– शैलजा तिवले
ब्रिटनमध्ये आढळलेल्या एक्सई या करोनाच्या नव्या उपप्रकाराने बाधित असलेला एक रुग्ण मुंबईत आढळला आहे. मुंबई पालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या अकराव्या जनुकीय क्रमनिर्धारण चाचणीच्या (जिनोम सिक्वेन्सिंग) निष्कर्षांनुसार हे निदर्शनास आले आहे. भारतातील हा एक्सईचा पहिलाच रुग्ण आहे.
एक्सई म्हणजे काय?
एक्सई हा करोना विषाणूच्या ओमायक्रॉन या प्रकाराचा उपप्रकार आहे. ओमायक्रॉनच्या बीए.१ आणि बीए.२ या उपप्रकाराचे उत्परिवर्तन होऊन हा उपप्रकार निर्माण झाला आहे. यामध्ये बीए.१ आणि बीए.२ या जनुकीय घटकांचे मिश्रण झाल्याचे आढळले आहे. ब्रिटनमध्ये एक्सई हा विषाणूचा उपप्रकार १९ जानेवारी २०२२ मध्ये आढळला. जगभरात या विषाणूचे ६०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत.
हा कितपत घातक आहे ?
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत आढळलेल्या करोना विषाणूच्या प्रकारामध्ये हा सर्वाधिक वेगाने पसरणारा प्रकार आहे. परंतु याबाबत अद्याप पुरेशी माहिती नसल्यामुळे ब्रिटनमधील संशोधकांनाही याची तीव्रता, पसरण्याचा वेग याबाबत सांगता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतामध्ये केव्हा आढळला ?
भारतात एक्सईचा रुग्ण प्रथमच आढळला आहे. ही महिला रुग्ण मूळची दक्षिण आफ्रिकेतील नागरिक आहे. ती चित्रीकरणासाठी १० फेब्रुवारीला भारतात आली होती. त्यावेळी तिला करोनाची बाधा झालेली नव्हती. परंतु चित्रीकरणादरम्यान नियमितपणे केल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये २ मार्चला ती बाधित आढळली. तिचे नमुने चाचणीसाठी पाठविले असता एक्सईची बाधा झाल्याचे आढळले. ३ मार्चला दिलेल्या नमुन्यांमध्ये ही महिला करोनामुक्त झाल्याचेही आढळले आहे. या महिलेने लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या होत्या आणि ती लक्षणे विरहित होती.
भारताला या नव्या विषाणूपासून धोका आहे का?
‘बीए.१ आणि बीए.२ हे दोन्ही उपप्रकार देशभरात करोनाच्या तिसऱ्या लाटेपासून आढळत आहेत. त्यामुळे यांचेच गुणधर्म असलेल्या नव्या विषाणूपासून सध्या कोणताही धोका आहे असे वाटत नाही. तिसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या बाधित झाल्यामुळे करोनाविरोधात नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील तीन महिने तरी भारताला विषाणूच्या नव्या प्रकाराचा धोका नाही,’ असे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले आहे.
ही महिला मार्चमध्ये एक्सई विषाणूने बाधित झाली होती. त्यानंतर आता महिनाभराचा अवधी उलटला आहे. मुंबईतच ही महिला बाधित झाल्यामुळे या विषाणूचा प्रसार वेगाने होत असता, तर मुंबईतील रुग्णसंख्या वेगाने वाढली असती. परंतु तसे झालेले नाही. याउलट मुंबईसह राज्याची रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. तसेच मृतांची संख्याही कमी झालेली आहे. त्यामुळे या विषाणूपासून फारसा धोका नाही हे यावरून स्पष्ट होते, असे मृत्यूविश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
मुंबईत या विषाणूचे आणखी रुग्ण आढळले आहेत का?
मुंबईत फेब्रुवारी, मार्चमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांच्या जनुकीय चाचण्या पालिकेने केलेल्या आहेत. यातील अकराव्या चाचणीचे निष्कर्ष नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये हा एक्सईचा पहिला रुग्ण आढळला. या चाचण्यांमध्ये पालिकेने शहरात बाधित आढळलेल्या २३० रुग्णांचे नमुने जनुकीय चाचण्यांसाठी पाठविले होते. यातील ९९ टक्के म्हणजेच २२८ रुग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. एका रुग्णामध्ये कप्पा हा उपप्रकार आढळला आहे. मुंबईत याच विषाणूच्या प्रकाराचा प्रसार फारसा झालेला नाही. ओमायक्रॉनचे प्रमाण अधिक आहे.
हेही वाचा : COVID Vaccination : ‘बूस्टर डोस’ संदर्भात अदर पूनावालांचं मोठं विधान, म्हणाले…
एक्सईसारखे आणखी उपप्रकार जगभरात आढळले आहेत का?
ब्रिटनच्या यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, त्या देशात एक्सईव्यतिरिक्त आणखी काही उपप्रकारही आढळले आहेत. एक्स डी, एक्स एफ अशी नावे त्यांना दिली गेली आहेत. एक्सडीमध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉनचा उपप्रकार बीए.१ यांचे उत्परिवर्तन झाले आहे. फ्रान्स, डेन्मार्क आणि बेल्जियम या देशांमध्ये हा प्रकार आढळला आहे. एक्सएफमध्ये ब्रिटनमधील डेल्टा आणि बीए.१ विषाणूचे उत्परिवर्तन झाले आहे. एक्सएफ हा प्रामुख्याने ब्रिटनमध्ये आढळला आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाचे म्हणणे काय?
केंद्रीय आरोग्य विभागाने मुंबईत एक्सईचा रुग्ण आढळल्याचे नाकारले आहे. क्रमनिर्धारण चाचण्यांचा अभ्यास करणारी इंडियन सार्स-सीओव्ही२ जिनोमिक्स कन्सॉर्रिटयम (आयएनएसएसीओजी) या संस्थेतील तज्ज्ञांच्या मते या रुग्णाच्या क्रमनिर्धारण चाचणीचा अहवाल एक्सईच्या जनुकांनुसार नाही. त्यामुळे या रुग्णाला एक्सई या उपप्रकाराची बाधा झाली आहे, असे म्हणता येणार नाही, असे केंद्रीय आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. आयएनएसएसीओजीची संध्याकाळी बैठक झाली असून त्यात कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. जयंती शास्त्री सहभागी झाल्या होत्या. कस्तुरबा प्रयोगशाळेतील अहवालांचे विश्लेषण करण्यासाठी ते पुन्हा पाठविण्याची मागणी या बैठकीत केली आहे. त्यानुसार हे अहवाल पाठविले जाणार आहेत, असे मुंबई पालिका प्रशासनाने सांगितले आहे.