, चरस, अफगाण हेरॉईन आदींना मागणी आहे.  

अमली पदार्थ येतात कोठून? 

केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या स्थायी समितीने आपल्या अहवालात, म्यानमार, थायलंड आणि लाओस हे देश ‘गोल्डन ट्रायँगल’ तर इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांना ‘गोल्डन क्रेसेन्ट’ संबोधले आहे. या देशांमध्ये अफूची शेती मोठ्या प्रमाणात होते. या चक्रव्यूहात भारताची हद्द अडकल्याने अमली पदार्थांच्या तस्करीला मोकळे रान मिळाले आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये अफूची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. अफू म्हणजे खसखसची शेती. अफूच्या बोंडाला चिरा मारून त्यातून दूध काढले जाते. त्यावर प्रक्रिया करून त्याच्या चकत्या पाडतात त्याला अफीम म्हणतात. शासनाकडून अधिकृत परवानगी घेऊन अशी शेती केली तरी तो माल शासनाला द्यावा लागतो. यावर अमली पदार्थ प्रतिबंधक अधिकाऱ्याचे लक्ष असते. परंतु दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक मालाचे उत्पादन करून ते विकले जाते. अफीमवर रासायनिक प्रक्रिया करून पांढरे म्हणजे चांगल्या प्रतीचे हेरॉईन व त्यापासून पुढे ब्राऊन शुगर बनविली जाते. चरस हे प्रामुख्याने नेपाळमधून येते तर पाकिस्तानही चरसचा पुरवठादार आहे. कोकेन मात्र आफ्रिकन देशांतून येते. दिल्लीत, मुंबईजवळ नालासोपारा, उत्तर प्रदेश आदी ठिकाणी ही मंडळी झुंडीने राहतात. 

तस्करीचे मार्ग? 

पश्चिम भारतात अफगाणिस्तानमधून मोठ्या प्रमाणात हेरॉईनची तस्करी होते तर म्यानमारमधून पूर्व भारतात हेरॉईनचा पुरवठा होतो. गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीरमार्गे तस्करी होते. प्रामुख्याने सीमेवरून किंवा हवाईमार्गे हा पुरवठा होत होता. आता जलमार्गाचा वापर केला जातो. गुजरातमध्ये अलीकडे सापडलेला अमली पदार्थांचा साठा हा त्याचाच भाग होता. नेपाळ, बांगलादेश, भुतान, म्यानमार या देशांतून भारतात होणाऱ्या तस्करीमुळे मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, पश्चिम बंगला, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमार्फत दिल्ली व मुंबईत पुरवठा होतो. खलिस्तानवादी संघटनांना हाताशी धरून पाकिस्तानातून यापैकी बऱ्याचशा अमली पदार्थाची तस्करी होते, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. 

हेही वाचा >>> Bengaluru Bomb Blast: आयईडी स्फोटक म्हणजे काय? भारतात पूर्वी या स्फोटकाचा वापर झाला का?

आताच मोठा साठा का सापडला? 

स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कारवाईवर अधिक भर देण्याचे आदेश दिले. त्याचा परिणाम आता दिसून येत असल्याचे संबंधित यंत्रणांचे म्हणणे आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत विविध शहरात परिसंवाद घेतले. राष्ट्रीय अमली पदार्थ प्रतिबंधक विभाग कार्यान्वित केलाच. परंतु केंद्र व राज्य पातळीवरील यंत्रणांनाही सक्रिय होण्याचे आदेश दिले. या काळात नौदलाने अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या सहाय्याने समुद्रगुप्त मोहिम एकाच वेळी राबविली. त्यातही मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. राज्याच्या पातळीवर जिल्हा समित्या नेमून पोलिसांनी अमली पदार्थ प्रतिबंधक काय कारवाई केली, यावर नियंत्रण ठेवले गेले. त्यामुळे राज्याच्या पातळीवरही मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत होऊ लागले. राज्याचे पोलीस महासंचालक तसेच दहशतवादविरोधी विभागाचे महासंचालक संयुक्तपणे अमली पदार्थ प्रतिबंधक कारवाईची माहिती देऊ लागले. पोलिसांनी व यंत्रणांनी ठरविले तर अमली पदार्थ प्रतिबंधक कारवाई जोरात होऊ शकते हेच स्पष्ट झाले. केंद्रीय स्थायी समितीने अहवालात दिलेल्या माहितीनुसार, १९९२ ते २०१५ पर्यंत १.२ लाख किलो अमली पदार्थ जप्त झाले होते. २०१६ ते २०२२ पर्यंत तो आकडा ५.१ लाख किलो होता. करोना काळात सर्वाधिक म्हणजे ८.३ लाख किलो अमली पदार्थ हस्तगत केले गेले. त्यामुळे हे आताच घडतेय असे नव्हे तर यंत्रणांचे सातत्य असल्यामुळे अमली पदार्थांचे साठे मोठ्या प्रमाणात सापडत आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

माजी पोलीस महासंचालक काय म्हणतात?

राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित म्हणतात : आताच इतका मोठा साठा सापडतो म्हणजे आतापर्यंत त्याकडे दुर्लक्ष झाले का? याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान वा म्यानमार सारख्या देशांमधून अमली पदार्थांच्या पुरवठ्याद्वारे एक प्रकारचे छुपे युद्ध खेळले जात आहे, याची खात्री आहे. त्यामुळेच कधी काश्मीर, पंजाब, गुजरात, मणिपूर तर कधी महाराष्ट्रासारख्या भागात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे साठे सापडतात. गेली तीन दशके पाकिस्तान ड्रोन, बोटी, सुरुंग, स्त्रिया आदींच्या मदतीने भारतात अमली पदार्थ पोहोचवत आहे. हे लक्षात घेऊन अमली पदार्थाविरोधातील लढाई भारत-पाकिस्तान वा भारत-अफगाणिस्तानमधील लढाई इतक्याच गांभीर्याने घेण्याखेरीज पर्याय नाही. केवळ भारताच्या आजूबाजूचे नव्हे तर अगदी दक्षिण अमेरिकेमधील काही देशांमध्येही प्रचंड प्रमाणावर अमली पदार्थांना आवश्यक असणाऱ्या मालाचे उत्पादन होते. हाच माल कंटेनरमध्ये भरून समुद्रमार्गे जगभर पोहोचवला जातो. तसाच तो भारतातही येतो आणि इथून अन्यत्रही पोहोचवला जातो. त्यामुळे यावरही काळजीपूर्वक लक्ष ठेवून दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे. तरच भावी पिढी या संकटापासून सुरक्षित राहू शकेल.

nishant.sarvankar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis why drugs found in huge quantities in india print exp zws
Show comments