रविवारी पहाटे इराणने इस्रायलवर सुमारे ३०० ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. अमेरिकेच्या मदतीने इस्रायली सैन्याने ९९ टक्के हल्ला निष्प्रभ केला. ‘आयर्न डोम’ या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेच्या नजरेतून केवळ काही क्षेपणास्त्रे निसटली. त्यात इस्रायलची अगदीच किरकोळ हानी झाली. मात्र यातील काही क्षेपणास्त्रे ही जॉर्डन या अरब राष्ट्राने पाडल्याचे समोर आल्यानंतर इराणने संतप्त प्रतिक्रिया देत थेट आपल्या या मित्रराष्ट्राला इशाराच दिला आहे. त्या वेळी नेमके काय घडले? इराणची क्षेपणास्त्रे जॉर्डनने नष्ट केली का? केली असतील तर त्याचे कारण काय आणि मुख्य म्हणजे यामुळे अरब जगतात मोठी फूट पडणार का, या प्रश्नांचा हा ऊहापोह…

जॉर्डन आणि इस्रायलचे संबंध कसे आहेत?

जॉर्डन देश ‘अरब लीग’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रसमूहाचा सदस्य आहे. १९४८ मध्ये इस्रायलची निर्मिती होत असताना जॉर्डनने पॅलेस्टिनींचे प्राबल्य असलेल्या प्रदेशावर आक्रमण केले. संयुक्त राष्ट्रांमध्ये यहुदी इस्रायल, अरब राष्ट्र आणि जेरुसलेम शहर असे त्रिभाजन करणारा ठराव संमत झाल्यानंतरच्या या युद्धात पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व जेरुसलेमवर जॉर्डनने ताबा मिळविला. १९५० साली हा प्रदेश अधिकृतपणे जॉर्डनचा भाग बनला. १९६७च्या सहा दिवस चाललेल्या इस्रायल-जॉर्डन युद्धात त्याला या भागावर पाणी सोडावे लागले. तेव्हापासून पश्चिम किनारपट्टी आणि जेरुसलेम इस्रायलच्या ताब्यात आहे. १९९४ साली जॉर्डनने इस्रायलबरोबर शांतता करार केला. इजिप्तनंतर असा करार करणारे हे दुसरे राष्ट्र होते. हा शांतता करार आजतागायत अस्तित्वात आहे. किंबहुना ३०९ किलोमीटरची जॉर्डनलगतची सीमा ही इस्रायलची सर्वांत शांत सीमा मानली जाते. हमासबरोबर युद्ध छेडल्यानंतरही या सीमेवर इस्रायलने केवळ तीन बटालियन तैनात केल्या आहेत.

munabam beach kearala controversy
मुनंबम जमीन वादावरून ख्रिश्चन आणि हिंदू एकवटले; नेमकं प्रकरण काय? देशभरात चर्चेत असलेला हा जमिनीचा वाद काय आहे?
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत…
carbon border tax
‘कार्बन बॉर्डर’ टॅक्स काय आहे? भारतासह चीन याचा विरोध का करत आहे?
Happy Children's Day 2024
Happy Children’s Day 2024:…तर भारत हा जादुई देश तुम्हाला हत्तीही पाठवेल! जगभरच्या मुलांना असे का वाटत होते?
loksatta analysis global foods mnc s selling less healthy products in India
बहुराष्ट्रीय खाद्य उत्पादक कंपन्या भारतात हलक्या प्रतीची उत्पादने विकतात? काय सांगतो नवा अहवाल?
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
batenge toh katenge slogan by bjp in maharashtra assembly election
‘बटेंगे…’चा मुद्दा राज्यातील प्रचारात केंद्रस्थानी कसा आला? भाजप आक्रमक, विरोधक सावध?
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?

हेही वाचा >>>‘आयुष्मान भारत’ सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवणार – भाजपाचे आश्वासन; याचे महत्त्व काय?

इस्रायल-हमास युद्धावर जॉर्डनची भूमिका काय?

