मध्यम पल्ल्याच्या आणि घनरूप इंधनचलित हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची तिसरी चाचणी घेतल्याचे उत्तर कोरियाने नुकतेच जाहीर केले. क्षेपणास्त्र भेदी यंत्रणेला कुचकामी ठरवतील अशा स्वरूपाच्या धोकादायक हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या स्पर्धेत यामुळे उत्तर कोरियासारखा बेभरवशाचा देश दाखल झाला आहे. ही बाब चिंताजनक कशी ठरेल, याविषयी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे कशी असतात?

ध्वनीच्या वेगापेक्षा पाचपट वेगाने म्हणजे साधारण ताशी ६२०० किलोमीटर वेगाने (ताशी ३८५० मैल) आणि बहुतेकदा कमी उंचीवरून स्फोटकाग्रे (वॉरहेड्स) वाहून नेण्याची या क्षेपणास्त्रांची क्षमता असते. या क्षेपणास्त्रांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांची लवचीकता. म्हणजे क्षेपकवक्र (ट्रॅजेक्टरी) बदलण्याची या क्षेपणास्त्रांची क्षमता असते. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांपेक्षा काही वेळा अधिक वेगवान आंतरखंडीय क्षेपणास्त्रेही विकसित झाली आहेत. पण त्यांच्यात हायपरसॉनिक क्षेपणास्त्राइतका अचूक लक्ष्यभेद करण्याची शक्यता नसते. 

हेही वाचा >>>निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार का राहतात उपेक्षित? काय आहेत कारणं?

उत्तर कोरियाकडील क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य काय?

उत्तर कोरियाने यापूर्वी दोन वेळा हायपरसॉनिक क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या. २०२१मधील चाचणीदरम्यान ग्लायडरच्या आकाराचे स्फोटकाग्र होते. तर २०२२मध्ये नेहमीच्या परिचयातले, कोनच्या आकाराचे स्फोटकाग्र आजमावले गेले. अर्थात ही माहिती दक्षिण कोरियाच्या लष्करी हेरांनी टिपली. दुसऱ्या प्रकारातील क्षेपणास्त्र मॅनुवरेबल रिएंट्री (MaRV) प्रकारातील आहे. म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाऊन पुन्हा वातावरणात प्रवेश करत असतानाच दिशा बदलण्याची क्षमता या प्रकारच्या क्षेपणास्त्रामध्ये असते. याचा एक मोठा फायदा म्हणजे स्थायी आणि अस्थायी अशा दोन्ही लक्ष्यांचा वेध घेणे शक्य होते. शिवाय क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेस चकवा देण्याची क्षमता या क्षेपणास्त्राला अधिक धोकादायक बनवते. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून जगात कोठेही ‘शत्रू’वर हल्ला करण्याची क्षमता उत्तर कोरियाने हस्तगत केल्याचे तेथील सरकारी माध्यमांनी म्हटले आहे.

आणखी कोणाकडे हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे?

यंदा फेब्रुवारी महिन्यात रशियाने प्रथमच झिरकॉन या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वापर युक्रेनविरुद्ध केला. २०२१मध्ये चीनचे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र पृथ्वीप्रदक्षिणा घालून परतले आणि त्याने लक्ष्याचा वेध घेतला. अमेरिकेने त्याच वर्षी एअर-ब्रीदिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. उत्तर कोरियाने काही वर्षांपूर्वी हायपरसॉनिक क्षेपणास्त्र, आंतरखंडीय क्षेपणास्त्र आणि आण्विक पाणबुडी विकसित करण्याचा निर्णय घेतला. अर्थात उत्तर कोरियाकडे इतके उच्च तंत्रज्ञान आहे का याविषयी दक्षिण कोरिया, अमेरिका तसेच काही पाश्चिमात्य देशांना संदेह वाटतो. हे तंत्रज्ञान बहुधा रशिया किंवा चीनकडून उत्तर कोरियाला मिळत असावे, असा या देशांचा कयास आहे. 

हेही वाचा >>>विश्लेषण : मतदार यादीत तुमचं नाव नाही? मग हा लेख वाचा आणि तयारीला लागा

चिंतेत भर का?

हायपरसॉनिक तंत्रज्ञान गुंतागुंतीचे असले, तरी एकदा असे क्षेपणास्त्र विकसित करण्याची क्षमता प्राप्त झाल्यास उत्तर कोरियासारखे देश त्याचा गैरवापर करू शकतात. यातील सर्वांत धोकादायक भाग म्हणजे या क्षेपणास्त्रांच्या विरोधात क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली कुचकामी ठरण्याची शक्यता वाढते. उत्तर कोरियाप्रमाणेच इराणसारख्या युद्धखोर देशांकडे हे तंत्रज्ञान आल्यास संपूर्ण आशिया टापूच असुरक्षित बनेल. इस्रायल, पाकिस्तान यांसारख्या आणखी काही आक्रमक देशांनी या क्षेपणास्त्रविकासाकडे अधिक लक्ष पुरवल्यास भविष्यात गंभीर परिस्थिती ओढवू शकते. 

भारत आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्र

भारताने यापूर्वीच ब्रह्मोस हे हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र रशियाच्या साह्याने विकसित केले आहे. हे क्षेपणास्त्र लष्कराबरोबरच, हवाईदल आणि नौदल यांच्याकडेही आहे. याचा धसका अनेक देशांनी घेतला आहे. दीर्घ पल्ल्याचे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या दृष्टीने आरेखन  आणि इतर प्राथमिक चाचण्या भारताने घेतलेल्या आहेत. क्षेपणास्त्र आणि अग्निबाण विकास तंत्रज्ञानात भारताने बरीच मजल मारलेली असल्यामुळे भारतही लवकरच हायपरसॉनिक दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र विकसित करण्याची क्षमता बाळगून आहे. 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained north korea also has a destructive hypersonic missile print exp amy
Show comments