गौरव मुठे
भांडवली बाजारातील दमदार तेजीकडे आकर्षित होऊन, एकीकडे अनेक हवशेनवशे बाजारातील जोखमीकडे दुर्लक्ष करून आणि ती न समजून घेता ट्रेडिंग करू लागले आहेत, तर दुसरीकडे स्वयंघोषित तज्ज्ञ बाजार नियामक ‘सेबी’च्या परवानगी किंवा मान्यतेविना प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमाद्वारे त्यांना शेअर खरेदी-विक्रीसंबंधित टिप्स देऊन ईप्सित साधताना दिसतात. गुंतवणूकदारांचे हात पोळून काढणाऱ्या या प्रकाराची दखल घेत ‘सेबी’ने गेल्या वर्षीपासून कडक कारवाईस सुरुवात केली आहे.
फिनफ्लुएन्सर आणि वृत्तवाहिन्यांवरील तज्ज्ञांबाबत ‘सेबी’चे म्हणणे काय?
फिनफ्लुएन्सर समाजमाध्यमांत असलेल्या त्यांचा प्रभावाचा फायदा घेत गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा सल्ला देण्याचे काम करतात. त्यातील अनेक जण गुंतवणुकीवर अव्वाच्या सव्वा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवितात. त्याला भुलून अनेक जण गुंतवणूक करतात आणि फसतात. हे फिनफ्लुएन्सर यूट्यूब, एक्स, इन्स्टाग्राम आणि टेलिग्राम या समाजमाध्यमांवर गुंतवणुकीबाबत सल्ला देतात. त्यांच्याकडून शेअर बाजारासंबंधी अनेक अभ्यासक्रमदेखील चालविले जातात. शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या नावाखाली भांडवली बाजारातील गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येतो आणि यासाठी ग्राहकांकडून पैसे घेतले जातात. खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन ग्राहकांना भुलविले जाते. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) केलेल्या तपासानुसार, फिनफ्लुएन्सर ग्राहकांना अनेक पटीने नफा कमावून देण्याचे खोटे आश्वासन देतात. याचबरोबर वृत्तवाहिन्यांवरील ‘तज्ज्ञ’ किरकोळ गुंतवणूकदारांना प्रभावित करण्याच्या स्थितीत असल्याचा फायदा घेतात. त्यायोगे या मंडळींनी बेकायदेशीरपणे स्वतः बाजारातून अवैधरीत्या मोठा नफा कमावला आहे. या कथित तज्ज्ञांनी दूरचित्रवाणीच्या माध्यमातून दिलेल्या सल्ल्याच्या विपरीत भांडवली बाजारात स्थिती घेऊन बाजारातून मोठा नफा कमावल्याचे तपासात आढळून आले.
हेही वाचा >>> कतारने ज्या भारतीयांना सुनावली होती फाशीची शिक्षा, त्यांचीच केली सुटका; नेमकं प्रकरण काय?
‘सेबी’ची ताजी कारवाई काय?
भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने सरलेल्या गुरुवारी ‘झी बिझनेस’ या वृत्तवाहिनीवर उपस्थित असलेल्या निर्मल कुमार सोनी, पार्थ सारथी धर, सिमी भौमिक, मुदित गोयल, हिमांशू गुप्ता, आशीष केळकर आणि किरण जाधव यांच्यासह १५ अतिथी तज्ज्ञांना एकूण ७.४१ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना वृत्तवहिनीच्या माध्यमातून समभागांबद्दल माहिती देऊन त्यांनी समभाग खरेदीचा सल्ला दिला गेला आणि त्याच वेळी यातील तज्ज्ञांनी या परिस्थितीतीचा फायदा घेत त्यांच्याकडे आधीपासूनच असलेले तेच समभाग विकून नफा कमावल्याचे ‘सेबी’च्या तपासात आढळून आले.
‘सेबी’ने आतापर्यंत कोणाकोणावर कारवाई केली?
‘सेबी’कडे उपलब्ध माहितीनुसार, मागील वर्षभराच्या कालावधीत नोंदणीकृत नसलेल्या १५ गुंतवणूक सल्लागारांवर कारवाई करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना अनेक पटींनी परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या अशा गुंतवणूक सल्लागारांचे पीक फोफावल्याने ‘सेबी’ने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यातील सर्वात मोठी कारवाई मे महिन्यात केली होती. त्या वेळी पी. आर. सुंदर या फिनफ्लुएन्सरवर कारवाई करण्यात आली होती. याचे यूटय़ूबवर १० लाखांहून अधिक फॉलोअर आहेत. भांडवली बाजारात व्यवहार करण्यास त्याला एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तो नोंदणी नसतानाही भांडवली बाजाराबाबत दैनंदिन सल्ला आणि इतर सेवा देत होता. याचबरोबर ‘बाप ऑफ चार्ट’ या नावाने समाजमाध्यमांवर चॅनल चालविणाऱ्या मोहम्मद नासीर या फिनफ्लुएन्सरवर देखील कारवाईचा दंडुका उगारला गेला. तसेच ‘बोर्स इंडिया इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजर’, गुंजन वर्मा, ‘रॉकेट टिप्स’, ‘शुअर शॉट फ्यूचर अॅडव्हायजरी सर्व्हिसेस’ आणि ‘क्रूड ऑइल टिप्सवाला’ यांच्यासह अशा अनेक सल्लागारांवर कारवाई करण्यात आली. आता या यादीत निर्मल कुमार सोनी, पार्थ सारथी धर, सार कमॉडिटीज प्रायव्हेट लिमिटेड, मनन शेअरकॉम प्रायव्हेट लिमिटेड आणि कान्ह्या ट्रेडिंग कंपनी यांचा समावेश आहे. अतिथी तज्ज्ञांमध्ये ‘झी बिझनेस’वरील वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सामील झालेले किरण जाधव, आशीष केळकर, हिमांशू गुप्ता, मुदित गोयल आणि सिमी भौमिक यांची देखील भर पडली आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण : पाकिस्तानमधील निवडणूक निकालाचा भारताशी संबंधांवर काय परिणाम?
