मागील काही काळापासून चालकविरहित मोटारींनी सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. अनेक देशांमध्ये चालकविरहित मोटारी रस्त्यांवर धावत असून, त्यांच्या नियमावलीकडे नियामक फारसे लक्ष देत नसल्याचे चित्र होते. अनेक मोठ्या वाहन व तंत्रज्ञान कंपन्या चालकविरहित मोटारींच्या चाचण्या घेण्यासोबत त्या रस्त्यावर आणण्याचे निर्णय स्वत:च घेताना दिसत. आता मात्र नियामकांनी याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेतील नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशन (एनएचटीएसए) या नियामक संस्थेने सर्वच मोठ्या कंपन्यांच्या चालकविरहित मोटारींच्या चाचण्यांची चौकशी सुरू केली आहे. त्यात अत्याधुनिक चालक सहाय्यता यंत्रणा (एडीएएस) ही संगणकीय प्रणाली असलेल्या मोटारींचाही समावेश आहे. यामुळे टेस्ला, फोर्ड, वेमो, क्रूझ आणि झूक्स या कंपन्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. चालकविरहित मोटारींमुळे झालेल्या अपघातांची चौकशी आता सुरू झाली आहे.
नेमकी चौकशी कशाची?
चालकविरहित मोटारींच्या अपघातांची अधिक माहिती नियामकांनी वाहन निर्मिती कंपन्यांकडून मागविली आहे. कंपन्यांकडून करण्यात येत असलेल्या दाव्याप्रमाणे खरेच या मोटारी सुरक्षित आहेत का, याची चौकशी करण्यात येत आहे. या मोटारींचे बेभरवशाचे वर्तन मागील काही अपघातांमध्ये समोर आले आहे. त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यासोबत त्या रस्त्यांवरील स्थिर वस्तूंवर आदळल्याचे प्रकारही घडले आहे. याबाबतचे अनेक व्हिडीओही समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात आहेत. चालकविरहित मोटारी आणि एडीएएस प्रणाली स्तर २ असलेल्या हजारो मोटारी सध्या रस्त्यांवर धावत आहेत. आता कंपन्यांना या मोटारींच्या अपघातांनंतर ३० सेंकदांत त्याबद्दल नियामकांना माहिती कळवावी लागेल.
हेही वाचा >>> विश्लेषण : भ्रष्टाचारात राजकीय पक्षच ‘आरोपी’ ठरू शकतो?
अपघाताची तात्काळ चौकशी?
चालकविरहित आणि एडीएएस प्रणाली असलेल्या मोटारीचा अपघात झाल्यानंतर आता तात्काळ नियामकांकडून चौकशी सुरू होईल. अपघाताची कारणे, मोटारीतील यंत्रणा आणि प्रत्यक्ष घडलेली घटना याची कसून तपासणी केली जाईल. त्यातून नेमका अपघात कशामुळे घडला, याचा शोध घेता येणार आहे. याचबरोबर या मोटारींनी वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्यास त्यांच्या व्हिडीओमधूनही त्याबद्दलची माहिती नियामक जमा करीत आहेत. समाजमाध्यमावर अनेक जण असे व्हिडीओ टाकत असून, त्याची दखल नियामक घेत आहेत. त्यामुळे अपघाताची तत्काळ चौकशी करून त्यामागील कारणांचा शोध घेण्यावर भर दिला जात आहे.
वेमो कंपनीवर जास्त लक्ष का?
वेमो कंपनीच्या चालकविरहित मोटारींशी निगडित २२ घटनांची नियामकांनी नोंद घेतली आहे. त्यात मोटारींचे वर्तन अचानक बेभरवशाचे बनल्याचे निदर्शनास आले आहे. याचबरोबर त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचेही समोर आले आहे. या मोटारींचे वर्तन आधी बेभरवशाचे बनते आणि नंतर अपघात घडतात, हे सध्या उघडकीस आले आहे. या मोटारी स्थिर वस्तूंवर आदळलेल्या आहेत. काही घटनांमध्ये या मोटारी पूर्णपणे चालकविरहित तर काहींमध्ये त्यांचे निरीक्षण करण्यासाठी चालक आतमध्ये बसलेला होता. चालक बसलेल्या मोटारींच्या अपघाताआधी त्यातील चालकविरहित यंत्रणा बंद पडलेली आढळून आली. सुरक्षिततेचे सर्व नियम पाळल्याचा दावा कंपनीने केला असून, नियामकांना चौकशीत सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.
हेही वाचा >>> राजकारणी प्रवासासाठी हेलिकॉप्टरलाच पसंती का देतात?
डेटा गोपनीयतेचा अडसर?
अनेक कंपन्या त्यांच्या चालकविरहित मोटारींची सर्व माहिती नियामकांना देण्यास तयार नाहीत. त्या विदा (डेटा) गोपनीयतेचा मुद्दा मांडत आहेत. त्यामुळे अपघातानंतर सध्या नियामकांना मिळणारी माहिती ही अर्धवट असते. त्यात मोटार किती अंतर चालविण्यात आली यासह इतर माहिती दिलेली नसते. याचबरोबर ग्राहकांनी केलेल्या तक्रारी आणि इतर माध्यमांतून मिळणाऱ्या माहितीवर नियामकांना अवलंबून राहावे लागते. कारण कंपन्या गोपनीय व्यवसाय माहिती असल्याचे सांगत संपूर्ण माहिती देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे विदा गोपनीयतेचा मोठा अडसर या मोटारींच्या अपघाताच्या चौकशीमध्ये आहे.
सुरक्षिततेचा मुद्दा किती गंभीर?
सध्या रस्त्यावर धावणाऱ्या चालकविरहित मोटारींची संख्या कमी आहे. त्या नेहमीच्या मोटारींप्रमाणे चालत असल्याचे सगळ्यांचे मत आहे. प्रत्यक्षात या मोटारींचे वर्तन अचानक बेभरवशाचे होऊन अपघात घडत आहेत. टेस्ला कंपनीच्या ऑटोपायलट या एडीएएस प्रणालीतीलही काही त्रुटी आता नियामकांच्या नजरेस आल्या आहेत. गेल्याच वर्षी टेस्लाने ही प्रणाली बसविलेल्या मोटारी परत बोलावून त्यातील संगणकीय प्रणाली अद्ययावत केली होती. आता अद्ययावत प्रणाली असलेल्या मोटारींशी निगडित अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे चालकविरहित अथवा एडीएएस प्रणाली असलेल्या मोटारींमुळे रस्ते सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी नियामकांनी उचललेले पाऊल त्यामुळेच महत्त्वाचे असून, ते या अत्याधुनिक मोटारींच्या भविष्याची दिशा ठरविणारे असेल.
sanjay.jadhav@expressindia.com