डॉ. अक्षय देवरस.संशोधन शास्त्रज्ञ, नॅशनल सेंटर,फॉर अॅटमॉस्फेरिक सायन्स अँड डिपार्टमेंट ऑफ मिटिरिऑलॉजी, रीडिंग युनिव्हर्सिटी, लंडन
पाऊस पडून गेल्यावर तीव्र पावसाचा इशारा धोकादायक?
पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडणे ही नवीन गोष्ट नाही. मात्र, या वर्षी पावसाने २८ जूनला दिल्ली येथे, ८ जुलैला मुंबई तर २० जुलैला नागपूरला अक्षरश: झोडपून काढले. कमी वेळात अधिक पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. दिल्ली आणि नागपूर शहरात ऑगस्टमध्ये सरासरी जितका पाऊस पडतो, जवळपास तितकाच पाऊस केवळ सहा ते आठ तासांत पडला. तर सांताक्रूझला ऑगस्टच्या सरासरी पावसाच्या जवळपास ३० टक्के पाऊस केवळ तीन तासांत पडला. या तिन्ही घटनांमध्ये सामान्य घटक म्हणजे मुसळधार पाऊस पहाटे किंवा सकाळीच पडला आणि त्यानंतर स्थिर हवामान पाहायला मिळाले. बहुतांश घटनांमध्ये पाऊस पडून गेल्यावर तीव्र पावसाचा इशारा देण्यात आला.
अंदाज कुठे कुठे चुकले?
२० जुलैला नागपुरात सकाळच्या शाळा सुरू झाल्यावर बऱ्याच उशिरा त्यांना सुट्टी देण्याचा आदेश काढण्यात आला. दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने स्थानिक प्रशासनाने शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. मात्र, दुसऱ्या दिवशी या कोणत्याही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला नाही. याउलट काही ठिकाणी सूर्यदर्शन झाले. याआधीही अनेकदा मुसळधार पावसाची शक्यता, त्यानुसार सुट्टी जाहीर करणे पण तसा पाऊसच न पडणे असे घडले आहे. त्यामुळे हा इशारा आणि स्थानिक पातळीवरील नियोजन यांची चर्चा सातत्याने होते.
हेही वाचा >>>ऑलिम्पिक उद्घाटनावरून वाद का झाला? काय आहे ‘द लास्ट सपर’चा संदर्भ?
हवामानाचे महत्त्वाचे अंदाज का चुकतात?
हवामानाचे अंदाज व्यक्त करणे ही एक जटिल प्रक्रिया आहे. जगभरातील अनेक हवामान संस्था त्यांच्याकडे असलेल्या महासंगणकावर ‘मॉडेल्स रन’ करतात. ही ‘मॉडेल्स’ भौतिकशास्त्रातील प्रश्नांपासून बनलेले असतात, ज्यात सध्याचे हवामान कसे आहे ही माहिती मिसळली जाते. त्यावरून येत्या काळात हवामान यंत्रणा कशा विकसित होतील याचा अंदाज मिळतो. मुळात या मॉडेल्समध्ये काही त्रुटी असतात. त्यामुळे हवामानाच्या प्रत्येक परिस्थितीचा अचूक अंदाज शक्य नसतो. अमेरिका, इंग्लंडसारख्या देशांच्या हवामान यंत्रणा भारतीय मान्सूनपेक्षा अधिक विश्वसनीय आहेत. अंदाज देण्याआधी तिथेखूप घटकांचा विचार होतो. म्हणजे मान्सूनचा अचूक अंदाज देताच येत नाही, असे नाही.
‘डॉप्लर रडार’चा उपयोग का नाही?
दिल्ली, मुंबई आणि नागपूरमध्ये तीव्र वादळी ढगांमुळे अति मुसळधार पाऊस पडला. हवामान मॉडेल्समध्ये तितक्या तीव्र पावसाच्या सूचना नव्हत्या, तरी उपग्रह आणि ‘डॉप्लर रडार’चा उपयोग करून ढगांची निर्मिती आणि त्यांच्या जवळपास २०० किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारचे ढग तयार होत आहेत, पाऊस किती तीव्र आहे आणि तो कुठे सरकत आहे याची अचूक माहिती मिळते. या तिन्ही घटनांमध्ये ‘डॉप्लर रडार’चा हवा तितका उपयोग झालेला दिसत नाही. अन्यथा ‘रिअल टाइम’वर आणि विशिष्ट पद्धतीने वादळी पावसाची बातमी लोकांना देण्यात आली असती. या तिन्ही ठिकाणी पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची कोणतीच शक्यता नसताना अलर्ट का देण्यात आले, हा एक मोठा प्रश्न आहे.
हेही वाचा >>>विश्लेषण : मनू भाकरचे ऐतिहासिक दुसरे ऑलिम्पिक पदक… सरबज्योतचीही पदककमाई…
कमी वेळात मुसळधार पाऊस आता नवीन नियम होणार का?
निसर्गात सतत उत्क्रांती होत असते, ज्यामुळे मान्सूनसारखी विशाल हवामान यंत्रणासुद्धा विकसित होत असते. मात्र, या उत्क्रांतीमध्ये मानवनिर्मित हवामान बदल एक मोठा घटक म्हणून पुढे आला आहे. वातावरणात हरितगृह वायू उत्सर्जन वाढत असल्यामुळे जगभरातील तापमानातसुद्धा सातत्याने वाढ होत आहे. ही स्थिती थेट काही हवामान यंत्रणांना अधिक तीव्र करते, ज्यामुळे कमी वेळात जास्त पाऊस पडण्याच्या घटना हल्ली अधिक प्रमाणात समोर येत आहेत. जगभरातील संशोधकांचे म्हणणे आहे की पुढील काळात कमी वेळात जास्त पाऊस पडणे आणि मग बरेच दिवस पाऊस बेपत्ता होणे, अशा अनियमिततांमध्ये वाढ होणे अपेक्षित आहे.
यंत्रणांमध्ये काय सुधारणा होणे गरजेचे?
हवामानाचे चुकीचे अंदाज आणि विनाकारण जाहीर केलेली सुट्टी यामुळे लोकांचा हवामान अंदाज आणि आपत्ती प्रतिसाद प्रणाली यावरचा विश्वास कमी होत आहे. आगामी काळात असाच उशिरा अंदाज आणि सुट्टी परत देण्यात आली, तर लोक घरी थांबण्यासाठी मागेपुढे विचार करतील. दुर्दैवाने खरेच जोराचा पाऊस आला तर नुकसानीलादेखील सामोरे जावे लागेल. त्यामुळे हवामानाच्या मॉडेलमध्ये सुधारणा कशी करावी, ढगांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘डॉप्लर रडार्स’ आणि उपक्रमाचा अधिक उपयोग कसा करावा. सुट्टी जाहीर करण्यापूर्वी पाऊस हा सार्वत्रिक की स्थानिक, किती वाजता, किती तीव्रतेचा आणि किती कालावधीचा असू शकतो या घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. या सर्वांवर काम केले नाही तर आगामी काळात कमी वेळात पडणाऱ्या मुसळधार पावसाचे व्यवस्थापन कठीण होईल.