पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्नी ५ च्या चाचणीची माहिती आज देत DRDO चे अभिनंदन केले. या चाचणीमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेले Multiple Independently Targetable Re-entry Vehicle (MIRV) वापरण्यात आले याबद्दल मोदींनी शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. यामुळे देशाच्या मारक क्षमतेते मोलाची भर पडणार आहे. या चाचणीचे महत्व काय ते जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अग्नी ५ ची मारक क्षमता

१९८३ ला Integrated Guided Missile Development Programme (IGMDP) कार्यक्रम हाती घेण्यात आला. यामाध्यमातून जमिनीवरुन हवेत, हवेतून हवेत मारा कऱणारी विविध क्षमतेची क्षेपणास्त्रे ही विकसित करण्याचे निश्चित आले. त्याचाच एक भाग म्हणून अग्नी नावाने विविध लांब पल्ल्यांची क्षेपणास्त्रे विकसित करण्यात आली. अग्नी ५ हे त्याचे सर्वात शक्तीशाली स्वरुप आहे. हे क्षेपणास्त्र १७.५ मीटर उंच, दोन मीटर व्यास आणि ५० टनापेक्षा जास्त वजनाचे आहे. अग्रभागावर तब्बल तीन टनापर्यंतची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता अग्नी ५ मध्ये आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तब्बल पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर मारा करण्याची हा क्षेपणास्त्राची क्षमता आहे.. जून २०१८ ला हे क्षेपणास्त्र संरक्षण दलात दाखल करण्यात आले.

अग्नी ५ का महत्त्वाचे?

अग्नी ५ च्या मारक क्षमतेमुळे ते आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणून ओळखलं जातं. म्हणजे एका खंडातून दुसऱ्या खंडात मारा करण्याची क्षमता यामुळे भारताला मिळाली आहे. हे क्षेपणास्त्र पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जात पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते. या क्षेपणास्त्रामुळे संपूर्ण चीन हा आपल्या टप्प्यात आला आहे. वेळ पडल्यास ३ टनापर्यंतची स्फोटके किंवा अण्वस्त्रे वाहून नेण्याची अग्नी ५ ची क्षमता आहे. त्यामुळेच अग्नी ५ ला ब्रह्मास्त्र म्हणुनही ओळखले जाते. या क्षेपणास्त्रामुळे शत्रुपक्षावर रणनिती बदलण्याची वेळ आली.

MIRV म्हणजे काय?

MIRV चा अर्थ Multiple Independently Targetable Re-entry Vehicle. याचा अर्थ एकाच क्षेपणास्त्रावरुन एकाच वेळी विविध ठिकाणी हल्ला करता येईल असे तंत्रज्ञान. थोडक्यात एकाच वेळी विविध ठिकाणी अण्वस्त्रे टाकण्याची क्षमता यामुळे प्राप्त होते. म्हणजेच वेळ पडल्यास या MIRV तंत्रज्ञानामुळे एका क्षेपणास्त्रावर दोन ते पाच अशी विविध क्षमतेची अण्वस्त्रे – अणुबॉम्ब ठेवत, ती काही हजार किलोमीटर अंतरावरील शत्रुपक्षाच्या लक्ष्यावर एकाच वेळी डागता येतील. क्षेपणास्त्राच्या पल्ल्यानुसार या तंत्रज्ञानात दोन पेक्षा जास्त अण्वस्त्रे किंवा स्फोटके ही अचूकरित्या विशिष्ट ठिकाणी डागली जाऊ शकतात. यामुळेच हे तंत्रज्ञान असलेले क्षेपणास्त्र शत्रू पक्षाची महत्त्वाची शहरे किंवा ठिकाणे एकाच हल्ल्यात उद्धस्त करत त्या देशाला गुडघे टेकायला लावू शकतात.

भारतासाठी MIRV तंत्रज्ञान का महत्त्वाचे?

आता हेच MIRV तंत्रज्ञान स्वबळावर भारताने विकसित केले असून त्याची चाचणी आज म्हणजे ११ मार्चला अग्नी ५ च्या माध्यमातून केली आहे. हे तंत्रज्ञान DRDO म्हणजेच संरक्षण विकास संशोधन संस्थेने विकसित केले आहे. यामुळे अग्नी ५ ची मारक क्षमता नुसती वाढली नसून ते आता अधिक संहारक झाले आहे. त्यामुळेच या चाचणीला Mission Divyastra असं नाव देण्यात आलं आहे. अर्थात सोमवारी झालेली चाचणी ही बनावट स्फोटकं वापरत करण्यात आली आणि हे करतांना या तंत्रज्ञानाची पुर्ण क्षमता तपासण्यास आली. विशेषतः वातावरणा बाहेर जात पुन्हा वातावरणात प्रवेश करतांना प्रचंड वेगाने आणि वातवरणातील घर्षणामुळे क्षेपणास्त्राच्या अग्रभागावरील स्फोटके ही नष्ट होण्याची शक्यता असते. अग्नी ५ च्या माध्यमातून या अडचणीवर मात करत आपण हुकमत मिळवलेली होतीच पण ताज्या चाचणीने MIRV चे तंत्रज्ञानही आपण सिद्ध केले आहे.

आत्तापर्यंत हे तंत्रज्ञान अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन याच देशांकडे होते. आता त्यात भारतानेही स्थान मिळवले आहे. एखाद्या अणु चाचणी इतकीच ही चाचणी देशासाठी महत्त्वाची होती. MIRV देशाच्या संरक्षण क्षमता आणखी बळकट झाली आहे. आता लवकरच आणखी काही चाचण्यांचे सोपस्कार पुर्ण करत हे तंत्रज्ञान वापरण्यास सिद्ध केले जाईल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained article on mission divyastra that praised by pm narendra modi what is the significance of mirv in agni 5 test asj