सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधातील गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले. यानंतर आता गुरुवारी (१४ एप्रिल) महाराष्ट्र पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरोधातील पाचही प्रकरणांशी संबंधित कागदपत्रे सीबीआयकडे हस्तांतरीत केली. परमबीर सिंग यांच्या विरोधातील पाच गुन्ह्यांपैकी दोन प्रकरणात आरोपपत्र देखील दाखल झालंय. ही पाच प्रकरणं कोणती? या प्रकरणांमध्ये परमबीर सिंग यांच्यावर नेमके काय आरोप आहेत? यावरील हे खास विश्लेषण…

गुन्हा क्रमांक एक

परमबीर सिंग यांच्याविरोधातील पाच गुन्ह्यांपैकी एक गुन्हा ऑगस्ट २०२१ मध्ये मुंबईतील गोरगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून केला जात होता. या प्रकरणात परमबीर सिंग यांनी बिमल अगरवाल या हॉटेलचालकाकडे खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी डिसेंबरमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं. यानंतर सचिन वाझेसह इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं.

गुन्हा क्रमांक दोन

परमबीर सिंग यांच्याविरोधातील दुसऱ्या प्रकरणात मार्च २०२२ मध्ये आरोपपत्र दाखल झालं. या प्रकरणी जुलै २०२१ मध्ये मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. मीरा भाईंदरमधील व्यावसायिक श्यामसुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला होता. परमबीर सिंग आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी खोट्या प्रकरणात नाव गोवलं आणि अटक न करण्यासाठी खंडणीची मागणी केली, असा आरोप अगरवाल यांनी केला होता.

हेही वाचा : “सर्व तपास CBI कडे वर्ग करा” परमबीर सिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दणका!

सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०२१ मध्ये या प्रकरणाच्या आरोपपत्रात परमबीर सिंग यांचं नाव न घेण्याचे निर्देश दिल्यानंतर सीआयडीने आरोपपत्रात परमबीर सिंग यांचा उल्लेख केलेला नाही.

गुन्हा क्रमांक तीन

एप्रिल २०२१ मध्ये पोलीस निरिक्षक भिमराव घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात तक्रार दिली. यानुसार घाडगे ठाणे पोलीस दलात कार्यरत असताना परमबीर सिंग यांनी एका व्यक्तिकडून खंडणी वसूल करण्यासाठी त्याच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्यास सांगितले होते.

गुन्हा क्रमांक चार

जुलै २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात परमबीर सिंग यांच्याविरोधात ठाण्यातील कोपरी पोलीस स्टेशनला एक गुन्हा नोंद झाला. व्यावसायिक श्यामसुंदर अगरवाल आणि त्यांचा पुतण्या शरद यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला. अगरवाल यांच्या या तक्रारीनुसार, परमबीर सिंग आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : “सरकार खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते तेव्हा…”; परमबीर सिंहप्रकरण CBIकडे सोपवल्याने राऊतांची टीका

गुन्हा क्रमांक पाच

या प्रकरणात व्यावसायिक केतन टन्ना यांनी तक्रार केली आहे. यानुसार परमबीर सिंग यांनी काही पोलीस अधिकारी आणि गँगस्टर रवी पुजारी यांनी धमकी देत खंडणी वसुल केली, असा आरोप आहे.

Story img Loader