लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची भाजपकडून एक आकडी जागांवर बोळवण केली जाईल आणि ठाणे जिल्ह्यातील मोजक्या जागांचा अपवाद वगळला तर मुंबईत शिंदेसेनेच्या पदरात फारसे काही पडणार नाही या अटकळींना मुख्यमंत्र्यांनी मुसद्दीपणाने तथ्यहीन ठरविल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. जागावाटपाच्या अगदी पहिल्या दिवसापासून लोकसभेच्या किमान १५ जागा आणि शक्य झाल्यास १६ जागा तरी आमच्या वाट्याला येतील असा दावा शिंदे यांचे निकटवर्तीय करत होते. मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेचा असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघावर दावा सांगत भाजपने त्यांची कोंडी केली खरी. मात्र चर्चेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ठाण्याच्या शहरी पट्ट्यातील एकही मतदारसंघ भाजपला मिळणार नाही याची पुरेपूर काळजी मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा या भाजपमधील दिल्लीश्वरांच्या मदतीने घेतल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, मुंबई महानगर पट्ट्यातील १० पैकी पाच जागा मिळवत मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या या नव्या बालेकिल्ल्यातही स्वत:ची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्र्यांचे नेमके लक्ष्य काय होते?
लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपसाठी महाराष्ट्र हे प्रमुख आणि तितकेच आव्हानात्मक राज्य मानले जात असल्याने येथील प्रत्येक जागेवर भाजपसोबत वाटाघाटी कराव्या लागणार हे स्पष्टच होते. शिवसेनेतील बंडात सहभागी झालेल्या १३ खासदारांना उमेदवारी मिळवून देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मात्र जागावाटपाची चर्चा सुरू होताच वेगवेगळ्या मतदारसंघांतील सर्वेक्षणाचे दाखले भाजपकडून दिले जाऊ लागले आणि मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला गेला. विदर्भातील रामटेक, हिंगोली, यवतमाळ हे मतदारसंघ हवे असतील तर उमेदवार बदला असा दबाव त्यांच्यावर आणण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले, कोल्हापूरच्या जागेबाबतही असेच सर्वेक्षण अहवाल पुढे करण्यात आले. ठाण्याची जागा मुख्यमंत्र्यांसाठी दुखरी नस आहे हे ओळखून तेथेही सर्वेक्षणात भाजपला अधिक संधी असल्याचे दाखविण्यात आले. असे असले तरी ठाण्यासह आपल्याकडे असलेल्या १३ जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती.
उमेदवारांच्या निवडीत मुख्यमंत्री ‘बॅकफुट’वर?
बंडात सहभागी झालेल्या १३ जागा मुख्यमंत्र्यांना देण्याचा शब्द दिल्लीतून मिळाल्यावर सर्वेक्षणाचे दाखले देत काही उमेदवार बदलण्याचा आग्रह भाजपकडून धरण्यात आल्याचे सांगितले जाते. रामटेकचे कृपाल तुमाणे, हिंगोलीचे हेमंत पाटील, नाशिकचे हेमंत गोडसे हे निवडून येणे कठीण असल्याचे अहवाल पुढे करण्यात आले. यवतमाळच्या ज्येष्ठ खासदार भावना गवळी यांची उमेदवारी बदला हा भाजपने धरलेला आग्रह मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी लागल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. मात्र जागा पदरात पाडून घेताना सर्वच ठिकाणी उमेदवारांसाठी आग्रह धरणे योग्य होणार नाही हे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी रामटेक, हिंगोली, यवतमाळचे उमेदवार बदलले. कोल्हापूर, हातकणंगलेसाठीदेखील भाजपचा हाच आग्रह होता असे सांगतात. मात्र मुख्यमंत्र्यांनी भाजपचा हा आग्रह नाकारताना ‘मी स्वत: या भागात तळ ठोकून बसेन’ असे सांगत दिल्लीतील नेत्यांना आश्वस्त केल्याचे सांगितले जाते.
ठाणे जिल्ह्यात भाजपला रोखण्यात यश?
ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असून येथील शहरी भागातील ठाणे आणि कल्याण या दोन लोकसभा मतदारसंघांना राजकीय दृष्ट्या महत्त्व आहे. या दोन मतदारसंघांतून जिल्ह्यातील १२ आमदार निवडून येतात. भिवंडीत भाजपचे कपिल पाटील खासदार असले तरी हा मतदारसंघ बराचसा ग्रामीण आहे. येथेही पूर्वाश्रमीच्या एकसंध शिवसेनेची मोठी ताकद असली तरी ठाणे, कल्याणातील महापालिकेतील वर्चस्व हा मुख्यमंत्र्यांच्या राजकारणाचा पाया मानला जातो. या दोन मतदारसंघांपैकी एखादा तरी भाजपला मिळावा यासाठी या पक्षाचा मोठा आग्रह होता. शिवसेनेची पूर्वीची ताकद आता या भागात नाही आणि भाजपची ताकद सतत वाढते आहे याचे दाखले सर्वेक्षण अहवाल पुढे करून भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी चर्चेदरम्यान देण्याचा प्रयत्न केला. ठाण्यात तर ‘धनुष्यबाणा’पेक्षा ‘कमळा’ला अधिक प्राधान्य दिले जाईल असा अहवालही मांडण्यात आला. ठाण्यासाठी गणेश नाईकांचे नाव पुढे करत मुख्यमंत्र्यांना एका प्रकारे आव्हान उभे होईल अशी मांडणी करण्यात आल्याची चर्चा आहे. नाईक यांच्या नावामुळे मुख्यमंत्री कमालीचे अस्वस्थ होते. हा मतदारसंघ मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांना शेवटपर्यंत झगडावे लागले. ठाणे आपल्यासाठी कसे महत्त्वाचे आहे आणि येथून नाईक यांना उमेदवारी दिली गेल्यास भावनिक मुद्द्यावर आपल्यासोबत आलेल्या शिवसैनिकांमध्ये कसा दुभंग निर्माण होईल हे पटवून देण्यात शिंदे अखेरच्या टप्प्यात यशस्वी झाले. ठाण्यासोबत कल्याण राखत जिल्ह्याच्या शहरी पट्ट्यात भाजपला रोखण्यात शिंदे यशस्वी झाले आहे. ठाणे आणि कल्याण या दोन्ही मतदारसंघांत नरेंद्र मोदी यांना मानणारा मतदार आहे आणि तो आपल्या उमेदवारांना तारून नेईल अशी मुख्यमंत्र्यांची रणनीती आहे. त्यामुळे सध्या तरी ठाणे जिल्ह्यात पाय रोवण्याची भाजपची खेळी मुख्यमंत्र्यांनी यशस्वी होऊ दिलेली नाही हे स्पष्टच आहे.
हेही वाचा… विश्लेषण : कुठे अवर्षण, कुठे अतिवृष्टी… लहरी हवेचा मराठवाड्यास यंदाही फटका! निवडणुकीवर काय परिणाम?
उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान?
मुंबई महानगर प्रदेशातील दहापैकी किमान पाच जागा पदरात पाडून घेण्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. पालघरची जागा भाजपच्या ताब्यात गेल्यास या प्रदेशात भाजप आणि शिंदेसेना प्रत्येकी पाच जागा लढवेल असे चित्र आहे. ठाणे, नाशिक पदरात पाडून घेतल्यानंतरही बुधवारी रात्री उशिरापर्यंत पालघरही मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुरू होते. जागावाटपाच्या वाटाघाटीत मुख्यमंत्र्यांची सरशी झाली असली तरी या संपूर्ण पट्ट्यात विजय मिळविण्याचे मोठे आव्हान शिंदे यांच्यापुढे असणार आहे. दक्षिण मुंबई, वायव्य मुंबईत मुख्यमंत्र्यानी दिलेल्या उमेदवारांवर ईडी चौकशीचा ससेमिरा होता. या उमेदवारांना रिंगणात उतरविल्याने मुख्यमंत्री विरोधकांच्या रडारवर आहेत. ठाण्यात उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग अजूनही आहे. त्यामुळे ठाणे वाटते तितके सोपे नाही याची जाणीव मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांना आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा दिल्या गेल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. स्थानिक कार्यकर्ते नेते अस्वस्थ आहेत. भाजपची ही नाराजी दूर करण्याचे आव्हान मुख्यमंत्र्यांना पेलावे लागणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या मुंबई, कल्याणात होणाऱ्या सभा आणि निवडणूक व्यवस्थापनाच्या बळावर या जागांवर विजय मिळेल या आशेवर सध्या शिंदेसेना आहे.