– सुमित पाकलवार
ओडिशामधून स्थलांतरित हत्तींच्या समूहाने पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात उच्छाद मांडला आहे. मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी होत आहे. आतापर्यंत दोघांचे प्राण गेले आहेत. प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने हत्तींना नियंत्रित करण्यात वनविभागही हतबल ठरला. त्यामुळे जंगलात किंवा त्यालगत राहणाऱ्या गावांमधील नागरिक दहशतीत आहेत.
हत्तींचा समूह आला कोठून?
अभ्यासकांच्या मते या हत्तींचा मूळ अधिवास ओडिशातील आहे. त्या परिसरात खाणीची संख्या वाढल्याने अधिवास धोक्यात आला. त्यामुळे २०१३-१४च्या सुमारास हत्ती स्थलांतरित होऊ लागले. यापैकीच एक समूह ऑक्टोबर २०२१मध्ये छत्तीसगडमार्गे गडचिरोलीच्या जंगलात स्थिरावला. समूहात २३ हत्ती असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. तेथून तो लगतच्या भंडारा, गोंदिया जिल्ह्यात शिरतो. तेथे पाण्याचे साठे आणि खाद्य मुबलक असल्याने हा परिसर हत्तींच्या वास्तव्यासाठी अनुकूल आहे. त्यामुळेच एकदा येथून गेल्यानंतर हत्ती वर्षभरानंतर पुन्हा परतले.
लोकवस्त्यांमध्ये हत्ती शिरण्याची कारणे काय?
जंगलात ज्या परिसरात खाद्य आणि मुबलक पाणीसाठा आहे त्याच ठिकाणी हत्तीचा समूह मुक्कामी असतो. शिवाय त्यांना भातपीक आणि मोहफुलाचा गंध आकर्षित करतो. सोबतच गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश खेडी आणि तेथील शेती जंगलालगत आहे. या भागातील नागरिक दारू काढण्यासाठी मोहफुलाची साठवणूक करतात. त्याच्या वासामुळे हत्ती रात्रीच्या सुमारास गावात शिरतात.
गावकऱ्यांमध्ये दहशत का निर्माण झाली?
हत्ती गावात शिरताना त्यांच्या मार्गात येणारी शेती तुडवत जातात, त्यामुळे पिकांचे तसेच गावातील घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कोरची तालुक्यातील तलवारगड गावात हत्तीच्या समूहाने एका वृद्धाला ठार केले. आदिवासी वस्ती असलेल्या या गावात कार्यक्रम असल्याने मोठ्या प्रमाणात मोहफुले साठवून ठेवण्यात आली होती. ती सडवून त्यापासून दारू काढली जाणार होती. त्या फुलांच्या गंधामुळेच घटनेच्या दिवशी रात्री हत्ती गावात शिरले होते.
हत्ती नियंत्रणात वनविभाग अपयशी का ठरतो?
अभ्यासकांच्या मते, जवळपास २०० वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील दंडकारण्य भागात हत्तींचा वावर होता. त्यानंतर या भागात हत्ती आल्याची नोंद नाही. त्यामुळे वनविभाग या संकटाला तोंड देण्यास सक्षम नाही. हत्तीवर नियंत्रण कसे मिळवायचे याबाबत कर्मचाऱ्यांना कोणतेच प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. मागील वर्षभरापासून अचानक हत्तींचा समूह आल्याने त्यांचीही तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे टेंभे पेटवून, फटाके फोडून हत्तींना पळवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रभावित क्षेत्रात हत्तींना नियंत्रित करण्यासाठी पश्चिम बंगालमधून ‘हुल्ला’ पथकाला बोलावण्यात आले. मात्र, त्यांचे प्रयत्नही अपुरे पडत आहे.
प्रभावित क्षेत्रातील गावकऱ्यांचे म्हणणे काय?
ज्या परिसरात हत्तींचा वावर आहे, तो प्रामुख्याने सीमावर्ती भाग आहे. या भागात बहुतांश खेडी, घनदाट जंगल आहे. हत्तीचा उच्छाद वाढल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. जिवाच्या भीतीपोटी गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने पथक तैनात केले . पण अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे काय, हा प्रश्न कायम राहतो.
हेही वाचा : गोंदिया जिल्ह्यात रानटी हत्तींचा कळप पुन्हा परतला; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
हत्ती कायमस्वरूपी याच भागात स्थिरावले तर…?
तीन जिल्ह्यांतील सीमावर्ती भागात असलेल्या अनुकूल वातावरणामुळे हत्तींचा कळप या परिसरात कायमस्वरूपी मुक्कामी राहण्याची शक्यतादेखील अभ्यासकांनी वर्तवली आहे. असे झाल्यास नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नाचे प्रशासनापुढे नवे आव्हान उभे राहू शकते. त्यासाठी धोरण निश्चित करावे लागणार आहे.