राखी चव्हाण
हवामान बदलामुळे भारत आणि सिंधू खोऱ्यातील २.२ अब्ज लोकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा ‘प्रोसीडिंग्ज ऑफ नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासाने दिला असतानाच, ‘ऑक्टोबर उष्म्या’चे चटके महाराष्ट्रात जाणवू लागले आहेत. हा उष्मा पाऊस थांबताच झपाटय़ाने वाढला, हेही विपरीत हवामानाचे लक्षण मानले गेले आहे.
भारतात हवामान बदलाचा परिणाम दिसतो?
हवामान बदलामुळे गेल्या तीन दशकांमध्ये गंगा नदीच्या पात्रात आणि ईशान्य भारतात पावसाचे प्रमाण कमी होत आहे; तर वायव्य भारत, पश्चिम घाट, तमिळनाडू, रायलसीमा, तेलंगणा आदी प्रदेशांत प्रमाणाबाहेर पाऊस पडत आहे. हवामान बदलामुळे एकीकडे पावसाचे दिवस कमी होत असताना दुसरीकडे मुसळधार पावसाच्या घटनाही घडत आहेत.
हेही वाचा >>> हमासचा लष्करप्रमुख मोहम्मद देईफ कोण आहे? इस्रायलने त्याला अनेकदा मारण्याचा प्रयत्न का केला?
महाराष्ट्रावरही परिणाम झाला?
अधूनमधून पाऊस पडणे आणि उष्णता वाढणे हादेखील हवामान बदलाचा दुष्परिणाम आहे.या वर्षी महाराष्ट्रात ही स्थिती दिसलीच, पण गेल्या काही वर्षांत परतीचा पाऊस निकषाप्रमाणे आणि वेळेत परत गेलेला कधीच दिसून आला नाही. याउलट पावसाळय़ाची अखेर आणि हिवाळय़ाच्या आधी (ऑक्टोबरमध्ये) तापमानात प्रचंड वाढ होते आहे.
ऑक्टोबर उष्णच असतो, नवे काय?
ऑक्टोबरमध्ये दरवर्षी तापमान वाढते, पण या वेळी तापमानवाढीचे प्रमाण गेल्या काही वर्षांच्या तुलनेत वाढले आहे. मुंबईत शुक्रवारी पारा ३६ अंश सेल्सिअसवर गेला, विदर्भातील तापमान आठवडाभर ३५ अंशांपेक्षा अधिक राहिले तर मराठवाडय़ात हीच स्थिती आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी तापमानात १.५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, राज्यातील किमान तापमानाची पातळीही गेल्या दहा दिवसांत वाढते आहे.
हेही वाचा >>> भारतीय नागरिक इस्रायलमध्ये रुग्णसेवक म्हणून का जातात? जाणून घ्या…
नवा अभ्यास काय सांगतो?
‘प्रोसीडिंग्ज ऑफ नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले आहे की, जागतिक तापमानवाढ एक अंश सेल्सिअस या सध्याच्या पातळीपेक्षा अधिक वाढत गेल्यास दरवर्षी कोटय़वधी लोक उष्णता आणि आद्र्रतेला सामोरे जातील. ही स्थिती शतकाच्या अखेरीस मानवी सहनशीलतेच्या मर्यादेबाहेरची ठरेल. अमेरिकेतील पेन स्टेट कॉलेज ऑफ हेल्थ अँड ह्यूमन डेव्हलपमेंट, पडर्य़ू युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्स आणि पडर्य़ू इन्स्टिटय़ूट फॉर अ सस्टेनेबल फ्यूचर येथील संशोधकांनी या अभ्यासाअंती दिलेला ‘ग्रहांचे तापमान १.५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढले तर संपूर्ण ग्रहावरील मानवी आरोग्यासाठी ते घातक ठरेल’ हा इशारा भारतासाठी महत्त्वाचा आहे.
तापमान वाढत राहिल्यास परिणाम काय?
वाढत्या हवामान बदलामुळे सिंधू नदीच्या खोऱ्यात उष्णतेच्या लाटा आणि त्यानंतर दरवर्षी उष्णतेच्या तासांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक सरासरी पृष्ठभागाच्या तापमानात प्रत्येक अंशाच्या वाढीसह उष्णतेचा ताण तीव्रतेने आणि प्रमाणात वाढतो. मान्सूनच्या गतिशीलतेमुळे दक्षिण आशिया आणि पूर्व चीनमध्ये उष्णतेची स्थिती वाढण्याची शक्यता असते. या प्रदेशांमध्ये प्रामुख्याने उच्च आद्र्रता असलेल्या उष्णतेच्या लाटा जाणवतील, ज्या अधिक धोकादायक असू शकतात. कारण हवा जास्त आद्र्रता शोषून घेऊ शकत नाही. तापमानात याच पद्धतीने सातत्याने वाढ होत राहिल्यास त्याचा सर्वात मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होईल. शेतातील पिके नाहीशी होतील आणि अब्जावधी लोक स्थलांतर करतील. लोकांना काही तासांत थंड होण्याचा मार्ग सापडला नाही, तर यामुळे थकवा, उष्माघात आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीवर ताण येऊ शकतो. ज्यामुळे असुरक्षित लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हीच तापमानवाढ तीन अंश सेल्सिअसपर्यंत गेली तर दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांनाही अत्युच्च उष्णतेचा सामना करावा लागेल.
हवामान बदल रोखता येतो ना?
तापमानवाढ रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र अद्यापही त्यात यश मिळालेले नाही. जीवाश्म इंधन जाळल्याने कार्बनडाय ऑक्साइडचे होणारे उत्सर्जन रोखण्यासाठी विविध देशांनी स्वेच्छेने काही बंधने घालून घेतली आहेत, सन अमुकपर्यंत आम्ही इतके टक्के उत्सर्जन कमी करू अशी वचने दिली आहेत, पण ती कोणत्या देशाने पाळली हा प्रश्नच आहे. मानवांनी हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे, कार्बन उत्सर्जनाऐवजी हरित ऊर्जा वापरणे हे पर्याय सुचवले जातात मात्र, या अंमलबजावणीअभावी तापमानवाढीवर कुणालाही अंकुश लावता आलेला नाही. rakhi.chavhan@expressindia.com