सुरंगीच्या झाडाचे अप्रूप का?

सुरंगीचे झाड हे तळकोकणातील सदाहरित वनात आढळून येणारे मध्यम आकाराचे झाड असून त्याचे शास्त्रीय नाव मॅमीया सुरीगा असे आहे. मार्च आणि एप्रिल या महिन्यात या झाडांना फुलांचा बहर येतो. सुरंगीची फुले ही फुलोऱ्याला न येता ती फांद्यांना येतात. नर आणि मादी अशी वेगळ्या झाडांवर येतात. नर फुलांना सुरंगी तर मादी फुलांना बुरंगा असे म्हटले जाते. दोन्ही झाडे दिसायला सारखीच असतात. फुलांना चार पांढऱ्या पाकळ्या, दोन संदल आणि बरेच पुंकेसर असतात. सुरंगीच्या फुलांना मनमोहक सुगंध असतो. त्यामुळे या फुलांच्या कळ्यांना बाजारात मोठी मागणी असते.

कोकणात ही झाडे कुठे आढळतात?

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांच्या परिसरात असलेल्या घनदाट जंगलात ही वनस्पती आढळून येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ गावांमध्ये ४५ हेक्टरवर सुरंगीची नैसर्गिक लागवड आहे. यामध्ये आरवली, वडखोल सोन्सुरे, टाक, आसोली, रेडी, खानोली, फणसखोल, मोचेमाड (ता.वेंगुर्ला) धाकोरे, कोलगाव, कुणकेरी, (ता.सावंतवाडी) आकेरी (ता.कुडाळ) फोंडा (ता.कणकवली) करूळ (ता.वैभववाडी) या गावांचा समावेश आहे. गोव्यात शिरोडा, धारबांदोडा, सावई वेरे, दुर्भाट, बांदोडा, मंगेशी- मार्दोळ अशा मोजक्या गावात सुरंगीची घनदाट जंगले आणि वनराया आढळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्या सुमारे ८५० कुटुंबे सुरंगीच्या फुलांचा व्यवसाय करतात. यातून दरवर्षी साधारणपणे १६ कोटींची वार्षिक उलाढाल होत असते. त्यामुळे कोकणात भरघोस उत्पन्न देणारे पीक म्हणून सुरंगीकडे पाहिले जाते.

सुरंगीची मागणी का?

सुरंगीच्या फुलांचा मनमोहक सुगंध दीर्घकाळ टिकून राहतो. त्यामुळे बाजारात या फुलांच्या कळ्यांना मोठी मागणी असते, या फुलांना चांगला दरही मिळतो. सुरंगीची फुले साधारणत: ५०० ते ७०० रुपये किलोने विकली जातात. सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक औषधे, सुगंधी तेल, अत्तरे तयार करण्यासाठी या फुलांना मोठी मागणी असते. स्थानिक बाजारपेठेत फुलांची विक्री होतेच. त्याचबरोबर व्यावसायिक उत्पादनांसाठी या फुलांपासून तयार करण्यात आलेल्या पावडरलाही मोठी मागणी असते.

काढणी का जोखमीची?

सुरंगीच्या झाडांची उगवण ते उत्पादन हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. या झाडाची वाढ हळूहळू होते. दहा वर्षांनी झाड प्रौढ होऊन ते फुलायला लागते. वर्षातून एकदाच आणि काही काळच हे झाड फुलते, त्यामुळे फुलांचा उत्पादन काळ अतिशय कमी असतो. या झाडांवरील कळे, फुले काढणी खूप जोखमीचे असते. झाडांच्या फांद्या नाजूक असल्यामुळे त्याची काढणी करताना खूप काळजी घ्यावी लागते. झाडाखाली सारवून कापड अंथरून नाजूकपणे फुलांची काढणी करावी लागते. काही ठरावीक कामगारच हे काम करीत असल्याने काढणीचा खर्च खूप असतो.

सुरंगीच्या विकासासाठी प्रयत्न कसे?

कोकणात सुरंगीचे प्रमाणित कलम आणि झाड नसल्याने व्यावसायिक कारणांसाठी या वृक्षाची फारशी लागवड होत नव्हती. ग्रामीण भागात काम करणाऱ्या लुपिन ह्यूमन वेल्फेअर अॅण्ड रिसर्च फाऊंडेशनने २०१४ मध्ये यावर संशोधनाला पहिल्यांदा चालना दिली. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या साह्याने सुरंगीवर संशोधन केले गेले. बऱ्याच प्रयत्नानंतर सुरंगीची रोपे तयार करण्यात यश आले. तेव्हापासून सुरंगीची प्रमाणित रोपे तयार होऊ लागली.

सुरंगीची राज्यभरात लागवड होणार?

सुरंगीच्या फुलांना असलेली मागणी, त्यातून मिळणारा रोजगार आणि उत्पन्न लक्षात घेऊन वनविभागाने राज्यातील ९०० वनक्षेत्रात सुरंगीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला सुरंगीच्या झाडांची रोपे तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार आता विद्यापीठाकडून पाच हजार रोपे तयार करण्यात आली असून आणखी पाच हजार रोपे येत्या काळात तयार केली जाणार आहेत. कलम पद्धतीने तयार झालेल्या या झाडांची राज्यभरातील वनक्षेत्रात लागवड केली जाणार आहे. ज्यातून वन विभागाला उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊ शकणार आहे.

पश्चिम घाटातील हे झाड इतरत्र तग धरेल?

राज्य सरकारने सुरंगीच्या राज्यव्यापी लागवडीचा निर्णय घेतला असला तरी हे झाड कोरड्या आणि उष्ण हवामानात तग धरू शकेल का हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. कारण सुरंगी हे एक प्रदेशनिष्ठ झाड आहे. तळ कोकणातील दमट हवामानात सदाहरित घनदाट वनातच हे झाड बहरते. त्यामुळे पश्चिम घाटातील ही वनस्पती विदर्भ, मराठवाडा प्रदेशात बहरेल का याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.