गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ होत असून नागरिक असह्य उकाड्याने हैराण झाले आहेत. त्याचबरोबर मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही धरणांमधील जलसाठा दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठी साधारण १४ टक्के होता. त्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट घोंघावू लागले आहे. पाणी कपात कशी लागू करण्यात येते, तिचे प्रमाण कसे निश्चित करण्यात येते, मुंबई महानगरपालिका त्यासाठी कोणते निकष विचारात घेते, त्याचबरोबर राखीव साठा म्हणजे नेमका काय प्रकार आहे, राखीव कोट्यातील पाणी कसे आणि किती प्रमाणात वापरण्यात येते याबाबत आढावा.
मुंबईकरांना पाणीपुरवठा किती आणि कसा?
मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणांतून उचलण्यात येणारे पाणी मुख्य जलवाहिन्यांच्या माध्यमातून भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथे जलशुद्धीकरण प्रक्रिया केलेले पाणी लहान – मोठ्या जलवाहिन्यांच्या जाळ्यातून मुंबईकरांच्या घराघरात पोहोचविले जाते. एकाच वेळी अवघ्या मुंबईला पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने विभागवार पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार २४ तास अखंड विविध विभागांना पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईला दररोज नित्यनियमाने ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.
हेही वाचा >>> राजकारणी प्रवासासाठी हेलिकॉप्टरलाच पसंती का देतात?
पाणी गळती आणि चोरीच्या घटना
मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्य, मोठ्या आणि लहान जलवाहिन्यांचे जाळे उभारण्यात आले आहे. अनेक जलवाहिन्या ब्रिटिशकालीन आहे. त्यामुळे त्या जीर्ण झाल्या आहेत. जीर्ण जलवाहिन्यांतून पाणी गळती होत आहे. त्याचबरोबर झोपडपट्ट्यांमधून जाणाऱ्या जलवाहिन्या फोडून पाण्याची चोरी करण्यात येत आहे. गळती आणि चोरीला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने निरनिराळ्या उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून जीर्ण जलवाहिन्या बदलण्याची, त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. मुंबईकरांचे पाणी चोरून विक्री करणाऱ्या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी जल खात्याने भरारी पथके तैनात केली आहेत.
सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी किती साठा?
पावसाळ्यात सात धरणांमध्ये साठणाऱ्या पाण्यावरच वर्षभर मुंबईकरांची तहान भागवावी लागते. पाण्यासाठी अन्य स्रोत उपलब्ध नाहीत. पावसाळा संपताच १ ऑक्टोबर रोजी धरणांमधील पाणी साठ्याचा आढावा घेण्यात येतो. धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असेल तर पुढील वर्षभर मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा करणे महानगरपालिकेला शक्य होते. त्यापेक्षा कमी साठा तलावात उपलब्ध असल्यास पाण्याचे नियोजन करूनच पुरवठा करावा लागतो.
पाणी कपात कशी निश्चित?
प्रत्यक्ष धरण आणि आसपासच्या क्षेत्रात पडणाऱ्या पावसावर धरणातील जलसाठा अवलंबून असतो. पावसाने ओढ दिली तर धरणातील जलसाठ्यावर परिणाम होतो. एखाद्या वर्षी पाऊस कमी झाला तर धरणांमध्ये आवश्यक तेवढे पाणीसाठा होत नाही. अशा वेळी सातही धरणांतील उपलब्ध पाणीसाठा, ३१ जुलैपर्यंतचा कालावधी विचारात घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागते. त्यानुसार काही वेळ दरदिवशी ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे ५, १०, १५ टक्क्यांपर्यंत पाणी कपात करावी लागते. काही वेळा धरणांतील साठा फेब्रुवारी, मार्च दरम्यान कमी होऊ लागतो. कडक उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन जलद गतीने होते आणि त्यामुळे साठा झपाट्याने कमी होतो. अशा वेळी पुन्हा जलसाठा, उर्वरित दिवसांचा आढावा घेऊन पाणी कपातीचे नियोजन करावे लागते.
हेही वाचा >>> विश्लेषण : भ्रष्टाचारात राजकीय पक्षच ‘आरोपी’ ठरू शकतो?
राखीव कोटा म्हणजे काय?
राज्य सरकारने आपल्या धरणांतील पाणी आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याची तरतूद केली आहे. मात्र त्यासाठी महापालिकेला आपल्या धरणांतील पाण्याचा आढावा घेऊन राखीव कोट्यातील पाणी मिळविण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. आतापर्यंत मुंबईत अभूतपूर्व अशी पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारने आपल्या धरणांतील राखीव कोट्यातील पाणी मुंबईला पुरविण्यासाठी महापालिकेला परवानगी दिली आहे.
यंदा राखीव कोट्यातील किती पाणी?
यंदा महानगरपालिकेच्या सात धरणांमध्ये १३.९८ म्हणजेच दोन लाख दोन हजार ३६६ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणांमध्ये याच दिवशी २०२३ मध्ये २०.२५ टक्के, तर २०२२ मध्ये २३.६९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा उपलब्ध पाण्याचा आढावा घेऊन महापालिकेने राखीव कोट्यातील पाणी मिळविण्यासाठी राज्य सरकारला विनंती केली होती. राज्य सरकारने अप्पर वैतरणामधील ९१ हजार १३० दशलक्ष लिटर आणि भातसामधून एक लाख ३७ हजार दशलक्ष लिटर राखीव कोट्यातील पाणी वापरण्यास महानगरपालिकेला परवानगी दिली आहे. मुंबईकरांसाठी महापालिकेच्या धरणांतील दोन लाख दोन हजार ३६६ दशलक्ष लिटर आणि राखीव कोट्यातील दोन लाख २८ हजार १३० दशलक्ष लिटर असे एकूण चार लाख ३० हजार ४९६ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. हा पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल असा दावा महानगरपालिकेकडून वारंवार करण्यात येत आहे. त्यामुळेच मुंबईत तूर्तास पाणी कपात टळली आहे.