प्रज्ञा तळेगावकर
झोमॅटो फूड डिलिव्हरी कंपनीने केवळ शाकाहारी ग्राहकांना अन्न पदार्थ पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्यांना हिरव्या रंगाचा पोषाख देण्याचा निर्णय अलीकडे घेतला होता. मात्र हा निर्णय झोमॅटोला काही तासांतच मागे घ्यावा लागला. आता झोमॅटोचे सर्व ‘डिलिव्हरी बॉय’ पूर्वीप्रमाणे लाल पोषाखातच दिसतील, असे कंपनीने तात्काळ जाहीर केले. पोषाखातील बदलानंतर असे काय झाले की कंपनीला निर्णय मागे घ्यावा लागला, त्याविषयी…
हिरवा पोषाख कशासाठी?
झोमॅटोचे कार्यकारी अधिकारी मुख्य दीपंदर गोयल यांनी शाकाहारी ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘प्युअर व्हेज मोड’ नावाची नवीन सेवा सुरू नुकतीच सुरू केली आहे. या सेवेद्वारे केवळ शाकाहारी जेवण देणाऱ्या हॉटेलची माहिती मिळणार आहे. तसेच, या मोडद्वारे देण्यात आलेली ऑर्डर झोमॅटोच्या खास ‘प्युअर व्हेज फ्लीट’द्वारे हाताळली जाणार होती. तसेच ग्राहकांनी नोंदवलेली मागणी विशिष्ट हिरवा पोषाख घातलेले डिलिव्हरी बॉय हिरव्या रंगाच्या बॉक्समधून ती पोहोचवणार होते. त्यामुळे शाकाहारी अन्न पदार्थांचा पुरवठा केला जात असल्याचे स्पष्ट होणार होते.
हेही वाचा >>> अरविंद केजरीवालांनी राजीनामा दिल्यास ‘आप’चे नेतृत्व कोण करणार? लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार?
हा निर्णय मागे घेताना गोयल काय म्हणाले?
हिरव्या रंगाच्या पोषाखाबाबतचा निर्णय रद्द करताना गोयल म्हणाले की, आम्ही शाकाहारी लोकांसाठी एक ताफा कायम ठेवणार आहोत. आमचे सर्व रायडर्स – आमचा नियमित डिलिव्हरी ताफा आणि आमचा शाकाहारी डिलिव्हरी ताफा दोन्ही लाल रंगाचा पोषाख परिधान करतील. शाकाहारी अन्न पदार्थ पोहोचविणारा त्याच्या पोषाखामुळे ओळखता येणार नाही. परंतु ॲपवर दर्शवेल की तुमची शाकाहारी मागण्या केवळ ‘व्हेज फ्लीट’द्वारे दिल्या जातील. गोयल यांनी ‘प्युअर व्हेज मोड’ आणि ‘प्युअर व्हेज फ्लीट’ सेवा देण्याचेही कारण स्पष्ट केले. ‘अन्न पदार्थांच्या गळतीमुळे, सांडल्यामुळे त्याचा सुगंध बरेचदा बॉक्समध्ये रेगाळत राहतो आणि त्यानंतरच्या मागणीचा पुरवठा करताना त्याच्यावर परिणाम होतो. या कारणास्तव, आम्ही शाकाहारी मागणीसाठी वेगळी सेवा देऊ केली.
हेही वाचा >>> महेंद्रसिंह धोनीने उत्तराधिकारी म्हणून ऋतुराज गायकवाडलाच का निवडले?
हिरवा पोषाख बदलण्यावर गोयल यांचे म्हणणे काय?
लाल पोषाख परिधान केलेल्या ‘डिलिव्हरी बॉय’ना बऱ्याच सोसायट्या, भागांत आणि बऱ्याच ठिकाणी परवानगी दिली जाणार नाही. याने केवळ भेदा-भेद वाढेल, अशी टीका समाज माध्यमांवर झाल्यानंतर गोयल यांनी त्यांची चूक मान्य केली. ‘आमच्या रायडर्सची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लाल पोषाख घातलेले डिलिव्हरी बॉय त्यांच्या पोषाखामुळे अडचणीत येऊ शकतात. तसेच आमचे काही ग्राहक त्यांच्या घरमालकांककडून, सोसायट्यांकडून अडचणीत येऊ शकतात. तसे झाल्यास ती आमची चूक ठरेल, असे सांगत गोयल यांनी समाज माध्यमांचेही आभार मानले. ‘तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्या ऐकण्यात आम्हाला कमीपणा वाटत नाही. भविष्यातही आम्ही तुम्हाला उत्तम सेवा देत राहू,’ असे गोयल यांनी समाज माध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
समाज माध्यमावर कोणत्या प्रतिक्रिया?
‘लाल पोषाख परिधान करणाऱ्या डिलिव्हरी बॉयना ‘शुद्ध शाकाहारी’ सोसायट्या हुसकावून लावतील’, ‘पोषाखावरून झोमॅटो भेदाभावाला प्रोत्साहन देत आहात, त्यातून तुमच्या काही ग्राहकांना बहिष्कृत केल्या जाणाचा धोका संभावतो’ अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तर काहींनी गोयल यांनी ‘प्युअर व्हेज’ फीचरची ओळख करून देण्यासाठी दिलेल्या आकडेवारीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गोयल यांनी दावा केला होता की, जागतिक स्तरावर भारतात शाकाहारी लोकांची सर्वाधिक टक्केवारी आहे. टीकाकार इंटरनेट वापरकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले, की भारतीय लोकसंख्येपैकी ५० टक्क्यांहून अधिक लोक मांसाहारी आहेत.