जॉर्डनमध्ये पॅलेस्टिनी वंशाचे सर्वाधिक नागरिक आहेत. त्यामुळे इस्रायलने छेडलेल्या युद्धाविरोधात तेथे संतापाची भावना प्रबळ आहे. परिणामी मैत्रीपूर्ण संबंध असले तरीही जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्यासह तेथील सरकारने इस्रायलच्या सशस्त्र कारवाईचा जाहीर निषेध केला. मात्र त्याच वेळी इराक, सीरिया किंवा लेबनॉनप्रमाणे इराणला आपल्या भूमीचा इस्रायलविरोधात कारवायांसाठी वापर करू दिला जाणार नाही, असेही राजे अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले. इराणच्या ‘ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स’ला थारा देणाऱ्या इराक, सीरिया, लेबनॉनची अवस्था अब्दुल्ला यांना माहीत असल्याने ते इराणच्या कच्छपी लागू इच्छित नाहीत. शिवाय अमेरिकेच्या मदतीने आपल्या गरीब देशाची सुधारत असलेली अर्थव्यवस्था बिघडू देण्याची जोखीमही त्यांना उचलायची नाही. त्याच वेळी इराणबरोबर शत्रुत्वही लष्करीदृष्ट्या कमकुवत असलेल्या जॉर्डनला परवडणारे नाही. त्यामुळे अरब जग आणि पाश्चिमात्य राष्ट्रे यांच्यामध्ये तारेवरची कसरत जॉर्डनला करावी लागत आहे.

इराणचा जॉर्डनला इशारा का?

इराणने रविवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे पाचच्या सुमारास इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे आणि आत्मघातकी ड्रोनचा मोठा मारा केला. हा हल्ला आपल्या ‘मित्रराष्ट्रां’च्या मदतीने यशस्वीरीत्या परतवून लावल्याचे त्या दिवशी सकाळी इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्यांनी जाहीर केले. त्यानंतर कालांतराने इराणची काही ड्रोन आणि क्षेपणास्त्रे जॉर्डनच्या सैन्याने हवेत नष्ट केल्याचे स्पष्ट झाले. इराणसाठी हा धक्का होता. एका अरब राष्ट्राने आपल्याविरुद्ध इस्रायलला मदत करावी, याने इराणचा तीळपापड झाला नसता तरच नवल… ‘झिऑनिस्ट राजवटीविरोधात (इस्रायल) आपण केलेल्या दंडात्मक हल्ल्यासंदर्भात जॉर्डनच्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष आहे. यापुढेही जॉर्डनने हस्तक्षेप सुरू ठेवला, तर आमचे पुढले लक्ष्य ते असतील,’ अशी इशारावजा धमकीच इराणच्या लष्कराने दिल्याचे ‘फार्स’ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र याबाबत पडती भूमिका घेतली आहे. जॉर्डनच्या कथित सहभागाबद्दल भाष्य करण्याच्या परिस्थितीत आपण नाही, असे प्रवक्ता नासेर कनानी यांनी सांगून टाकले.

हेही वाचा >>>विश्लेषण: गारांचा पाऊस कडक उन्हाळ्यात कसा पडतो? हिमवर्षाव आणि गारपिटीमध्ये काय फरक?

या घटनांवर जॉर्डनची प्रतिक्रिया काय?

अम्मानमधील (जॉर्डनची राजधानी) इराणी राजदूताला पाचारण करून जॉर्डनच्या परराष्ट्र खात्याने इराणी लष्कराच्या कथित धमकीवर नाराजी व्यक्त केली आहे. इराणी हल्ला आपल्या लष्कराने परतविल्याचे समजल्यानंतर जॉर्डनमधील जनतेमध्येही तीव्र नाराजीची भावना आहे. मात्र जॉर्डन सरकारने आपल्या कृतीचे समर्थन केले आहे. इराणने डागलेली काही क्षेपणास्त्रे व ड्रोन आपल्या देशात पडण्याचा धोका होता, त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी ती नष्ट करण्यात आल्याचा जॉर्डनचा दावा आहे. उद्या इस्रायलमधून अशा प्रकारे हल्ला झाला आणि त्याचा आपल्याला धोका असला, तरीही अशीच कृती केली जाईल, असे जॉर्डनच्या लष्कराने म्हटले आहे. त्याच वेळी राजे अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा द्विराष्ट्रवादाला पाठिंबा देऊन हमास युद्धासाठी इस्रायलला बोल लावले आहेत. जॉर्डनची गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेली तारेवरची कसरत आता अधिकच नाजूक अवस्थेत पोहोचली आहे. त्याच वेळी या घटनेचे निमित्त करून सौदी अरेबिया आणि इजिप्तनंतर आणखी एक अरब राष्ट्र इराणपासून तोडण्याची खटपट पाश्चिमात्य राष्ट्रांकडून केली जाऊ शकेल. यापुढे समतोल भूमिका घेणे जॉर्डन आणि राजे अब्दुल्ला यांना अधिक जड जाऊ शकेल.

amol.paranjpe@expressindia.com