प्रसाद श. कुलकर्णी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याशी इस्रायल-हेजबोला संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बोलताना या जगात दहशतवादाला थारा नाही, असे उद्गार काढले. साऱ्या जगासमोर दहशतवादाचे मोठे आव्हान असताना, हा धोका संपुष्टात का येत नाही, याचे उत्तर दहशतवादाची व्याख्या कोण, कशी करतो, त्यात दडले आहे.

दहशतवादाच्या व्याख्येवर एकमत का नाही?

दहशतवादाचे आव्हान साऱ्या जगासमोर आहे. मात्र, सर्वांना असलेला हा धोका संपुष्टात येत नाही. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रांमध्ये (यूएन) दहशतवादाच्या व्याख्येवर आजही एकमत नाही. दहशतवाद हा प्रकार सामान्य गुन्ह्याच्या स्वरुपात मोडत नाही. दहशतवादामागे अनेकदा राजकीय हेतू, उद्दिष्टे दडलेली असतात. अमेरिकेसह विविध देशांनी त्यांच्या कायद्यांमध्ये दहशतवादाची व्याख्या केली आहे. त्यानुसार देशांनी दहशतवादविरोधी धोरणे आखली आहेत. भारताने  दहशतवादाचा सामना दीर्घ काळ केला. आजही करीत आहे. मात्र, दहशतवाद हा शब्द कायद्याच्या संहितेत दीर्घ काळ नव्हता. ‘टाडा’, ‘पोटा’ कायद्यांमध्ये याची व्याख्या करण्याचा प्रयत्न झाला. नव्याने लागू झालेल्या भारतीय न्याय संहितेत दहशतवादाचा उल्लेख केला आहे. भारतात सध्या दहशतवादी घटना बेकायदा कारवाया (प्रतिबंधक) कायदा अर्थात ‘यूएपीए’ आणि इतर कलमांखाली नोंदविल्या जातात. दहशतवादाच्या जगभरात दोनशेहून अधिक व्याख्या केल्या आहेत. दहशतवाद हे एक अपारंपरिक युद्धच आहे. त्याची व्याप्ती मोठी आहे. त्याचा सामना बहुस्तरावर करावा लागतो. पारंपरिक युद्धासारखे आमनेसामने लढून दहशतवाद संपुष्टात आणता येत नाही.

हेही वाचा >>> विश्लेषण : स्वायत्त संस्थांसाठी ‘समान धोरणा’चा स्पर्धा परीक्षार्थींना फटका कसा?

दहशतवादाचे प्रकार किती आहेत?

दहशतवादाचे विविध प्रकार आहेत. यामध्ये विचारसरणीवर आधारित म्हणजे डाव्या-उजव्या विचारसरणीचा दहशतवाद, राष्ट्रपुरस्कृत दहशतवाद, धर्माचा आधार घेऊन केलेला दहशतवाद, फुटिरतावादी गटांचा दहशतवाद, नार्को दहशतवाद, सायबर दहशतवाद आदी प्रकारांचा समावेश करता येतील. वेगळ्या देशाची मागणी, धर्मावर आधारित देशाची मागणी, एखाद्या ठरावीक विचारसरणीवर आधारित देशाची व्यवस्था असावी याचा दुराग्रह, राष्ट्रपुरस्कृत दहशतवाद अर्थात एखाद्या देशाचा द्वेष बाळगून त्या देशाची व्यवस्था खिळखिळी करण्यासाठी परराष्ट्र धोरणाचाच एक भाग म्हणून दहशतवादाचा अवलंब आदींचा यामध्ये समावेश करता येईल. दहशतवादाचे असे विविध प्रकार जगभरात घडले आहेत आणि त्यामुळे मोठे संघर्ष आजवर निर्माण झाले आहेत.

दहशतवादाची पार्श्वभूमी काय आहे?

