वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरमधील तनपुरे मठात मंगळवारी (८ नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ऑनलाईन उपस्थितीत साने गुरुजी सत्याग्रह स्मारकाचं लोकार्पण झालं. शरद पवार यांनी या सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा देत साने गुरुजींच्या कामाचं कौतुक केलं. तसेच स्वतः ब्राह्मण जातीतून आले असतानाही साने गुरुजींनी गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन सत्याग्रह केला आणि वारकरी संप्रदायाचा समतेचा विचार पुढे नेला, असं मत व्यक्त केलं. या पार्श्वभूमीवर साने गुरुजींच्या पंढरपूर सत्याग्रहाचा इतिहास काय, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? त्याचे सामाजिक पडसाद काय पडले, या सत्याग्रह स्मारकाची निर्मिती कशी झाली, त्याचं महत्त्व काय अशा अनेक मुद्द्यांचा हा खास आढावा.
साने गुरुजी पंढरपूर सत्याग्रहाविषयी शरद पवार काय म्हणाले?
साने गुरुजींच्या सत्याग्रहाविषयी शरद पवार म्हणाले, “पंढरपूरचा विठोबा हा कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा व अठरा पगड जाती-जमातींचा देव आहे. परंतु या देवाच्या गाभाऱ्यापर्यंत जायला अस्पृश्यांना विरोध होता. मात्र, स्वतः ब्राह्मण जातीतून आलेले पांडुरंग साने यांनी गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन सत्याग्रह करण्याचे ठरवले.”
“देवाच्या गाभाऱ्यापर्यंत जायला अस्पृश्यांना विरोध होता”
“देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी या सत्याग्रहाला एकादशीपासून सुरुवात केली. साने गुरूजी अन्नाचा त्याग करून हा सत्याग्रह सुरू ठेवला. आपल्या निर्णयावर ठाम राहिले. प्रत्यक्षात विठ्ठलाचे मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी हा सत्याग्रह करतो, हे त्यांनी महात्मा गांधी यांना समजावून सांगितले. महात्मा गांधीजींचाही गैरसमज दूर झाला,” असं शरद पवारांनी सांगितलं
“अस्पृश्य समाजाच्या दिंड्यांना पंढरपूर मंदिरात कधीच प्रवेश मिळत नव्हता”
“१० मे १९४७ रोजी साने गुरूजींनी विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांसाठी प्रवेश देण्याचा सार्वजनिक अडथळा दूर झाल्यानंतर आपले उपोषण सोडले. अस्पृश्य समाजाच्या दिंड्या या पंढरपुरामध्ये जात, पण त्यांना मंदिरात कधीच प्रवेश मिळत नव्हता. सवर्णांच्या दिंड्यापासून त्या वेगळ्या होत्या. त्यांना विठ्ठलाचे दर्शन कधी होत नसे. चंद्रभागेच्या नदी काठापर्यंत त्यांना जाण्याची परवानगी होती. मात्र, इतर दिंड्या पुढे प्रवेश करायच्या. हा भेद नष्ट होण्यासाठी साने गुरुजींनी हा सत्याग्रह केला,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
“अस्पृश्यांना न्याय मिळवून देण्यासाठी साने गुरूजी यांनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबून संघर्ष केला. त्या संघर्षाचे स्मरण या स्मारकाद्वारे पुढील पिढीपर्यंत होत राहील,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.
साने गुरुजींच्या पंढरपूर सत्याग्रहाची पार्श्वभूमी काय?
ब्रिटीश काळात भारतात जशी राजकीय स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू होती, तशीच सामाजिक न्यायाचीही लढाई सुरू होती. ही सामाजिक न्यायाची लढाई मुख्यत्वे भारतातील जातीप्रथा, भेदभाव आणि अस्पृश्यतेविरोधात होती. याच लढ्यातील महत्त्वाची घटना म्हणजे ७५ वर्षांपूर्वी साने गुरुजींनी पंढरपूरच्या तनपुरे मठात अस्पृश्यांना विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी केलेले उपोषण. मात्र, ज्या वारकरी संत परंपरेने महाराष्ट्राच नाही तर देशभरात समतेची पताका फडकवली त्याच संताच्या ह्रदयात म्हणजे पंढरपुरात अस्पृश्यांना कधीपासून मंदीर प्रवेश बंद झाला आणि का हे समजून घेणं गरजेचं आहे.
साने गुरुजींच्या पंढरपूर सत्याग्रहाचा इतिहास काय?
