सध्या मुंबईत सूर्य आग ओकत आहे. गेले काही दिवस मुंबईतील तापमान ३७ अंशांपार नोंदले जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई तसेच कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. राज्यात मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सांताक्रूझ येथे (३८.४ अंश से.) झाली. उष्णतेची लाट म्हणजे काय, उष्णतेच्या लाटेचा इशारा केव्हा दिला जातो याचा आढावा…

उष्णतेची लाट म्हणजे काय?

एखाद्या मैदानी प्रदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक, किनारपट्टी भागांत ३७ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक आणि डोंगराळ भागांत ३० अंश किंवा त्याहून अधिक असल्यास उष्णतेची लाट आल्याचे घोषित केले जाते. एखाद्या ठिकाणी सरासरी कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान सलग तीन दिवस ३ अंश सेल्सिअसने जास्त असल्यास उष्णतेची लाट जाहीर करण्यात येते. तसेच सलग दोन दिवस एखाद्या ठिकाणी तापमान ४५ अंशांपेक्षा जास्त असेल तर त्यासही उष्णतेची लाट आली असे मानतात. तापमान ४७ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास तीव्र उष्णतेची लाट जाहीर करण्यात येते. साधारणपणे पूर्वमोसमी काळात, म्हणजेच मार्च ते जून या महिन्यांमध्ये उष्णतेच्या लाटा येतात. अपवादात्मक स्थितीत जुलैपर्यंत उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागतो. तसेच फेब्रुवारीत उष्णतेची लाट सहसा दिसून येत नाही. 

तापमान कुठे वाढले?

गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, तसेच कोकण किनारपट्टीच्या परिसरात तापमानात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी सर्वाधिक तापमानाची नोंद रत्नागिरी, तसेच पालघरमध्ये झाली होती. यावेळी रत्नागिरीचे कमाल तापमान ३८.९ अंश सेल्सिअस, तर पालघरचे तापमान ४० अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले होते. त्यानंतर मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी सर्वाधिक तापमानाची नोंद सांताक्रूझ येथे झाली.

मुंबईचे तापमान का वाढले?

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात मुंबईतील तापमानात अचानक वाढ झाली. सुरुवातीच्या टप्प्यातच इतके ऊन वाढल्याने नागरिक आश्चर्यचकित झाले. ही उष्णता नेहमीसारखी नव्हती. मुंबई दमट हवामानासाठी ओळखली जाते. पण गेल्या चार दिवसांत वातावरणात आर्द्रता नव्हती. उन्हाचे चटके बसत होते. शिवाय, असह्य अशा झळा सोसाव्या लागत होत्या. हे वातावरण मुंबईत नेहमीच आढळून येत नाही. साधारणपणे विदर्भ – मराठवाड्यात अशा प्रकारचे हवामान असते. मुंबईतील किमान तापमान मात्र सरासरीच होते. पण कमाल तापमान नेहमीपेक्षा ६ अंश सेल्सिअस अधिक नोंदवले गेले. पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे मुंबईत ही स्थिती निर्माण झाल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला होता.

मुंबईसाठी ही स्थिती असाधारण नाही?

मुंबईत उष्णतेच्या लाटेची स्थिती नवीन नाही. साधारणपणे मार्च महिन्यात मुंबई आणि परिसरात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असते. यापूर्वी १९ फेब्रुवारी २०१७ रोजी ३८.८ अंश सेल्सिअस, २३ फेब्रुवारी २०१५ रोजी ३८.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर आता पुन्हा मंगळवार, २५ फेब्रुवारी २०२५ रोजी ३८.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईतील फेब्रुवारीमधील विक्रमी तापमानाची नोंद २५ फेब्रुवारी १९६६ रोजी झाली होती. तेव्हा कमाल तापमान ३९.६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले होते.

उष्णतेच्या लाटांचा सर्वाधिक त्रास कोणाला?

शेतात, तसेच रस्त्यावर काम करणारे मजूर, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले, स्थूल व्यक्ती, पुरेशी झोप न झालेले नागरिक, गरोदर महिला, अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग असलेले रुग्ण, अपस्मार रुग्ण, दारुचे व्यसन असलेले, काही विशिष्ट औषधे घेणाऱ्या व्यक्तींना उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक त्रास होऊ शकतो.

मानवी शरीराची सहनशक्ती किती?

वातावरणाचे तापमान ३७ डिग्री सेल्सियस असते तोपर्यंत मानवी शरीराला त्याचा त्रास होत नाही. मात्र त्यापेक्षा तापमान वाढल्यास शरीर वातावरणातील उष्मा शोषून घेऊ लागते आणि त्याचे विपरित परिणाम मानवाच्या शरीरावर होऊ लागतात. तापमान आणि आर्द्रता यांचा एकत्र होणारा परिणाम अधिक असतो.

गंभीर त्रास कोणते?

उष्णतेमुळे होणारा सर्वात गंभीर शारीरिक त्रास म्हणजे उष्माघात. यामध्ये व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. उष्माघात झाल्यास रुग्णाला ताप (१०६ डिग्री) येतो, त्वचा गरम आणि कोरडी पडते, नाडीचे ठोके वेगात आणि जोरात होत असल्याचे जाणवते, घाम येत नाही किंवा रुग्ण अर्धवट शुद्धीत असतो. एखाद्याला असा त्रास जाणवू लागला तर तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करणे योग्य ठरते. तसेच काही वेळा उष्णतेमुळे व्यक्तीला प्रंचड थकवा जाणवू शकतो. अशा वेळी खूप घाम येतो, डोकेदुखी, चक्कर येते किंवा उलटीदेखील होते.

उष्णतेच्या लाटेचा इशारा का महत्त्वाचा?

उष्माघात अर्थात ‘हीट स्ट्रोक’मुळे व्यक्तीचा मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढल्याचे निदर्शनास आले आहे. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात खारघर येथे उष्माघाताच्या झटक्यामुळे सुमारे १५ नागरिकांचा मृत्यू झाला होता. २०१० ते २०१९ आणि २००० ते २००९ अशी तुलना केली असता उष्णतेच्या लाटांचे प्रमाण सुमारे २४ टक्क्यांनी वाढले आहे. २००० ते २०१९ या काळात उष्णकटिबंधीय वादळांमुळे होणारे मृत्यू घटले, मात्र उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण ६२ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे उष्णतेची लाट असताना विशिष्ट काळजी घेणे गरजेचे आहे.

Story img Loader