संदीप नलावडे
भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्रयान-३ मोहिमेला वेग आला असून १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता ‘चंद्रयान-३’ अंतराळात प्रक्षेपित केले जाणार असल्याचे इस्रोने जाहीर केले. हे यान २३ ऑगस्टला चंद्रावर उतरण्याची शक्यताही इस्रोकडून व्यक्त करण्यात आली आहे. भारताच्या या नव्या मोहिमेविषयी..
‘चंद्रयान-३’ मोहीम काय आहे?
अंतराळ क्षेत्रात प्रगती करण्यासाठी भारताने विविध मोहिमा आखल्या आहेत. पहिले चंद्रयान यशस्वी झाल्यानंतर भारताने दुसरी चंद्रयान मोहीम राबवली, मात्र तांत्रिक बिघाडामुळे शेवटच्या क्षणी ही मोहीम अयशस्वी झाली. २२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित केलेली चंद्रयान-२ मोहीम ६ सप्टेंबरच्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर अंशत: अयशस्वी झाली होती. मात्र त्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नियोजित चंद्रयान-३ मोहीम हाती घेतली असून ती यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. १२ ते १९ जुलैदरम्यान ही अंतराळ मोहीम प्रक्षेपित होणार असून चंद्रावर अंतराळ यान उतरवण्याचा भारताचा दुसरा प्रयत्न असेल. इस्रोने ५ जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रयान-३ अंतराळयानाला ‘व्हेईकल मार्क-३’ (एलव्हीएम-३) या प्रक्षेपण यानासह यशस्वीरीत्या एकत्रित केल्याची घोषणा केली.
‘एलव्हीएम-३’शी ती का जोडली आहे?
चंद्रयान-३ या यानात लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉडय़ुल आहे, ते स्वत:हून अंतराळात जाऊ शकत नाही. त्यास ‘एलव्हीएम-३’सारख्या प्रक्षेपण यानाद्वारेच हे यान अंतराळात झेपावू शकते. ‘एलव्हीएम-३’ या प्रक्षेपण यानात शक्तिशाली प्रणोदन प्रणाली (पुढे ढकलण्याची क्रिया) असते, जी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर मात करून उपग्रहासारख्या अवजड वस्तूंना अवकाशात उचलण्यासाठी आवश्यक असलेली प्रचंड ऊर्जा निर्माण करू शकते. ‘व्हेईकल मार्क-३’ हे प्रक्षेपण यान शक्तिशाली असून ‘चंद्रयान-३’ अवकाशात सोडण्यासाठी ते महत्त्वपूर्ण आहे.
‘एलव्हीएम-३’ म्हणजे काय?
‘एलव्हीएम३’ हे इस्रोचे महत्त्वपूर्ण प्रक्षेपण यान आहे. या प्रक्षेपण यानाची उंची ४३.५० मीटर उंच असून त्याचे वजन ६४० टन आहे. हे प्रक्षेपण यान आठ हजार किलोग्रॅम वजन पेलण्यासही सक्षम आहे. हे भारताचे सर्वात वजनदार प्रक्षेपण यान आहे. त्याचे तीन स्तर आहेत. या प्रक्षेपण यानाच्या माध्यमातून इस्रोने ५ जून २०१७ रोजी सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘जीएसएलव्ही एमके३’ची पहिली कक्षीय चाचणी यशस्वी प्रक्षेपित केली होती. ‘चंद्रयान-३’ हे ‘एलव्हीएम३’चे सातवे प्रक्षेपण असेल. २०१९ मध्ये चंद्रयान-२चे प्रक्षेपणही याच प्रक्षेपणास्त्राद्वारे झाले होते. आता कमी उंचीच्या कक्षेत (लो अर्थ ऑर्बिट) अनेक उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता प्रदर्शित केली आहे. या प्रक्षेपण यानात नजीकच्या काळात अनेक सुधारणा करण्यात आल्या असून मानवी मोहिमांसाठी ते अधिकाधिक उपयुक्त करण्यात आल्याचे इस्रोतर्फे सांगण्यात आले. मार्चमध्ये ‘एलव्हीएम ३’ या सर्वात मोठय़ा प्रक्षेपकाच्या मदतीने ब्रिटनस्थित ‘वनवेब ग्रूप कंपनी’चे ३६ इंटरनेट उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले होते.
‘चंद्रयान-३’चे प्रक्षेपण कधी आहे?
‘चंद्रयान-३’चे प्रक्षेपण जुलै महिन्याच्या मध्यात होईल, असे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले. त्यानुसार १३ ते १९ जुलैदरम्यान चंद्रयान-३ प्रक्षेपित करण्यात येण्याची शक्यता आहे. या यानाच्या प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. इस्रोकडून चंद्रयान-३ हे ‘एलव्हीएम-३’ला जोडल्यानंतर पुढील चाचणी आणि तपासणी सुरू आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘चंद्रयान-३’ प्रक्षेपित करण्यात येईल.
हे यान चंद्रावर काय करणार आहे?
‘चंद्रयान-१’ आणि ‘चंद्रयान-२’ यांच्याद्वारे चंद्राच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात येणार होता. मात्र चंद्रयान-३ प्रत्यक्ष चंद्रावर उतरून तेथील वातावरण आणि परिस्थितीचा अभ्यास करणार आहे. ‘चंद्रयान-३’ हे अगदी ‘चंद्रयान-२’सारखेच असणार आहे. मात्र यावेळी फक्त लँडर-रोव्हर आणि प्रोपल्शन मॉडेल असेल. ‘चंद्रयान-३’ हे यान प्रॉपलंट मॉडय़ुल ‘लँडर’ आणि ‘रोव्हर’ला चंद्राभोवतील १०० किलोमीटरच्या कक्षेत नेईल आणि ‘चंद्रयान-३’ अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. ‘चंद्रयान-३’मध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही. कारण चंद्रयान-२च्या ऑर्बिटरकडून यासाठी मदत घेण्यात येणार आहे.
sandeep.nalawade@expressindia.com