भक्ती बिसुरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुमारे दोन ते अडीच वर्षांपासून करोना संसर्गाच्या झळा सोसल्यानंतर सगळे जगच आता पूर्वपदावर आले आहे. देशोदेशी आढळणाऱ्या करोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे, निर्बंधही संपुष्टात आले आहेत. त्यामुळे करोनाचे संकट टळले असे वाटून आपण मोकळा श्वास घेतो म्हणेपर्यंत जगाच्या एखाद्या कोपऱ्यात करोनाचा नवाच प्रकार आढळून येतो आणि धाकधूक वाढते. आतापर्यंत केवळ अडीच वर्षांच्या कालावधीत करोनाचे कित्येक प्रकार आले. अल्फा, डेल्टा, ओमायक्रॉन, डेल्टाक्रॉन हे त्यांपैकी काही प्रमुख प्रकार आहेत. डेल्टा या प्रकाराने जगभर मोठी मनुष्यहानी घडवून आणली तर ओमायक्रॉनमुळे प्रचंड प्रमाणात लोकसंख्येला सौम्य लक्षणांसह करोना संसर्ग झाला. एप्रिल-मे २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचे बीए. ४ आणि बीए. ५ हे प्रकार जगभर पसरले. त्यामुळे वाढलेला रुग्णसंख्येचा आलेख सपाट होईपर्यंत आता पुन्हा एकदा संपूर्ण महासाथीचे उगमस्थान असलेल्या चीनमधूनच नव्या करोना प्रकारांची चर्चा समोर येत आहे. बीएफ. ७ आणि बीए. ५.१.७ हे ते दोन नवे प्रकार असून अतिवेगवान मात्र तरी सौम्य अशा ओमायक्रॉनचे उपप्रकार म्हणून हे दोन्ही प्रकार समोर येत आहेत.

करोनाचा नवा प्रकार?

नुकतीच चीनमधून याबाबतची बातमी आली आहे. चीनमधील मोंगोलिया ऑटोनॉमस रिजन या भागात करोनाच्या ओमायक्रॉन या विषाणूचा बीएफ. ७ हा उपप्रकार सर्वप्रथम आढळून आला. त्यानंतर अवघ्या आठवडय़ाभरातच चीनमधील बहुतेक प्रांत बीएफ. ७च्या संसर्गाने व्यापले आहेत. ४ ऑक्टोबरला चीनच्या यांताई आणि शौगुआन या शहरांमध्ये बीएफ. ७ सर्वप्रथम आढळला. यापूर्वी जगभरातील रुग्णसंख्यावाढीस कारणीभूत ठरलेल्या ओमायक्रॉनच्या प्रकाराचा हा उपप्रकार असल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात येत आहे. बीए. ५.१.७ हा प्रकारही याबरोबरीने आढळून आला असून हे दोन्ही प्रकार अत्यंत वेगाने संक्रमण करणारे असल्याचे चीनमधल्या परिस्थितीवरून समोर येत आहे. हे प्रकार ओमायक्रॉनचे असल्यामुळे त्यांच्या वाढीचा वेग अधिक आहे. या दोन्ही प्रकारांमुळे रविवारी (९ ऑक्टोबर) एकाच दिवसात चीनमध्ये सुमारे १८०० नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर इतर देशांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात येत आहे. हे उपप्रकार ओमायक्रॉन या सौम्य संसर्ग करणाऱ्या, मात्र अत्यंत वेगाने संसर्ग करणाऱ्या करोना प्रकाराचे असल्याने त्याची तीव्रता किती आहे हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये हे दोन्ही उपप्रकार मोठय़ा रुग्णसंख्येला संसर्ग करण्यास कारणीभूत ठरतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नवी लाट येणार?