जगामध्ये दहशतवादी कृत्ये नवी नाहीत. दहशतवाद हा शब्द अस्तित्वात नसतानाही अशी कृत्ये घडत होती. मात्र, सामान्यतः फ्रेंच राज्यक्रांतीनंतर दहशतवाद हा शब्द चर्चेला आला, असे मानले जाते. दहशतवादी कुणाला म्हणायचे, याचे संदर्भ सातत्याने बदलताना दिसतात. अगदी सुरुवातीच्या काळात दहशतवादाला सकारात्मक अर्थ होता. देशाची व्यवस्था नीट राखण्यासाठी प्रशासनाचाच एक भाग म्हणून याला गणले जात होते. नंतरच्या काळात याचे संदर्भ बदलले. ‘प्रपोगंडा ऑफ द डीड’, वसाहतवादाच्या काळात ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्यांना दहशतवादी ठरवले गेले. शीतयुद्ध काळात पाश्चिमात्य देश आणि पूर्वीचा सोव्हिएत संघराज्य यांच्यातील एकमेकांवर कुरघोडी आणि त्यासाठी त्यांनी अवलंबलेले तंत्र जगाने पाहिले. छुपे युद्ध म्हणूनही दहशतवादाकडे पाहिले जाते. आज, नवदहशतवादात अधिकाधिक लोकांना हानी पोहोचविण्याचा उद्देश दहशतवाद्यांचा दिसतो.

हेही वाचा >>> पाकिस्तानचं सिद्दीकी कुटुंब ‘शर्मा’ बनून भारतात का आले? मुस्लीम असूनही शेजारी देश सोडण्याचं खरं कारण काय?

दहशतवादी नेमके कोण?

राष्ट्रीय सुरक्षेच्या चौकटीत प्रत्येक देशाच्या दहशतवादाच्या व्याख्या बऱ्यापैकी ठरल्या आहेत. देशाच्या सार्वभौमत्वाला धोका, देशाचे ऐक्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी हिंसेचा वापर आदी बाबी दहशतवादाच्या म्हणून प्रामुख्याने गणल्या जातात. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी कुणाला म्हणावे, यावर एकमत नसल्याने गुंतागुंत वाढते. भारतावर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांकडे बघण्याचा पाकिस्तानचा दृष्टिकोन कोणता असतो? हेजबोला गट इस्रायलसाठी दहशतवादी गट ठरतो. मात्र, इराणचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणता असतो? इस्लामिक स्टेट, अल् कैदा किंवा पाकपुरस्कृत लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेत सामील होणारे दहशतवादी नेमकी कुठली प्रेरणा घेऊन जातात? या साऱ्या दहशतवाद्यांना आर्थिक रसद कशी पुरवली जाते? मसूद अझर या कुख्यात दहशतवाद्याला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात चीन खोडा का घालत आहे? या प्रश्नांची उत्तरे एक प्रकारे उघड गुपितच आहे. आंतरराष्ट्रीय वर्चस्व राखण्यासाठीची चुरस आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतागुंतीच्या भूराजनीतीचे दर्शन यातून घडते. या गुंतागुंतीच्या वातावरणात दहशतवाद ही गंभीर समस्या तशीच राहते आणि दहशतवादी नेमके कुणाला म्हणायचे, यावर चर्चा करायलाही जगातल्या बड्या देशांना फुरसत मिळत नाही.

आता करायचे काय?

आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादावर एकमत झाले, तर दहशतवादाला एकत्रित विरोध करता येऊ शकेल. मात्र, प्रत्यक्षात ते शक्य आहे का? राष्ट्रीय सुरक्षेच्या चौकटीतच प्रत्येक देश आपापल्या स्तरावर हा मुद्दा हाताळतील, असे सध्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य, परस्पर मानवतावादी दृष्टिकोन दहशतवादाचा पराभव करतील. महासत्तांनी त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असून, अप्पलपोटाचे राजकारण त्यासाठी बाजूला ठेवण्याची गरज आहे.

prasad.kulkarni@expressindia.com