याविषयी वारकरी संप्रदायातील तरुण कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर महाराज सांगतात, “नामदेवांपासून तुकारामांपर्यंतच्या संतांचं तत्वज्ञान, उपासना पद्धतीने ही परंपरा पुढे जात होती. परंतू मधल्या काळात पेशव्यांची सत्ता आली आणि येथे अनेक निर्बंध लागू करण्यात आले. एका पेशव्याने तर असा हुकुम काढला होता की, पंढरपूर नगरप्रदक्षिणा मार्गाच्या बाहेर हे अस्पृश्य थांबतील. त्यांनी नगरप्रदक्षिणा मार्गाच्या बाहेर प्रवेशही करायचा नाही आणि मंदिर परिसरात फिरकायचं नाही, असे हुकुम काढण्यात आले.”
व्हिडीओ पाहा :
“साधारणतः १५०-२०० वर्षे समतेचा विचार गाडण्याचा प्रयत्न झाला”
“एकूणच वारकरी संप्रदाय आणि त्यातील सर्व संत समतेचा विचार सांगत असताना इथली पुरोहितशाही, धर्मसत्ता ही एकत्र येऊन हा समतेचा विचार गाडू पाहत होती. हा प्रयत्न साधारणतः १५०-२०० वर्षे इथे झाला त्यामुळे नंतरच्या काळात अस्पश्यांना विठ्ठल मंदिरात प्रवेश नव्हता ही खंत अनेकांच्या मनात होती. त्यासाठी वा. रा. कोठारींपासून अनेकजण प्रयत्न करत होते, मात्र त्याला यश मिळत नव्हतं,” असं ज्ञानेश्वर बंडगर महाराजांनी सांगितलं.
दलित असल्याने संत चोखोबांनाही विठ्ठल मंदिरात प्रवेशास नकार
केवळ दलित असल्याने त्या काळात संत चोखोबांनाही विठ्ठल मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. चोखोबांनी मंदिर प्रवेश केल्यानंतर त्यांना बडव्यांनी मारहाण केली. याविषयी ज्ञानेश्वर महाराज बंडगर सांगतात, “वारकरी संतांनी १३ व्या शतकात समतेसाठीचा लढा दिला होता. त्याची सुरुवात संत नामदेवांनी केली होती. नामदेव आणि त्यांचे सर्व सहकारी पंढरपूरच्या वाळवंटात एकत्र जमून हा वारकरी विचार सांगत होते. पंढरपूरच्या पांडुरंग मंदिरात त्यावेळीही दलित, अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांना प्रवेश नव्हता. तसाच तो प्रवेश नामदेवांचे सहकारी चोखोबांनाही नव्हता. मात्र, चोखोबांनी धाडस केलं आणि ते मंदिरात गेले. तेव्हा तेथील बडव्यांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांना मंदिराबाहेर काढलं.”
“बडवे मज मारीती ऐसा काय अपराध”
त्यावेळी चोखोबांनी आपल्या अभंगातून “बडवे मज मारीती ऐसा काय अपराध, धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारीती ऐसा काय अपराध”, असा सवाल केला होता.
“चोखोबांची हाडंही मंदिरात नेऊ दिली गेली नाही”
पंढरपुरात मंदिर प्रवेशाबाबत दलितांसोबत झालेल्या अन्यायाची माहिती देताना तनपुरे महाराज ट्रस्टचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध कीर्तनकार बद्रीनाथ तनपुरे महाराज यांनी चोखोबांच्या मृत्यूचा प्रसंग सांगितला. ते म्हणाले, “१३५० ला नामदेव महाराज समाधीस्थ होण्याआधी पंजाबमधून आले. त्यावेळी चोखोबारायांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ते थेट मंगळवेढ्याला पोहचले आणि त्यांनी तेथून चोखोबारायांची हाडं पंढरपूरला आणली. तेव्हा ही हाडं मंदिरात नेऊ दिली गेली नाही.”
“नामदेवांनी पांडुरंगाच्या चरणाजवळ चोखोबांची समाधी केली”
“चोखोबारायांना जीवंतपणी तर दर्शनाला जाऊच दिलं नाही, पण मृत्यूनंतरही हाडं नेऊ दिली नाही. त्यानंतर नामदेवांनी पांडुरंगाच्या चरणाजवळ चोखोबांची समाधी केली. ही अशी पहिली दलिताची समाधी आहे. हाच विचार १३ शतकापासून २० शतकात साने गुरुजींच्या रुपाने अवतीर्ण झाला,” असंही तनपुरे महाराजांनी नमूद केलं.
“गणपती महाराजांना होळीत टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न”
विशेष म्हणजे साने गुरुजींच्या उपोषणाआधीही वारकरी संप्रदायाच्या इतिहासात काही स्थानिक पातळीवरचे परिवर्तनाचे प्रयत्न झाले होते. विदर्भात मंगळुरू दस्तगीर नावाच्या गावात वारकरी संप्रदायातील गणपती महाराजांनी ‘अजात’ समाजाचा प्रयोग केला होता. तेथे १९२९ मध्ये तेथील पहिलं विठ्ठल मंदिर गणपती महाराजांनी अस्पृश्यांसाठी खुलं केलं. त्यानंतर स्थानिक सनातन्यांनी त्यांना त्रास दिला. अगदी होळीत टाकून त्यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला, असं बंडगर महाराज सांगतात.
