राखी चव्हाण
माळढोक या पक्ष्यावरून पुन्हा एकदा सरकार आणि पर्यावरणवादी समोर आले आहेत. नामशेष होण्याच्या मार्गावरील या पक्ष्याला अधिवास आणि विकास प्रकल्पांचा मोठा फटका बसला आहे. माळढोक हे केवळ निमित्तमात्र आहे, पण भारतातच नाही तर भारताबाहेरदेखील असे अनेक पक्षी आहेत, ज्यांना अशाच धोक्यांचा सामना करावा लागत आहे. यातील अनेक पक्षी हे वन्यजीव संरक्षणाअंतर्गत अधिसूची एकमध्ये आहेत आणि ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
पक्ष्यांच्या प्रजातीत किती टक्क्यांनी घट?
पक्ष्यांच्या प्रजातीत दरवर्षीच मोठ्या संख्येने घट होत आहे. भारतातच नाही तर भारताबाहेरदेखील हवामान बदल, अधिवासाचा नाश अशा अनेक कारणांमुळे ही संख्या कमी होत आहे. अलीकडेच एका अहवालातून पक्ष्यांच्या चार प्रजातींच्या संख्येत ५० ते ८० टक्क्यांची घट झाल्याचे सांगण्यात आले. यात माळढोक आणि तणमोरसारख्या गवताळ प्रदेशातील पक्ष्यांचे प्रमाण मोठे आहे. एवढेच नाही तर सारस या पक्ष्याची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. अधिवासाचे विखंडन आणि ऱ्हास यामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ‘स्टेट ऑफ इंडियन बर्ड्स २०२३’ च्या ऑगस्ट २०२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. त्यात लहान प्रॅटिनकोल, लिटल रिंग्ड प्लोव्हर, आणि लिटल टर्नचादेखील समावेश आहे.
हेही वाचा >>>निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
पक्ष्यांच्या अधिवासांचा नाश कशामुळे?
सिंचन प्रकल्प, वाळू उत्खनन, वाहतूक, वाढलेला मानवी अधिक्षेप, घरगुती वापर आणि कृषी व औद्योगिक स्रोतांपासून होणारे प्रदूषण यांसारख्या कारणांमुळे तसेच नदी काठांच्या व्यापक ऱ्हासामुळे पक्ष्यांचा अधिवास नाहीसा होत आहे. आठ महिन्यांपूर्वी प्रकाशित अहवालात हे नमूद आहे. ऊर्जा, पायाभूत सुविधांचा अधिवासावर होणाऱ्या नकारात्मक परिणामावरही या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. अर्धशुष्क व गवताळ प्रदेश हा माळढोकचा अधिवास असताना विकासात्मक प्रकल्पासाठी सरकारी अहवालात त्याची पडीक जमीन म्हणून चुकीची नोंद आहे. शेती आणि पायाभूत सुविधांसाठी गवताळ प्रदेश नाहीसे करण्यात आले.
धोका का आणि कसा?
करकोचा, माळढोक, क्रेन, गिधाडे, गरुड यांसारख्या मोठे शरीर असलेल्या पक्ष्यांबरोबरच इतर लहान प्रजातींना जास्त धोका आहे. राजस्थानात पवनऊर्जा आणि उच्चदाब वीजवाहिन्यांमुळे माळढोक पक्ष्यांना धोका निर्माण झाला आहे. किनारपट्टीवरील अधिवास ऱ्हास, जमिनीचा वापर बदल, अधिवासांजवळील विकासात्मक उपक्रम, नदीचा मार्ग अडवणे, व्यावसायिक जलसंवर्धन, अपारंपरिक मीठ उत्पादन, पक्ष्यांची शिकार यामुळेदेखील पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा पवन ऊर्जा उत्पादक देश आहे. ऊर्जा पायाभूत सुविधांमुळे पक्ष्यांच्या अधिवासांना धोका निर्माण झाला आहे.
हेही वाचा >>>‘ऑपरेशन मेघदूत’ची ४० वर्षे… पाकिस्तानला चकवा देत जगातील सर्वांत उंच युद्धभूमी सियाचिनवर भारताने कसा मिळवला ताबा?
व्याघ्रकेंद्रित धोरणाचा फटका?
भारतात जंगलातील पर्यटन व्याघ्रकेंद्रित झाल्याने केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाचा रोख व्याघ्रसंवर्धनावर अधिक राहिला. वाघाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जेवढ्या तातडीने पावले उचलली जातात, ती इतर प्राण्यांबाबत उचलली जात नाहीत. पक्षी ही प्रजाती तर त्यापासून खूपच दूर आहे. वाघ हा वन्यजीव संरक्षणाअंतर्गत अधिसूची एकमध्ये येणारा प्राणी, पण पक्षीदेखील अधिसूची एकमध्ये आहे. मात्र, केंद्राच्या लेखी वाघ महत्त्वाचा असल्याने या पक्ष्यांकडे दुर्लक्ष झाल्याने ते नामशेषत्वाच्या यादीत जात आहेत.
कोणत्या प्रजाती धोक्यात?
जगभरातच अधिवास नष्ट होणे, हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेप यामुळे अनेक लहान पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. फिलीपीन गरुड शिकार करणाऱ्या सर्वांत मोठ्या आणि सर्वात शक्तिशाली पक्ष्यापैकी एक मानला जातो. जंगलतोड आणि शिकारीमुळे त्याला गंभीर धोक्याचा सामना करावा लागत आहे. कॅलिफोर्निया कॉन्डोर या पक्ष्याला अजूनही विषबाधा व अधिवास नष्ट होण्याच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. मध्य भारतातील जंगलात वनघुबडांना अधिवास नष्ट होण्याच्या धोक्याचा सामना करावा लागतो. इंडोनेशियातील जॉवन हॉक ईगल धोक्यात आहे. जंगलतोडीमुळे त्याचा अधिवास धोक्यात आला आहे. यासारखे देशविदेशातील काही पक्षी नामशेषाच्या मार्गावर आहेत.
rakhi.chavhan@expressindia.com