झाडांवर करण्यात आलेली रोषणाई हे प्रकाश प्रदूषण असल्याची तक्रार पर्यावरण क्षेत्रातील अभ्यासक आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. याविषयीच्या जनहित याचिकेची दखल मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच घेतली.
उच्च न्यायालयाने नेमके काय केले?
प्रकाश प्रदूषणाविषयी सरकार गंभीर आहे की नाही, प्रकाश प्रदूषण आटोक्यात ठेवण्यासाठी काही नियम का नाहीत, शहरांमधील झाडांवर रोषणाई करण्याचे कारण काय, अशा आशयाची एक जनहित याचिका उच्च न्यायालयाकडे सादर करण्यात आली होती, न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली. सुनावणी सुरू करण्यापूर्वी न्यायालयाने राज्य सरकारसह मुंबई, ठाणे तसेच मीरा-भाईंदर पालिकेकडे स्पष्टीकरण मागितले आहे.\
हेही वाचा >>>काँग्रेसची नवी यादी जाहीर; दिल्लीत कन्हैया कुमार विरुद्ध मनोज तिवारी लढत होणार
प्रकाश प्रदूषण म्हणजे काय?
प्रकाश प्रदूषण म्हणजे ‘कृत्रिम प्रकाशाचे अतिक्रमण’. दिवस आणि रात्र म्हणजेच उजेड आणि काळोख या चक्रात काळोखावर कृत्रिम प्रकाशस्रोतांचे अनावश्यक प्रमाणात होणारे अतिक्रमण अशी प्रकाश प्रदूषणाची व्याख्या करता येईल. सध्या झाडांवर करण्यात आलेली रोषणाई आणि त्याबाबतच्या उच्च न्यायालयातील याचिकेमुळे हा मुद्दा चर्चेत आला असला तरी गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाश प्रदूषणावर मंथन सुरू आहे. यापूर्वीही मरिन ड्राइव्ह परिसरातील नागरिकांनी प्रकाश प्रदूषणाच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केल्या होत्या.
याही प्रदूषणाचा पर्यावरणावर परिणाम होतो?
प्रकाश प्रदूषणाचे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे संशोधनातून पुढे आले. प्राणी, पक्षी, कीटक यांचा दिनक्रम सूर्योदय आणि सूर्यास्तानुसार ठरलेला असतो. प्रकाश प्रदूषणामुळे दिवस आणि रात्र यांच्यातला त्यांना फरक कळत नाही. काही प्राणी दिवसा झोपतात आणि रात्री शिकारीला बाहेर पडतात. अशा प्राण्यांना प्रखर उजेडामुळे रात्र झाल्याचे जाणवत नाही आणि त्यांचे जीवनचक्र बिघडते. कासवे नेहमीच रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर येऊन अंडी घालतात. काही काळाने अंडी फोडून पिल्ले बाहेर आल्यावर ती समुद्रात पडलेल्या चंद्रप्रकाशाच्या दिशेने चालत जातात. मात्र कृत्रिम प्रकाशामुळे कासवांची दिशाभूल होते आणि ती समुद्राच्या दिशेने जाण्याच्या ऐवजी चुकीच्या दिशेने जातात. स्थलांतर करणारे अनेक पक्षी चंद्र आणि ताऱ्यांच्या प्रकाशानुसार दिशा ओळखून प्रवास करत असतात. प्रकाश प्रदूषणामुळे या पक्ष्यांची दिशाभूल होते.
हेही वाचा >>>इस्रायलच्या हल्ल्यामागे कुणाचा हात? ज्यू राष्ट्रावर हल्ला करणारी इस्लामिक संघटना कोणती?
मानवनिर्मित प्रकाश माणसांसाठीही अनिष्ट?
प्राण्यांबरोबरच प्रकाश प्रदूषणाचा मानवावरही तितकाच परिणाम होतो. रात्रीच्या वेळी वाढलेल्या प्रकाशामुळे मानवी शरीरातील मेलाटोनिनचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे झोपेची कमतरता, थकवा, डोकेदुखी, तणाव, चिंता आणि इतर आरोग्य समस्या उद्भवतात. कृत्रिम प्रकाशात जास्त प्रमाणात राहणारी बालके आणि किशोरवयीन मुले कमी झोप घेतात, असे २०२० मध्ये अमेरिकेतील एका वैद्यकीय संस्थेने केलेल्या संशोधनातून दिसले आहे.
वनस्पतींनाही अपाय होऊ शकतो?
झाडांवर किंवा झाडांजवळ प्रखर प्रकाश असल्यास त्यांच्या जीवनचक्रावरही परिणाम होत असल्याचे वनस्पतीशास्त्र अभ्यासकांचे म्हणणे आहे. रस्त्यावरील दिव्यांजवळ वाढणाऱ्या वनस्पतींचे परागकण कमी होतात. अशा झाडांचा फुला-फळांचा बहर कमी होतो. मोठय़ा झाडांवरही पथदिव्यांचा विपरीत परिणाम होतो. कळय़ा लवकर उमलतात, पानगळ लवकर होते. वनस्पतींबरोबर त्यांच्यावरील कीटक, पक्ष्यांची घरटी यांच्यावरही परिणाम होतो.
प्रकाश प्रदूषण टाळणार कसे?
प्रकाश प्रदूषण टाळण्यासाठी उद्याने, परिसरातील प्रकाश (गरज असलेले प्रकाश दिवे सोडून) विशिष्ट कालावधीनंतर बंद करावा. अधिक काळ दिवे सुरू राहिल्यास प्रदूषण होते. प्रखर दिव्यांऐवजी माफक प्रकाश देणारे, कमी ऊर्जा वापरणारे दिवे लावावेत. गरज नसताना दिवे बंद करावेत किंवा त्यांची तीव्रता कमी करावी. रोषणाई कमी करणे, प्रखर प्रकाश परावर्तित करणाऱ्या जाहिरात फलकांवर निर्बंध आणण्यासारखे उपाय प्रशासकीय यंत्रणांनाच अमलात आणावे लागतील.