“गाडगेबाबांच्या प्रेरणेतून अस्पृश्य मानल्या गेलेल्या वारकऱ्यांसाठी मठ”
याच काळात गाडगेबाबाही वारकरी संप्रदायात होते. गाडगेबाबांनी नगरप्रदक्षिणा मार्गाच्या बाहेर तनपुरे मठ, कैकाडी बाबांचा मठ, गयाबाई मनमाड मठ, शंकरभाऊ वंजारी मठ अशा वेगवेगळ्या अठरापगड जातींची मठं बांधून घेतली. त्यांना कुसाबाहेरचे महाराजच म्हटलं होतं. गाडगेबाबांच्या प्रेरणेतून अस्पृश्य मानल्या गेलेल्या वारकऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय झाली. गाडगेबाबांसोबत जे अनुयायी होते ते समतेचा विचार मांडणारे होते. त्यापैकीच एक तनपुरे बाबांचा मठ आहे. याच मठात साने गुरुजींनी उपोषण केलं होतं.
“चार महिन्याच्या साने गुरुजींकडून महाराष्ट्रात ६०० सभा”
साने गुरुजींनी पंढरपुरात उपोषण करण्याआधी महाराष्ट्राचा चार महिन्यांचा दौरा केला होता. याविषयी माहिती देताना महाराष्ट्र राष्ट्र सेवा दलाचे माजी कार्याध्यक्ष आणि पंढरपूर साने गुरुजी स्मारक समिती अध्यक्ष राजाभाऊ अवसक म्हणाले, “सेनापती बापट साने गुरुजींच्या सत्याग्रह लढ्याचं नेतृत्व करत होते. त्यांनी साने गुरुजींना घेऊन चार महिने हा दौरा केला होता. चार महिन्याच्या या दौऱ्यात साने गुरुजींनी ६०० सभा घेतल्या होत्या. या सगळ्या सभांमध्ये महाराष्ट्र धर्म काय आहे, ही संताची भूमी आहे आणि संतांचा लोकधर्म काय आहे हे साने गुरुजी लोकांना सांगत होते. म्हणूनच साने गुरुजींच्या मुखातून ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हे गीत जन्मलं. हाच संतांचा जीवनसार साने गुरुजींना आत्मसात केला होता.”
“साने गुरुजींनी जातीभेदावर लोकांच्या जाणिवा जागृत केल्या”
साने गुरुजींचा महाराष्ट्र दौरा आणि त्यामागील उद्देश याविषयी अमळनेरच्या साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या कार्यवाह दर्शना पवार यांनी सांगितलं, “साने गुरुजींनी उपोषण करण्याआधी ते महाराष्ट्रभर फिरले. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील अनेक मंदिरं आणि विहिरी खुल्या केल्या. लोकांशी संवाद केला आणि जातपात मानायची नाही यासाठी लोकांच्या जाणिवा जागृत केल्या. नंतरच्या काळात कायद्याने मंदिरं खुलं होऊ शकलं असतं, मात्र कायद्याने लोकांना धाक निर्माण होऊ शकतो, त्यांच्यात जाणीव निर्माण होऊ शकत नाही.साने गुरुजींच्या या दौऱ्यामुळे ही जाणीव निर्माण झाली.”
हेही वाचा : साने गुरुजी महात्मा गांधींच्या विचाराचे द्योतक; पूर्ण आयुष्य जनतेच्या कल्याणासाठी केले काम- शरद पवार
साने गुरुजींनी १० दिवस उपोषण केल्यानंतर अखेर पंढरपुरातील विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठीही खुलं झालं. मात्र, पंढरपुरातील काही सनातनी लोकांनी या निर्णयाविरोधात विठ्ठलावर बहिष्कार टाकला. याविषयी ज्ञानेश्वर बंडगर महाराज सांगतात, “अस्पृश्यांच्या दर्शनाने देव बाटला आहे आणि त्यामुळे आम्ही मंदिरात जाणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. परंतू या पंढरीच्या पांडुरंगाने सगळ्या महाराजांना पुन्हा पंढरपुरात ओढून आणलं. कोणी १० वर्षे कोणी १५ वर्षे बहिष्कार टाकला, मात्र, शेवटी सर्वजण पांडुरंगाच्या मंदिरात गेले. त्याला केवळ एका अधिकारी महाराजांचा अपवाद आहे. अस्पृश्यांना दर्शन दिलं गेलं म्हणून ते अजूनही त्या मंदिरात जात नाहीत.”