जागतिक महायुद्धाचा फटका अवघ्या जगाला आजही सोसावा लागत आहे. महायुद्धात कोणाला काय सोसावे लागले याच्या छळकहाण्यांनी पानेच्या पाने भरली गेली आहेत. अशा कटू प्रसंगात कोल्हापूरचे नाव पीडितांना मदत करण्यासाठी पुढे कसे सरसावले होते याच्या आठवणी आठ दशकांनंतरही ताज्या आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या छळामुळे भयभीत झालेल्या पोलिश निर्वासितांना ब्रिटिशांचा विरोध झुगारुन भारतात करवीर आणि जामनगर संस्थानात आश्रय देण्यात आला होता. करवीर संस्थानात १९४२ ते १९४८ या काळात ‘वळीवडे’ हे पोलिश निर्वासितांसाठी हक्काचे घर बनले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलंड, कोल्हापूर संबंधांना नव्याने उजाळा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच पोलंड देशाच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी राजधानी वॉर्सा येथे असलेल्या कोल्हापूर स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली. हे स्मारक कोल्हापूरच्या राजघराण्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साकारण्यात आले आहे. भारत आणि पोलंडच्या या मैत्रीच्या वारशाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंड दौऱ्यात आवर्जून केला. पोलंडमधल्या मराठी नागरिकांशी मोदी यांनी मराठी भाषेतून संवाद साधला. हे मानवतावादी वर्तन पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे. यामुळे अनेकांच्या मनात पोलंड, भारत आणि कोल्हापूर यांचे नेमके संबंध आहेत तरी कसे आणि इतक्या प्रदीर्घ काळानंतरही त्यातील ओलावा टिकून कसा आहे याचे अप्रुप दिसू लागले आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण : अमेरिकेच्या आण्विक धोरणात आमूलाग्र बदल… चार शत्रूराष्ट्रांविरुद्ध नव्या शीतयुद्धाची नांदी?

पोलंडवासियांचे आश्रयस्थान कोल्हापूर…

जगात दुसऱ्या महायुद्धाचा वणवा पेटला. ब्रिटिशांची वसाहत म्हणून भारतही अप्रत्यक्षरित्या युद्धात सहभागी होता. या युद्धाची पहिली मोठी झळ पोलंडला सोसावी लागली. तेथील ज्यू नागरिकांच्या नशिबी निर्वासितांचे जगणे आले. हा देश आश्रयासाठी समस्त जगाकडे मदतीच्या आशेने पाहत होता. तेव्हा त्यांच्या मदतीला भारतातील दोन संस्थाने धावली. कोल्हापूरच्या छत्रपतींनी पाच हजार निर्वासित पोलिश नागरिकांना कोल्हापूरच्या वळिवडे गावात आश्रय दिला. अशा रीतीने भारत-पोलंड संबंधाचे एक नवे पर्व सुरू झाले.

पोलिश नागरिक कोल्हापुरात कसे रमले?

पोलिश नागरिकांसाठी कोल्हापूरपासून पूर्वेला सात किमीवर वळिवडे कॅम्प नावाची स्वतंत्र वसाहत स्थापन करण्यात आली. तेथे त्यांच्यासाठी तमाम नागरी सुविधा अल्पकाळात उभारण्यात आल्या. रस्ते, पाणी, शाळा, दवाखाने, चित्रपटगृह, ग्रंथालय, नानाविध दुकाने, स्मशानभूमी अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने पोलिश नागरिकांचे परकेपण निघून गेले. १९४२ ते १९४८ या काळात मातृभूमीपासून दूर असलेल्या, वर्णापासून ते भाषेपर्यंत कुठलेही साम्य नसलेल्या पोलिश नागरिकांना कोल्हापूरच्या काळ्या मातीने आपलेच लेकरू मानले. युद्धामुळे मनावर आघात झालेली लहान बालके येथील सुरक्षित गोकुळात नांदू लागली. येथेच त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा सुरू झाला. गावगाड्यातील सवंगड्यांबरोबर स्थानिक खेळ त्यांनी आत्मसात केले. त्यांचे खेळ, खाद्य कोल्हापूरकरांनी आपलेसे केले. त्यांनीही कोल्हापूरच्या कला, सांस्कृतिक परंपरेचा मनःपूत आस्वाद घेतला. युद्धाच्या अस्थिर आणि भयंकर वातावरणापासून दूर राहत त्यांनी पंचगंगाकाठी नीरव शांतता अनुभवली. पोलीश नागरिक भारतात आले होते, तेव्हा त्यांच्या नजरेत अनिश्चितता आणि मनात भीतीने घर केले होते. या कालावधीत ७८ पोलिश लोक अंतरले होते. शांतता प्रस्थापित होऊन सहा वर्षांनी त्यांना पुन्हा मायदेशी निघावे लागले तेव्हा ते कोल्हापूरविषयीच्या कृतज्ञतेने भारावले होते. भारताने सुरक्षितता आणि सन्मान कसा दिला हे त्यांचे अश्रूभरले डोळेच सांगत होते.

