सिद्धार्थ खांडेकर siddharth.khandekar@expressindia.com
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून इतर कोणत्याही क्षेत्रांपेक्षा क्रीडा क्षेत्रामध्ये रशियाची कोंडी किंवा विलगीकरण अधिक वेगाने सुरू आहे. हे करत असताना युक्रेनला सर्वतोपरी पाठिंबाही दिला जातोय. काही क्रीडा संघटनांनी रशियाबरोबरच बेलारूसवरही बहिष्कार घातला आहे. सामरिक व राजनैतिक राष्ट्रसमूहांपेक्षा क्रीडा संघटनांनी अधिक वेगाने रशियाला धिक्कारायला सुरुवात केल्याचे चित्र आहे.
फिफा, युएफा, ऑलिम्पिक समितीकडून काय कारवाई?
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) आणि युरोपीय फुटबॉल महासंघ (युएफा) यांनी रशियाच्या सर्व संघांवर एकत्रित आणि नि:संदिग्ध बंदी घातली आहे. पुढील आदेश येईपर्यंत रशियाचे महिला व पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघ, सर्व नोंदणीकृत फुटबॉल क्लब यांच्यावर सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. युएफाने गाझप्रॉम या रशियन गॅस कंपनीचे प्रायोजकत्व रद्द केले. याशिवाय यंदाचा युएफा चँपियन्स लीग अंतिम सामनाही मॉस्कोतून पॅरिसला हलवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनेही रशियाच्या सर्व क्रीडा संघटनांना, ऑलिम्पिक समितीच्या ध्वजाखालील कोणत्याही स्पर्धेत खेळण्यापासून प्रतिबंधित केले आहे. विशेष म्हणजे ऑलिम्पिक समितीने रशियाबरोबरच त्या देशाला मदत करणाऱ्या बेलारूसवरही बंदी घातली आहे.
इतर कोणत्या संघटनांकडून बंदी?
आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने रशियाच्या ज्युनियर महिला संघाची एप्रिल महिन्यात होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेतून हकालपट्टी केली आहे. आंतरराष्ट्रीय ज्युदोका संघटनेचे मानद पदाधिकारी राहिलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची त्या संघटनेतून हकालपट्टी झालीच, शिवाय त्यांचा प्रतिष्ठित ब्लॅकबेल्टही काढून घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय आइस हॉकी संघटनेने रशिया आणि बेलारूस यांचे सदस्यत्व रद्द केले. २०२३मधील ज्युनियर विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद रशियाकडून काढून घेण्यात आले. आंतरराष्ट्रीय बॅडिमटन संघटनेने रशिया आणि बेलारूसवर बंदी घातली. यंदाच्या हंगामात सप्टेंबरमध्ये नियोजित फॉम्र्युला वन ग्रांप्रि रशियातील सोची शहरात आता होणार नाही, असे एफआयए या संघटनेने जाहीर केले. आइस स्केटिंग संघटनेनेही रशियाच्या खेळाडूंवर बंदी घातली.
रशियन खेळाडूंच्या काय प्रतिक्रिया?
अनेक खेळाडूंना रशियन आक्रमण मंजूर नाही. टेनिसपटू आंद्रे रुब्लेवने एका स्पर्धेदरम्यान कॅमेराच्या लेन्सवर ‘युद्ध नको’ असे लिहिले. अव्वल टेनिसपटू दानिल मेदवेदेव सध्या एका स्पर्धेत खेळत असून, युद्धापेक्षा शांततेलाच आपले प्राधान्य राहील असे त्याने म्हटले आहे. टेनिसपटू अनास्टासिया पावल्युचेन्कोवाने वैयक्तिक स्वार्थासाठी जगाला युद्धाच्या खाईत ढकलणे कितपत योग्य, असा प्रश्न उपस्थित केला.
युरोपातील अनेक क्लब दर्जाच्या फुटबॉल सामन्यांमध्ये प्रेक्षकांबरोबरच खेळाडूंकडूनही युक्रेनला पाठिंबा मिळत आहे. युक्रेनियन फुटबॉलपटूंचे टाळय़ांच्या कडकडाटात उभे राहून धैर्यवर्धन करणे किंवा एखाद्या सामन्यात युक्रेनियन फुटबॉलपटूला दंडावर मानाची कर्णधारपट्टी परिधान करायला लावणे हे उत्स्फूर्तपणे घडत आहे. चेल्सी फुटबॉल क्लबचे रशियन मालक रोमान अब्रामोविच यांच्या रशियन सरकारशी असलेल्या घनिष्ठ संबंधांची चौकशी व्हावी अशी मागणी ब्रिटनमध्ये वाढू लागली आहे. विख्यात फुटबॉलपटू रॉबर्ट लेवांडोवस्की याने रशियात विश्वचषक फुटबॉल पात्रता सामने न खेळण्याच्या पोलिश फुटबॉल संघटनेच्या निर्णयाला जाहीर पाठिंबा दिला. स्वीडन, चेक प्रजासत्ताक यांनीही रशिया आणि बेलारूसमध्ये पात्रता सामने खेळण्यास नकार दिला आहे.
कोणत्या बुद्धिबळपटूंचा पुढाकार?
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना अर्थात फिडेने रशिया आणि बेलारूसमध्ये कोणत्याही स्पर्धा भरवणार नाही असा निर्णय घेतला. रशिया ही बुद्धिबळातील महासत्ता गणली जाते. या देशाचे अनेक उत्तमोत्तम बुद्धिबळपटू जगभर खेळत असतात. त्यांतील काहींनी रशियन आक्रमणाचा निषेध केला. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील आव्हानवीर इयन नेपोप्नियाशी, माजी महिला जगज्जेती अलेक्झांड्रा कोस्टेनुइक, पीटर स्विडलर ही नावे यात प्रामुख्याने घ्यावी लागतील. माजी आव्हानवीर सर्गेई कार्याकिन, माजी जगज्जेता अनातोली कारपॉव यांनी मात्र पुतिन यांना पाठिंबा दर्शवला. अमेरिकेतील काही बुद्धिबळपटूंनी मिळून युक्रेनियन बुद्धिबळपटूंच्या मदतीसाठी मोहीम सुरू केली आहे.
पण या बंदीसत्राचा उपयोग होईल का?
फुटबॉल, टेनिस, आईस हॉकी या खेळांमध्ये गडगंज पैसा मोजला जातो. या स्पर्धाचे यजमानत्व काढून घेतल्याचा आर्थिक फटका रशियाला बसेल. गेली काही वर्षे त्यांचे बहुतेक खेळाडू डोपिंगबाबत ऑलिम्पिक संघटनेच्या कारवाईमुळे रशियन ध्वजाखाली खेळत नाहीत. आता त्यांतील काहींनी देश सोडून जाण्याचा निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण रशियन खेळाडूंवरच – त्यांची भूमिका काहीही असली तरी – बंदी घालण्याचा निर्णय सरसकट अमलात येऊ लागल्यास या खेळाडूंचे मोठे नुकसान होईल. ते व्यावसायिकदृष्टय़ा आणि वैयक्तिक पातळीवर परवडणारे नाही. कदाचित रशियन सरकारला विरोध करणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठी वाटणार नाही, कारण विरोधकांची रशियात काय दशा केली जाते हे बहुतांना ठाऊक आहे. तरीही त्यांच्यातील काहींनी तो धोका पत्करून विरोध केला, ही साधारण बाब नाही. एक मात्र नक्की. या युद्धामुळे रशियन अर्थव्यवस्थेप्रमाणेच रशियन क्रीडाव्यवस्थेचेही प्रचंड नुकसान होणार आहे.