Mudhol Hound Dogs in PM Modi Security : सध्या देशभरात कर्नाटकातील कुत्र्याच्या ‘मुधोळ हाऊंड’ या भारतीय प्रजातीची चर्चा आहे. याचं कारण या मुधोळ प्रजातीच्या कुत्र्याचा पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी खास स्थापन झालेल्या विशेष सुरक्षा पथकात (Special Protection Guard – SPG) समावेश झाला आहे. थेट देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कामात समावेश झाल्याने मुधोळ हाऊंड कुत्र्याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. मुधोळ हाऊंडची वैशिष्ट्ये काय? हा कुत्रा इतरांपेक्षा वेगळा कसा? अशी कोणती गुणवत्ता आहे की इतर कुत्र्याच्या प्रजातींना मागे टाकत मुधोळ हाऊंडचा एसपीजीत (SPG) समावेश झाला आहे, अशा अनेक प्रश्नांचा आढावा घेणारं हे विश्लेषण

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुधोळ हाऊंड कुत्र्याची चर्चा याआधी तेव्हा सुरू झाली जेव्हा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात या कुत्र्याचा उल्लेख केला. आता त्यांचा समावेश एसपीजीमध्ये झाल्याने ही चर्चा व्यापक स्तरावर होत आहे. मुधोळ हाऊंड शिकार आणि सुरक्षेसाठी ओळखला जातो. मोठं अंतर धावण्यासाठीही हे श्वान ओळखलं जातं. कुत्र्याची ही प्रजाती दिसायला किरकोळ, सडपातळ दिसत असली तरी त्यांच्यात हे श्वान अत्यंत चपळ असतात. त्यामुळेच अनेक स्तरांमधील चाचण्यांनंतर मुधोळ हाऊंडचा समावेश एसपीजीमध्ये झाला आहे.

मुधोळ हाऊंडची वैशिष्ट्ये काय?

मुधोळ हाऊंड श्वान दिसायला इतर कुत्र्यांपेक्षा लांब असते. मात्र, त्यांची हीच शरीररचना त्याला इतरांपेक्षा वेगळ बनवते. एसपीजीमध्ये समावेश होण्यात महत्त्वाचा ठरलेला या प्रजातीचा गूण म्हणजे याची स्फोटकांचा माग काढण्याची त्याची कमालीची शक्ती. हे श्वान मोठ्या अंतरावरील गंधही ओळखतं. याशिवाय डोळ्यांच्या रचनेमुळे त्याला मिळालेली तीक्ष्ण नजर आणि कमालीची उर्जा हेही काही गूण आहेत.

भारतीय सुरक्षा दलात मुधोळ हाऊंडचं स्थान काय?

मुधोळ हाऊंडचा याआधीच भारतीय सुरक्षा दलात समावेश झाला आहे. भारतीय सैन्य, सीआयएसएफ, एनएसजी आणि अगदी हवाई दलानेही या श्वानांना भरती केलं आहे. भारतीय सैन्याने २०१६ मध्ये या प्रजातीच्या काही पिलांना रिमाऊंट अँड वेटर्नरी कोअरमध्ये (RVC) भरती केलं होतं. विशेष म्हणजे यापूर्वी या ठिकाणी लॅब्राडोर आणि जर्मन शेफर्ड यासारख्या केवळ विदेशी प्रजातींनाच प्रशिक्षित केलं जात होतं. मात्र, मुधोळ हाऊंड पहिला भारतीय प्रजातीचं श्वान ठरलं, ज्याला या ठिकाणी प्रशिक्षणाची संधी मिळाली. याच ठिकाणी प्रशिक्षण घेऊन विविध प्रजातीचे श्वान सैन्यात भरती होतात.

श्वानाच्या या प्रजातीची आतापर्यंत कोठे-कोठे तैनाती?

आरव्हीसीने भरती केलेल्या मुधोळ हाऊंड श्वानांना प्रशिक्षणानंतर श्रीनगर मुख्यालय १५ कोअर आणि नगररोटा मुख्यालय १६ कोअर येथे तैनात करण्यात आलं होतं. तेथे त्यांना पुढील प्रशिक्षण देण्यात आलं. यात फिल्ड एव्हल्यूशन आणि सुटेबिलिटी ट्रायलचा समावेश होता. हवाई दलाने २०१७ मध्ये मुधोळ हाऊंडचा आपल्या सुरक्षा यंत्रणेत समावेश केला होता.

मुधोळ हाऊंड श्वानाचा इतिहास काय?

कर्नाटकमधील मुधोळ गावात या श्वानाचं संगोपन करण्यात येतं. या ठिकाणी जवळपास ७५० कुटुंब मुधोळ हाऊंडचं पालन करतात आणि मग त्याची विक्री केली जाते. सुरुवातीला आदिवासी हे कुत्रं पाळत होते. सर्वात आधी तत्कालीन मुधोळ प्रांताचे राजे मालोजीराव घोरपडे यांना आदिवासींकडे पाळलं जाणारं हे श्वान दिसलं. त्यांनी या प्रजातीची दखल घेत या कुत्र्यांचं पालन केलं. त्यावेळी त्यांनी याला ‘बेडर’ असं नाव दिलं.

हेही वाचा : विश्लेषण : ‘लूकआउट नोटीस’ म्हणजे काय? ती कोणाकडून कोणाला पाठवली जाते? याचा नेमका अर्थ काय?

विशेष म्हणजे मालोजीराव घोरपडेंनी १९०० च्या सुरुवातीला इंग्लंड दौऱ्यावर असताना याच श्वानाचे दोन पिलं किंग जॉर्ज पंचम यांना भेट दिली होती. नंतरच्या काळात याच मुधोळ राज्यावरून या श्वानाचं नाव मुधोळ हाऊंड असं पडलं.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained on karnatakas mudhol hounds dog who included in spg to protect pm pbs