हेही वाचा >>>विश्लेषण : ‘पॅरोल’ व ‘फर्लो’बाबत न्यायालयाचे निर्णय चर्चेत का? या सवलती कैद्यांना कधी मिळू शकतात?

पोलंड-कोल्हापूरचे संबंध कसे राहिले?

कोल्हापूरने देऊ केलेले प्रेम पोलंडवासी कधीही विसरू शकले नाहीत, याची प्रचीती पुढे अनेक प्रसंगातून येत राहिली. २०१९ साली, वळिवडे कॅम्पमध्ये राहिलेले काही पोलिश नागरिक पुन्हा भारतात आले. तेव्हा त्यांनीही कोल्हापूरकरांचे मनापासून आभार मानले. काही नागरिकांनी इथल्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. सहा वर्षांच्या काळात कोल्हापुरात जन्मलेले पोलिश नागरिक आजही आपली ओळख भारतीय असल्याचे अभिमानाने सांगतात. कोल्हापुरात वास्तव्य केलेल्या ल्युडा या वृद्ध पोलीश महिलेने आपल्या बालपणातला सुंदर काळ येथेच घालवल्याची आठवण जागवली होती. शमा अशोक काशीकर यांच्या नजरेसमोर जुना काळ तरळला. ‘माझ्या सासुबाई मालती वसंत काशीकर (पोलंड येथील नाव वाँडरव्हिक्स) या १९४२ च्या काळात भारतात आल्या. सासरे वसंत काशीकर हे त्याकाळी ब्रिटिशांकडे नोकरीस होते. वाँडरव्हिक्स या काशीकरांना आवडल्या. दोघांनी विवाह केला. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर सर्व पोलंडवाशीय मायदेशी परतले. माझ्या सासूबाई येथे राहिल्या. त्यांची बहीण हाना हीसुद्धा मायदेशी परतली. तेव्हापासून पोलंड आणि काशीकर कुटुंबाचे ऋणानुबंध कायम आहेत,’ असे त्या सांगत होत्या.

छत्रपती घराणे आणि पोलंडचे संबंध कसे?

पोलंड देशाने कोल्हापूरचे स्मरण केवळ ठेवले असे नव्हे तर यथायोग्य सन्मानही केला. पोलंडचे निर्वासित वळिवडे कॅम्प येथे राहिले. त्या वास्तव्यास २०१९ साली ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हयात असणारे नागरिक, त्यांच्या कुटुंबीयांना राज्य अतिथी म्हणून निमंत्रित करून वळिवडे पोलंड कॅम्पच्या स्मृती जगविण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती घराण्याने केले होते. यामुळे इंडो-पोलिश संबंध आणखीनच दृढ झाले. तेव्हा कोल्हापूरच्या जनतेचाही सन्मान करण्यासाठी झ्बिग्नीव राऊ यांच्या हस्ते ‘द बेने मेरिटो’ हा सन्मान संभाजीराजे छत्रपती यांना पोलिश दूतावासात प्रदान करण्यात आला. पुढे  जुलै, २०२२ मध्ये संभाजीराजे छत्रपती यांना पोलंडची राजधानी वॉर्सा येथे विशेष सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले गेले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained how is the relationship between kolhapur and poland print exp amy