अनिकेत साठे
हिंद महासागर क्षेत्रात चिनी नौदलाच्या हालचाली वाढत असताना भारतीय नौदलासाठी स्वदेशी बनावटीची दुसरी विमानवाहू युद्धनौका बांधणीच्या योजनेला संरक्षण सामग्री खरेदी मंडळाने मंजुरी दिली आहे. चीनच्या ताफ्यात विशाल आकारमान व क्षमतेच्या विमानवाहू नौका आहेत. त्यामुळे समतोल साधण्यासाठी भारतीय नौदल किमान ६५ हजार टन वजनाच्या युद्धनौकेसाठी आग्रही होते. तथापि, विविध कारणांस्तव त्यापेक्षा कमी क्षमतेच्या विमानवाहू नौकेचा पर्याय स्वीकारावा लागल्याचे दिसत आहे.
प्रस्ताव पुढे कसा आला?
हिंद महासागरावर वर्चस्व राखणाऱ्या भारतीय नौदलास हिंद-प्रशांत महासागर क्षेत्र, त्यापलीकडे व हिंद महासागरात प्रवेश करण्याच्या मार्गावर (चोक पॉइंट्स) प्रभावी भूमिका पार बजावण्यासाठी आपली शक्ती निरंतर वृद्धिंगत करावी लागणार आहे. त्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे विमानवाहू नौका. नौदलाच्या दोन्ही विभागांकडे (पूर्व व पश्चिम) प्रत्येकी एक आणि पर्यायी स्वरूपातील एक अशा तीन विमानवाहू नौकांची गरज वारंवार मांडली गेली होती.
हेही वाचा >>> पुण्यातील ओशो आश्रमात दोन गटात जमिनीच्या विक्रीवरून वाद, नेमकं काय घडतंय? वाचा…
अपेक्षा, निवड यांमध्ये फरक आहे का?
आठ वर्षांपूवी संरक्षण मंत्रालयाने स्वदेशी बनावटीची दुसरी विमानवाहू नौका ६५ हजार टन वजनी क्षमतेची राखण्याचा विचार केला होता. तिच्या संकल्पनेवर काम करण्यासाठी नौदल संरचना विभागाला ३० कोटींचा निधी देण्यात आला. परंतु, त्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. नौदलही इलेक्ट्रिकवर आधारित, अद्ययावत तंत्रज्ञानाने (कॅटोबार तंत्र) सज्ज अशा ६५ हजार टन वजनाच्या विमानवाहू नौकेसाठी आग्रही राहिले. मात्र, प्रचंड खर्च, बांधणीतील कालावधी व विशाल नौकेच्या बांधणीसाठी देशात आवश्यक भौतिक संसाधनांच्या अभावाने तो विचार तूर्त मागे राहिला. अशी नौका परदेशातून खरेदी करण्याची शक्यता नव्हती.
स्वदेशी सामग्रीविषयी सरकार आग्रही?
सरकारने स्वदेशी लष्करी सामग्रीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने विक्रांतशी साधर्म्य साधणाऱ्या ४० हजार टन वजनाच्या स्वदेशी विमानवाहू नौकेचा पर्याय निवडण्यात आला असून त्यावर ४० हजार कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. निर्मितीसाठी आवश्यक कामे देशातील उद्योगांना दिली जात आहेत. विक्रांतच्या बांधणीतून प्राप्त झालेल्या कौशल्याचा विकास करता येईल. तसेच परदेशी लष्करी सामग्रीवरील अवलंबित्व कमी करण्याचा उद्देशदेखील साध्य होईल, अशी भूमिका आहे.
सामरिक विश्लेषकांना काय वाटते?
हिंद महासागर क्षेत्रात ४० हजार टनाच्या विमानवाहू नौकेची उपस्थिती चीनच्या ६० हजार आणि ८० हजार टन विमानवाहू नौकांना धास्तीकारक ठरू शकेल का, हा सामरिक विश्लेषकांपुढे प्रश्न आहे. संभाव्य युद्धकालात चिनी नौदलाला रोखण्यासाठी मलाक्काची सामुद्रधुनी महत्त्वाची आहे. त्याकरिता किमान ६० हजार टन वजनाच्या विमानवाहू नौकेची आवश्यकता आहे. तिच्यावरून एफ-१८ किंवा राफेलसारख्या विमानांच्या उड्डाणांमुळे हिंद महासागर क्षेत्रात वर्चस्व राखता येईल, असा दाखला काही निवृत्त नौदल अधिकारी देतात. चीन आपल्या जहाजांची संख्या विस्तारत आहे. सध्या त्याच्या ताफ्यात वेगवेगळय़ा ३५५ युद्धनौका आहेत. सुदूर सागरातील (ब्लू वॉटर) त्याच्या हालचाली वाढत आहेत. चीनच्या पाच ते नऊ युद्धनौका सतत हिंद महासागर क्षेत्रात असतात. पुढील सात वर्षांत एकूण पाच विमानवाहूू नौका कार्यान्वित करण्याचे चीनचे लक्ष्य आहे. त्याचा सामना करण्यासाठी भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढविण्याकडे समितीने लक्ष वेधले आहे.
देखभाल-दुरुस्तीचा संबंध कसा आहे?
सध्या भारतीय नौदलाकडे रशियन बनावटीची आयएनएस विक्रमादित्य (४४ हजार ५०० टन) आणि देशांतर्गत निर्मिलेली आयएनएस विक्रांत (४४ हजार टन) या दोन विमानवाहू युद्धनौका आहेत. साधारणत: दोन वर्षे कार्यरत राहिलेल्या जहाजांची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नियमित देखभाल-दुरुस्ती (रिफीट) केली जाते. जहाजाच्या आकारमानानुसार त्यास काही महिने ते दीड-दोन वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो. गतवर्षी आयएनएस विक्रमादित्यची देखभाल, दुरुस्ती पूर्णत्वास गेली होती. सध्या आयएनएस विक्रांतची ती प्रक्रिया सुरू आहे. जानेवारी २०२४ च्या अखेरीस ती कार्यान्वित होणार आहे. अशा वेळी तिसरी विमानवाहू नौका पर्यायी स्वरूपात कार्यान्वित असणे सोयिस्कर ठरते.
विमानवाहू नौका महत्त्वाची का?
महासागरात खोलवर धडक देत कारवाईची क्षमता राखणारे नौदल निळय़ा पाण्यातील नौदल म्हणून ओळखले जाते. विस्तृत सागरी क्षेत्रावर प्रभाव टाकण्याची विमानवाहू नौकेची क्षमता असते. त्यामुळे सुदूर सागरातील कारवाईसाठी ती महत्त्वाची ठरते. जगात आपले सामर्थ्य प्रदर्शित करण्याचे ते प्रभावी साधन ठरते. तिची केवळ उपस्थिती दबाव निर्माण करण्यास पुरेशी ठरते.
aniket.sathe@expressindia.com