बीएफ. ७ आणि बीए. ५.१.७ या नवीन करोना प्रकारांमुळे संसर्गाची लाट येण्याची शक्यता आहे किंवा नाही याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. करोनाच्या या दोन्ही नव्या प्रकारांचे रुग्ण अद्याप चीनमध्येच आढळून आलेले आहेत. बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्क आणि इंग्लंडमध्ये यापैकी बीए. ५.१.७ याचे रुग्ण आहेत. मात्र भारतात किंवा भारतीय उपखंडाच्या कोणत्याही भागात त्यांचे अस्तित्व आढळल्याचे अद्याप तरी समोर आलेले नाही. ज्या नागरिकांचे लसीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही किंवा ज्यांना ओमायक्रॉनच्या यापूर्वीच्या प्रकारांमुळे आलेल्या लाटेमध्ये संसर्ग झालेला नाही त्यांना आता संसर्गाचा धोका आहे. त्याचबरोबर लसीकरण पूर्ण झालेल्यांनाही संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे चीनमधील परिस्थितीवरून तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मात्र रुग्णसंख्या लाटेचे स्वरूप धारण करेल का याबाबत कोणतीही स्पष्टता अद्याप नाही. चीन आणि काही युरोपीय देशांमध्ये बीएफ. ७ आणि बीए. ५.१.७ मुळे संसर्ग झालेल्या रुग्णांना खोकला, थकवा, अंगदुखी, वासाची क्षमता कमी होणे, काही प्रमाणात ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम, छातीत दुखणे अशी लक्षणे असल्याचे निरीक्षण डॉक्टरांकडून नोंदवण्यात आले आहे. ही लक्षणे बीए. ४ आणि बीए. ५च्या संसर्गाशी साधर्म्य असण्याची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.

काळजीचे कारण किती?

चीनमध्ये नुकतेच आढळलेले बीएफ. ७ आणि बीए. ५.१.७ हे दोन्ही उपप्रकार हे ओमायक्रॉन या प्रकारातून आलेले आहेत. यापूर्वी ओमायक्रॉनचे बीए. ४ आणि बीए. ५ हे प्रकार जागतिक आरोग्य संघटनेने चिंताजनक प्रकार (व्हेरियंट ऑफ कन्सर्न) म्हणून जाहीर केले होते. नुकत्याच आढळलेल्या प्रकारांबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून अद्याप कोणतेही भाष्य करण्यात आले नसले तरी लसीकरण झालेल्या नागरिकांनाही या प्रकारांचा संसर्ग होण्याची शक्यता चीनमधील शास्त्रज्ञ वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी अलीकडे आढळलेल्या करोनाच्या नवीन प्रकारांप्रमाणेच हे प्रकारही सौम्य लक्षणांचे ठरण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे काळजीचे कारण नाही. मात्र लसीकरण न झालेले, ज्येष्ठ नागरिक, सहव्याधीग्रस्त यांनी त्याबाबत गाफील न राहण्याचे आवाहन सर्व स्तरातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुखपट्टीचा वापर, हात धुणे आणि संसर्गाची कोणतीही लक्षणे असलेल्या व्यक्तीपासून शारीरिक अंतर राखणे हे संसर्गाची शक्यता टाळण्याचे खात्रीशीर उपाय असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित करण्यात आले आहे.

वर्धक मात्रा उपयुक्त?

राज्याचे करोनाविषयक तांत्रिक सल्लागार आणि माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, की चीनमध्ये या दोन उपप्रकारांमुळे वेगाने संसर्ग होत असल्याची माहिती आहे. केवळ चीनमध्येच नव्हे तर असे उपप्रकार जगातील कोणत्याही देशात कोणत्याही वेळी नव्याने आढळून येण्याची शक्यता नेहमीच कायम राहणार आहे. भारतातही मध्यंतरी बीए. ४, बीए. ५ आणि बीए. २.७५ या करोनाच्या प्रकारांमुळे रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ झाल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून करोना प्रतिबंधात्मक नियमांच्या पालनातील सातत्य आवश्यक आहे. मुखपट्टीचा वापर हा साधा सोपा आणि प्रतिबंधात्मक उपाय आहे. विशिष्ट प्रकारांसाठी लशीची (व्हेरियंट स्पेसिफिक) वाट न पाहता वर्धक मात्रेसह लसीकरण पूर्ण करण्यातून सर्व नव्या प्रकारांविरुद्ध पुरेसे संरक्षण मिळणे शक्य आहे, असेही डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट केले आहे.

bhakti.bisure@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained new coronavirus variant detected in china print exp 1022 zws