अभिनेता अर्शद वारसीसह पत्नीवर ‘सेबी’चा बंदी आदेश काय होता?
यूट्यूब वाहिनीवरील दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओच्या माध्यमातून दोन कंपन्यांच्या समभागांच्या किमतीत फेरफार करून आर्थिक लाभ मिळविल्याच्या प्रकरणी अभिनेता अर्शद वारसी, त्याची पत्नी मारिया गोरेटी आणि इतरांसह एकूण ४५ जणांवर गेल्यावर्षी मार्चमध्ये कारवाई करताना, ‘सेबी’ने त्यांना एक वर्षांसाठी भांडवली बाजारातील व्यवहार करण्यावर बंदी घातली. गुंतवणूकदारांची दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओमधून, दूरचित्रवाणी वाहिनी साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड आणि नवी दिल्लीस्थित प्रसारण क्षेत्रातील कंपनी शार्पलाइन ब्रॉडकास्ट लिमिटेड या कंपन्यांचे समभाग खरेदी करण्याची शिफारस त्यांनी केली. गुंतवणूकदारांना आमिष दाखवण्यासाठी दोन कंपन्यांबद्दल खोटी सामग्री असलेले यूट्यूब व्हिडीओ तयार करून प्रसारित करण्यात आल्याचा आरोप तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. समभागांच्या किमती फुगवून स्वत:पाशी असलेल्या समभागांची विक्री करून मोठा आर्थिक लाभ त्यांनी करून घेतला. म्हणून वारसी दाम्पत्याव्यतिरिक्त, साधना ब्रॉडकास्टच्या काही प्रवर्तकांनाही बाजारात व्यवहारांवर बंदी आणली गेली. बाजार-व्यवहारांवर बंदीव्यतिरिक्त, नियामकांनी दोन वेगळ्या अंतरिम आदेशांनुसार या प्रकरणी आरोपींनी बेकायदेशीररीत्या कमावलेला ५४ कोटी रुपयांच्या नफ्यावर जप्तीही आणली आहे. साधना ब्रॉडकास्टच्या समभागांच्या किमती फुगवून, अर्शद वारसीला २९.४३ लाख रुपयांचा आणि त्याच्या पत्नीला ३७.५६ लाख रुपयांचा नफा झाल्याचा नियामकांचा निष्कर्ष आहे. नियामकांनी त्यांना समभागांची अवाजवी उलाढाल वाढविणारे अर्थात ‘व्हॉल्यूम क्रिएटर्स’ म्हणून आदेशपत्रात वर्गीकृत केले होते.
सेबीने अवैधरित्या नफा मिळविणाऱ्यांचे वर्गीकरण कसे केले आहे?
सेबीने संपूर्ण प्रकरणाची आणि संशयित संस्थांनी बजावलेली भूमिका अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी फसवणुकीच्या प्रकारांची विभागणी केली आहे. यात नफा कमावणारे, त्यांना नफ्यासाठी सक्षम करणारे आणि अतिथी तज्ज्ञ सल्ला आणि अवाजवी उलाढाल वाढविणारे अर्थात ‘व्हॉल्यूम क्रिएटर्स’ अशा श्रेणी केल्या आहेत. नफा कमावणाऱ्या, म्हणजेच प्रॉफिट मेकर्स श्रेणी यात ज्यांनी कंपन्यांच्या समभागांच्या शिफारशींच्या आगाऊ (इनसाइडर) माहितीच्या आधारे कथितपणे केलेले व्यवहार करून नफा कमावला ते येतात. दुसऱ्या श्रेणीमध्ये समभाग शिफारशींच्या आगाऊ माहितीच्या आधारे नफा कमावण्यास कथितपणे साहाय्य केले ते अतिथी तज्ज्ञ येतात. तिसऱ्या वर्गात अशा कथित अतिथी तज्ज्ञांचा समावेश आहे, जे वृत्तवाहिन्यांवर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सामील झाले आणि त्यांनी प्रेक्षकांना समभागांच्या शिफारशी केल्या. समाजमाध्यमांवर स्वतःची उपस्थिती व व्यापक अनुनय असणाचा गैरफायदा त्यांच्याकडून उचलला जातो.
gaurav.muthe@expressindia.com