हृषिकेश देशपांडे
उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली हे लोकसभेचे दोन मतदारसंघ गांधी कुटुंबीयांचे परंपरागत मतदारसंघ म्हणून ओळखले जातात. त्यामुळे येथून उमेदवार कोण असणार, याची चर्चा गेली चार महिने सुरू होती. रायबरेलीच्या विद्यमान खासदार सोनिया गांधी या राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून गेल्या. तेव्हापासून रायबरेलीत गांधी कुटुंबातील कोण, असा प्रश्न होताच. राहुल गांधी केरळमधील वायनाड या मतदारसंघातून गेल्या वेळी निवडून आले तर अमेठीतून पराभूत झाले. यंदाही ते त्या मतदारसंघातून पुन्हा कौल अजमावत आहेत. अमेठीतही राहुल हे पुन्हा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना आव्हान देणार का याची उत्सुकता होती. मात्र राहुल यांनी अमेठीऐवजी काँग्रेससाठी तुलनेने सुरक्षित मानल्या गेलेल्या रायबरेलीला पसंती दिली.
प्रियंकांना का डावलले?
रायबरेलीत राहुल गांधी की प्रियंका गांधी उमेदवार असा प्रश्न होता. मात्र प्रियंका या देशभर प्रचारात असून, त्या पोटनिवडणुकीद्वारे लोकसभेत जातील असे संकेत ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी दिले आहेत. राहुल गांधी जर वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघांतून विजयी झाले तर त्यांना कोणती तरी एक जागा सोडावी लागेल. मग कदाचित वायनाडमधून प्रियंकांना संधी मिळेल असे मानले जाते. मात्र राहुल गांधी यांनी अमेठीतील लढत टाळली, तेथे त्यांना पराभवाची भीती वाटत होती काय, असा मुद्दा आहे. भाजपने प्रचारात हा मुद्दा उचलला तर नवल नाही. अर्थात रायबरेलीतील सामनाही त्यांच्यासाठी तितका सोपा नाही.
हेही वाचा >>> World Press Freedom Day: भारतातील पहिलं वृत्तपत्र Bengal Gazette चा इतिहास माहिती आहे का?
रायबरेली मतदारसंघाचा इतिहास
गांधी कुटुंब आणि रायबरेली मतदारसंघ हे नाते घट्ट आहे. फिरोज गांधी हे १९५२ आणि १९५७ मध्ये या मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर हा मतदारसंघ काही काळ राखीव होता. मात्र १९६७ व १९७१ मध्ये इंदिरा गांधी येथून विजयी झाल्या. आणीबाणीनंतर १९७७ च्या निवडणुकीत राजनारायण यांनी इंदिरा गांधी यांचा ५५ हजार मतांनी येथून पराभव केला. हा गांधी कुटुंबाला या मतदारसंघात बसलेला पहिला धक्का. पुन्हा १९८० मध्ये इंदिरा गांधी आंध्र प्रदेशातील मेडक तसेच रायबरेलीतून विजयी झाल्या. त्यांनी रायबरेलीचा राजीनामा दिला. तेथून त्यांचे नातेवाईक अरुण नेहरू पोटनिवडणुकीत जिंकले. पुढे १९८९ व १९९१ मध्ये काँग्रेसच्या शीला कौल विजयी झाल्या. त्या कमला नेहरू यांचे बंधू कैलासनाथ कौल यांच्या पत्नी होत. १९९६ मध्ये येथे भाजपला यश मिळाले. शीला कौल यांचे पुत्र विक्रम हे चौथ्या क्रमांकावर गेले. १९९८ मध्ये भाजपने विजयाची पुनरावृत्ती केली. मात्र २००४ ते २०१९ या कालावधीत चार वेळा सोनिया गांधी यांनी येथून विजय मिळवला. गेल्या म्हणजेच २०१९ मध्ये सोनियांना येथून पाच लाख ३३ हजार तर भाजपचे दिनेशसिंह यांना तीन लाख ६५ हजार मते मिळाली. राज्यातील भाजपची ताकद पाहता या मतदारसंघातही पक्षाचा जनाधार वाढल्याचे दिसले.
यंदाचे चित्र काय?
भाजपने पुन्हा दिनेशसिंह यांना उमेदवारी दिली आहे. ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर भाजप रायबरेलीत कडवी टक्कर देण्याच्या प्रयत्नात आहे. विशेष म्हणजे यंदा येथून बहुजन समाज पक्षाने यादव समुदायातील उमेदवार दिल्याने काँग्रेससाठी लढत आव्हानात्मक झाली. गेल्या वेळी येथून सपा-बसपचा उमेदवार नव्हता. यंदा काँग्रेस-समाजवादी पक्ष यांची आघाडी आहे. राहुल गांधी यांच्यासाठी ती दिलासादायक बाब ठरेल. मात्र पूर्वीचा अमेठी मतदारसंघ सोडल्याने राहुल यांना भाजपच्या टीकेला तोंड द्यावे लागणार. गेल्या वेळी अमेठीत पराभूत झाल्यानंतर आता तो गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला राहिला नाही हे स्पष्ट आहे. अमेठीतून गांधी कुटुंबीयांचे विश्वासू किशोरीलाल शर्मा यांना संधी देण्यात आली आहे. ते गेली २५ वर्षे येथे काम करत आहेत. तेथे जवळपास २५ वर्षांनंतर अमेठीतून गांधी कुटुंबातील उमेदवार नाही.
हेही वाचा >>> रिलायन्स कॅपिटल दिवाळखोरीत, गुंतवणूकदार कोर्टात, नेमकं प्रकरण काय?
रायबरेलीचे महत्त्व
उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी गेल्या वेळी फक्त रायबरेली मतदारसंघात काँग्रेसला यश मिळाले. यावरून राज्यात काँग्रेसची स्थिती फारशी उत्तम नाही हे स्पष्ट होते. अमेठीपेक्षा रायबरेली हा काँग्रेससाठी तुलनेने सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. रायबरेली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पाच विधानसभा मतदारसंघांपैकी चार ठिकाणी समाजवादी पक्ष तर रायबरेली विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार आहे. त्यामुळेच समाजवादी पक्षाची साथ राहुल यांच्यासाठी महत्त्वाची ठरेल. अर्थात समाजवादी पक्षाचे दोन आमदार पक्षावर नाराज आहेत. रायबरेलीत ३४ टक्के मते दलितांची आहेत. याखेरीज मुस्लीम ११ टक्के आहे. येथे बसपचा उमेदवार कितपत मते घेतो यावर येथील निकाल ठरेल. भाजपने राज्यात प्रत्येक जागा जिंकण्यासाठी रणनीती आखली आहे. येथील भाजप उमेदवार आधीच जाहीर झाला आहे. दिनेश प्रतापसिंह हे योगी सरकारमध्ये मंत्री आहेत. येथून निवडणूक लढवायची या हेतूने त्यांनी तयारी पूर्वीपासून केलीय. तर राहुल यांना प्रचारासाठी पंधरा दिवस मिळतील. रायबरेली व अमेठीत २० मे रोजी मतदान होणार आहे. राहुल यांनी उमेदवारी जाहीर होताच पंतप्रधानांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहता या मतदारसंघात उर्वरित काळात भाजप लक्ष केंद्रित करणार हे उघड आहे. कुटुंबाचा पारंपरिक मतदारसंघ आहे म्हणून राहुल यांना पहिल्या खेपेला काही प्रमाणात सहानुभूती मिळेल.
hrishikesh.deshpande@expressindia.com