प्रत्येकाच्या हातात असलेल्या स्मार्टफोनने सध्याचं जग बदलून टाकलं आहे. या स्मार्टफोनवर जवळच्या व्यक्तींशी फोनवर बोलणे, फोटो काढणे, आर्थिक व्यवहार करणे, ऑफिसची कामं करणं आणि इतर अनेक गोष्टी होतात. त्यामुळे स्मार्टफोन असलेला प्रत्येक व्यक्ती आपला फोन सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी सध्या प्रचलित असलेला पर्याय म्हणजे फोन घेतल्यापासून त्याला नुकसान होऊ नये म्हणून प्लास्टिक कव्हर वापरला जातो. मात्र, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटले की मोबाईलच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या या कव्हरचे फायदे कमी आणि नुकसानच अधिक आहे. ते कसं? समजून घेऊयात आजच्या विश्लेषणात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्मार्टफोनमधील उष्णता

स्मार्टफोन आपलं काम करत असतो तेव्हा अनेकदा फोनमध्ये उष्णता तयार होते. ही उष्णता फोनमधून बाहेरही टाकली जाते. मात्र, मोबाईलच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक कव्हर अनेकदा फोनमधून ही उष्णता बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेलाच अडथळा निर्माण करतात. त्यामुळे फोनमध्ये निर्माण झालेली उष्णता बाहेर न पडल्याने फोनवर त्याचा दुष्परिणाम होतो. यातून स्मार्टफोनचा काम करण्याचा वेग मंदावतो.

स्मार्टफोनमध्ये नेमकं काय होतं?

आपला स्मार्टफोन कोणतीही प्रकिया करतो तेव्हा फोनच्या प्रोसेसरमधून उष्णता बाहेर पडते. जेव्हा मोबाईलवर कव्हर असतो तेव्हा सहजपणे वातावरणात जाणारी हीच उष्णता प्लास्टिक कव्हरमुळे फोनमध्ये अडकून राहते. यामुळे प्रोसेसरचा वेगं मंदावतो.

फोनच्या चार्जिंगवरही परिणाम

फोनमध्ये तयार होणारी उष्णता बाहेर पडली नाही, तर त्याचा परिणाम फोनच्या फास्ट चार्जिंगवरही पडतो. उष्णतेचं हस्तांतरण न झाल्यानं फोनची चार्जिंग सावकाश होतं. बॅटरीवर अधिक दबाव निर्माण होऊ नये यासाठी ही प्रक्रिया घडते.

उष्णतेचा फोनच्या स्क्रिनवरील दुष्परिणाम

जेव्हा फोनमध्ये तयार झालेली उष्णता मोबाईल कव्हरमुळे फोनमधून बाहेर पडू शकत नाही. तेव्हा ही उष्णता स्क्रिनद्वारे बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. त्यामुळेच तुम्हीही तुमच्या मोबाईलची स्क्रिन तापल्याचं अनुभवलं असेल.

मोबाईल नेटवर्कवर परिणाम

मोबाईल तापल्यानंतर त्याचा परिणाम फोनच्या कनेक्टिव्हीटीवर देखील परिणाम होतो. मोबाईल कव्हरमुळे फोनचे सेंसर व्यवस्थित काम करण्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मोबाईलला नेटवर्क मिळण्यास अडचणी येतात. सेंसॉरशी संबंधित सर्वच प्रक्रियांवर याचा वाईट परिणाम होतो. कव्हरमुळे धुळ साठण्याचे प्रकारही घडतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained on how use of mobile cover for smartphone is dangerous pbs