ज्ञानेश भुरे
भारतीय महिला संघाने आशियाई सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत विजतेपेद मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. गेल्या वर्षी थॉमस करंडक स्पर्धेतील पुरुष संघाचे आणि आता या वर्षी आशियाई स्पर्धेतील महिला संघाचे सांघिक यश भारताच्या बॅडमिंटनमधील प्रगतीचा चढता आलेखच सिद्ध करत आहे. या खेळात भारत महासत्ता ठरू लागल्याची ही लक्षणे आहेत का याविषयी…
आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेतील कामगिरी मोलाची का?
बहुतेक सर्वच संघ या स्पर्धेत आपल्या दुसऱ्या फळीचा कस अनुभवत होते. भारताचाही याला अपवाद नव्हता. अन्य संघ दुसऱ्या फळीचे असले, तरी त्यांचे सहभागी खेळाडू हे भारतीय खेळाडूंपेक्षा जागतिक क्रमवारीत निश्चितच वरच्या क्रमांकावर होते. भारतीय खेळाडूंमध्ये अपवाद फक्त ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधू, अश्विनी पोनप्पा या दोघींचा होता. सिंधूही दुखापतीनंतर प्रथमच कोर्टवर उतरत होती. अश्विनी, त्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, अस्मिता चलिहा यांना अनुभव असला, तरी तो दांडगा नव्हता. अनमोल खरब तर वयाच्या १७ व्या वर्षी प्रथमच खेळत होती. त्यामुळेच प्रथम चीन, नंतर हाँगकाँग, मग जपान आणि अखेरीस थायलंड अशा मातब्बर संघांवर मात करून भारताने या विजेतेपदाला गवसणी घातली.
हेही वाचा… चिनी ‘बीवायडी’ मोटर्सने हादरवले ‘टेस्ला’चे साम्राज्य! जगात अव्वल, लवकरच भारतात…
या यशाचा किती फायदा?
आतापर्यंत भारताचा एखाद दुसरा खेळाडू बॅडमिंटनमध्ये चमकत होता. प्रकाश पडुकोण, सय्यद मोदी असे एकेरीतील खेळाडू चांगले होते. दुहेरीतील जोड्या कमी पडायच्या. महिलांत सायना नेहवाल, सिंधू अशा खेळाडू चमकल्या. तरी येथेही दुहेरीतील यश नव्हतेच. सांघिक परिपूर्णतेचा अभाव होता. ही उणीव पुरुष संघाने गेल्या वर्षी थॉमस करंडक जिंकून दूर केली. तेव्हा सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीची सुरेख साथ मिळाली. या वेळी महिला संघाला गायत्री गोपीचंद-त्रिसा जॉली या दुहेरीच्या जोडीने मिळविलेल्या यशाची तशीच जोड मिळाली. एकेरीबरोबर दुहेरीचे महत्त्व पटू लागल्यामुळे संघाची सांघिक ताकद वाढली आहे.
युवा खेळाडूंचे यश आशादायी…
महिला संघाच्या युवा खेळाडूंचा सहभाग आणि यशाचा वाटा मोठा होता. गायत्री, त्रिसा या साधारण २०-२१ वर्षांच्या आहेत. अनमोल खरब ही तर १७ वर्षांची आहे. म्हणजे एकामागून एक पिढी तयार होत असल्यामुळे आपली जगातील कुठलेही आव्हान पेलण्याची तयारी असल्याचे चित्र या स्पर्धेतून ठळकपणे समोर आले. हे यश नक्कीच स्पृहणीय आणि प्रेरणादायी ठरते. एच. एस. प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन हे पुरुष खेळाडू वर्चस्व राखत असताना सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांनी महिला संघाची आघाडी सांभाळली. व्यावसायिक विजेतेपदांबरोबर जागतिक विजेतेपद, ऑलिम्पिक पदक अशी मजल या दोघींनी मारली. वाढत्या वयाचा परिणाम लक्षात घेता सायना नेहवाल निवृत्त झाल्यात जमा आहे. सिंधूचे वयदेखील वाढत आहे. मध्यंतरी टाचेच्या दुखापतीचा तिच्या कामगिरीवर परिणाम झाला. सिंधूदेखील थकली असेच वाटत होते. पण, खेळाडूच्या कारकिर्दीत असे ‘बॅडपॅच’ येत असतातच. यातून बाहेर पडत सिंधूने या स्पर्धेत जरूर यश मिळविले. पण अस्मिता, अनमोल, गायत्री, त्रिसा या आता खेळत आहेत. त्याचवेळी मालविका बनसोड, आकर्षी काश्यप, तारा शहा अशा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी सज्ज आहेत. पुढची पिढी तयार होत असल्याचे हे चित्र आहे.
हेही वाचा… विश्लेषण : भारताने इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ शैलीला मोडीत काढले का?
दुहेरीचे यश कसे महत्त्वाचे ठरते?
बॅडमिंटन हा वैयक्तिक क्रीडा प्रकार दिसत असला, तरी सांघिक स्पर्धांमुळे सांघिक महत्त्व वाढू लागले आहे. आतापर्यंत भारतीय संघ या आघाडीवर मागे होता. सात्त्विक-चिराग यांनी ही उणीव भरून काढण्यास सुरुवात केली. गायत्री-त्रिसाने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले. टेनिसमध्ये एकेरीतील खेळाडू दुहेरीत खेळू शकतो. पण येथे तसे नाही. दुहेरीचे तंत्रच वेगळे आहे. त्यांच्या खेळाची जडणघडणच वेगळी आहे. प्रशिक्षणाची पद्धतीही वेगळी आहे. त्यामुळे आजपर्यंत भारत सांघिक आघाडीवर मागे होता. हे चित्र बदलत आहे. आशियाई स्पर्धेत त्रिसा-गायत्रीने हाँगकाँग, चीन, थायलंड संघातील वरच्या क्रमांकाच्या खेळाडूंना पराभूत केले. हे सर्वात लक्षवेधी ठरले. दुहेरीच्या यशाने संघाला सांघिक परिपूर्णता मिळते.
भारतात बॅडमिंटनची स्थिती कशी आहे?
भारतीय संघाचे हे यश पुढची पिढी तयार व्हायला सुरुवात झाल्याचे निदर्शक आहे. भारतीय खेळाडूंना आता संधी खूप मिळत आहेत. जुन्या काळात परदेशात खेळायला जाणे कठीण होते. खर्च परवडत नसायचा. पण आता तसे नाही. केंद्र सरकार खूप मदत करत आहे आणि त्याचे परिणाम दिसत आहेत. नुसती मदत मिळते आणि ती वाया चाललीये असे होत नाहीये. प्रशिक्षणासाठीदेखील आता परदेशात जावे लागत नाही. भारतात चांगल्या अकादमी निर्माण होत आहेत. भारतात दर्जेदार स्पर्धा भरविण्याचे वाढलेले प्रमाणही या प्रगतीचे एक कारण म्हणता येते. विशेष म्हणजे भारतातच आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे ७-८ खेळाडू असल्यामुळे खेळाडूंना देशातच चुरस वाढली आहे. बॅडमिंटन संघटनाही नियोजनबद्ध कार्यक्रम राबवत आहेत. आणि या संघटनेत खेळाडू आहेत हे सर्वात महत्त्वाचे.