शिवसेना म्हटलं की डरकाळी फोडणारा वाघ आणि धनुष्यबाण हे चिन्ह अगदी पक्कं समीकरण आहे. मात्र, शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर बंडखोर शिंदे गटाने थेट पक्षावरच अधिकार सांगितला आहे. एवढंच नाही, तर खरी शिवसेना आम्हीच असून आम्हालाच पक्षाचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळावं असाही दावा निवडणूक आयोगाकडे करण्यात आला. याविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला, तेथून ते प्रकरण घटनापीठाकडे गेलं आणि अखेर न्यायालयानेही हा निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचं म्हटलं. यानंतर आता शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जाते आहेत. या पार्श्वभूमीवर या धनुष्यबाण चिन्हाचा इतिहास काय? शिवसेनेला पक्षचिन्ह म्हणून धनुष्यबाण कधी मिळाला? याचा हा आढावा…
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लोकसत्ताचे अॅप डाऊनलोड करून लॉग-इन करा
सध्या हिंदुत्व, भगवा आणि धनुष्यबाणाचा ज्याप्रमाणे वेगळा न करता येणारा संबंध तयार झालाय त्यावरून अनेकांना विश्वास बसणार नाही, मात्र, धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेने मागणी करून घेतलं नव्हतं, तर ते निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिलं होतं. त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही ते आवडलं आणि पुढे ते शिवसेनेच्या ओळखीसोबत जोडलं गेलं.
अग्रलेख : ‘संघटना’ राहिल्याची शिक्षा!
शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी मुंबईतील मराठी माणसांच्या मुद्द्यावर झाली. त्यामुळे शिवसेना स्थापन झाली तेव्हा त्यांचं स्वरुप केवळ एका साध्या संघटनेचं होतं. संघटना म्हणून शिवसेनेने अनेक आंदोलनं केली आणि त्याचमुळे अल्पावधीत शिवसेनेचा नावलौकिक झाला. यानंतर पुढच्याच वर्षी शिवसेनेने राजकारणात उडी घेतली.
१९८८ मध्ये निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांची अधिकृत नोंदणी करण्यास सुरुवात केली. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांकडून नोंदणी आणि पक्षचिन्हाचे प्रस्ताव मागण्यात आले. यावेळी शिवसेनेने संघटनेची नोंदणी करताना आपली घटनाही दिली. यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आणि १९८९ मध्ये शिवसेना राजकीय पक्ष झाला. मात्र, पक्षचिन्ह दिलं नाही. याचं प्रमुख कारण होतं की कोणत्याही पक्षाला पक्षचिन्ह हवं असेल तर मागील निवडणुकीत किमान जितकी मतं हवी तेवढी शिवसेनेला मिळाली नव्हती.
विश्लेषण : शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ चिन्ह निवडणूक आयोगानं का गोठवलं?
यानंतर काही महिन्यांमध्येच झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाने युती केली. या निवडणुकीत शिवसेनेला लोकसभेच्या चार जागांवर विजय मिळाला आणि चार खासदार निवडून आले. यानंतर शिवसेनेने पुन्हा पक्षचिन्हासाठी अर्ज केला आणि निवडणूक आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह दिलं.
जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना जेव्हा धनुष्यबाण पक्षचिन्ह मिळाल्याचं समजलं तेव्हा त्यांनाही ते आवडलं आणि त्यापुढे धनुष्यबाण शिवसेनेचं अधिकृत पक्षचिन्ह झालं. तेव्हापासून आजपर्यंत शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणुका लढवत आहे.