– मंगल हनवते
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ भुयारी मार्गिकेचे बांधकाम सध्या वेगाने सुरू आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आरे कारशेडच्या कामालाही सुरुवात केली आहे. सीप्झ ते बीकेसी असा पहिला टप्पा २०२४मध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामास वेग देण्यात आला आहे. हे काम सुरू असतानाच आता एमएमआरसीने मेट्रो ३च्या विस्तारीकरणाच्या प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कफ परेड ते नेव्ही नगर अशा मेट्रो ३च्या विस्तारित मार्गिकेचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वर्षभरात बांधकाम निविदा निघण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हा विस्तार नेमका काय आणि त्याची गरज का, याचा आढावा.
मेट्रो वाहतुकीचा नवा पर्याय?
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रोचा पर्याय पुढे आणला. आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था पुरविणे आणि वेगवान प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएने मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे विणण्याचा प्रकल्प हाती घेतला. यातील मेट्रो १(घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा) आणि मेट्रो २ अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) मार्गिकेतील दहिसर ते आरे मार्गिका सेवेत आहे. त्याच वेळी सध्या मेट्रो २, ३, ४, ५, ६, ७ आणि ९चे काम सुरू असून लवकरच मेट्रो १० तसेच १२ या मार्गिकांचे काम लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. लोकलच्या गर्दीतून सुटका करणारा, आरामदायी प्रवास उपलब्ध करून देणारा आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असलेला हा प्रकल्प असल्याने मेट्रोकडे प्रवासी वळत आहेत. सध्या मर्यादित मार्गिका असल्याने प्रवासी संख्या कमी असून सेवेत असलेल्या मार्गिका तोट्यात आहेत. मात्र भविष्यात मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमीचे जाळे विणल्यानंतर मेट्रोला भरघोस प्रतिसाद मिळेल असा दावा करण्यात येत आहे. येत्या काळात मेट्रो हे महत्त्वाचे वाहतुकीचे साधन ठरेल असेही म्हटले जात आहे.
मेट्रो मार्गिकेचे विस्तारीकरण का?
एमएमआरडीएने ३३७ किमीच्या मेट्रो प्रकल्पांतर्गत १४ मेट्रो मार्गिका हाती घेतल्या आहेत. यातील एक मेट्रो मार्गिका पूर्णतः कार्यरत असून मेट्रो ७ आणि २ ब चा पहिला टप्पा सेवेत आहे. तसेच पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. हे काम करताना काही मेट्रो मार्गिका रेल्वे स्थानके, मोनो रेल्वे वा इतर काही परिसरांशी जोडण्याची गरज दिसून आली. त्यातूनच मेट्रो मार्गिकेचा विस्तार करण्याची संकल्पना पुढे आली. त्यानुसार एमएमआरडीएने काही मेट्रो मार्गिकांचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला. मेट्रो ४ (वडाळा ते कासारवडवली) या मार्गिकेचा कासारवडवली ते गायमुख असा विस्तार करण्यात येणार असून ही मार्गिका मेट्रो ४ अ नावाने ओळखली जाणार आहे. अन्य मार्गिकांचाही विस्तार करण्यात येणार असून भविष्यात विस्तारीकरण सुरूच राहणार आहे. यातीलच एक म्हणजे मेट्रो ३ मार्गिकेचे विस्तारीकरण. या विस्तारीकरणामुळे भविष्यात मेट्रोने मुंबई महानगर प्रदेशाच्या कोणत्याही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जात येणार आहे.
मेट्रो ३ प्रकल्प काय आहे?
सध्या सर्वाधिक वादग्रस्त आणि सर्वाधिक याचिका दाखल असलेला प्रकल्प म्हणून ओळख असलेला मेट्रो ३ हा प्रकल्प आहे. एमएमआरडीएच्या ३३७ किमीच्या मेट्रो प्रकल्पातील एक म्हणजे मेट्रो ३ प्रकल्प. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (एमएमआरसी) स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार एमएमआरसीच्या माध्यमातून प्रकल्पाचे काम पुढे जाते. कुलाबा-वांद्रे-सीप्झ अशी ३२.५ किमी लांबीची ही मार्गिका असून हा मुंबईतील पहिला पूर्णतः भुयारी मार्ग आहे. अंदाजे ३३ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातील भुयारीकरणाचे ९८.६० टक्के काम पूर्ण झाले आहे. स्थानकाचे आणि रुळाचे काम प्रगतीपथावर आहे. एमएमआरसीने सीप्झ ते बीकेसी असा मेट्रो ३ चा पहिला टप्पा २०२४ मध्ये सुरू करण्याचे नियोजन केले आहे. मात्र या प्रकल्पातील कारशेडचा प्रश्न मार्गी न लागल्याने प्रकल्प, पहिला टप्पा कसा पूर्ण होणार असा प्रश्न होता.
कांजूरमार्गच्या जागेचा वाद
न्यायालयात गेल्याने कारशेड रखडली होती. पण सत्तांतरानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कारशेड पुन्हा आरेत हलवली. ‘मेट्रो वुमन’ अशी ओळख मिळालेल्या अधिकारी अश्विनी भिडे यांची पुन्हा एमएमआरसीत नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आरेतील कामावरील स्थगिती मागे घेतली. त्यामुळे भिडे यांनी कारशेडच्या कामाला सुरुवात केली आहे. आंध्र प्रदेशातून पहिल्या मेट्रो गाडीचे डबे मुंबईत आणण्यास सुरुवात झाली आहे. एकूणच मेट्रो ३ प्रकल्प पुढे नेतानाच आता भिडे यांनी दुसरीकडे मेट्रो ३चा विस्तारही मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे.
मेट्रो ३ची धाव नेव्ही नगरपर्यंत?
मेट्रो ३चा विस्तार कफ परेड ते नेव्ही नगर असा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कफ परेड ते नेव्ही नगर असा अडीच किमीचा मेट्रो ३चा विस्तार करण्यात येणार आहे. कुलाबा, कफ परेड, नेव्ही नगर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यात नेव्ही नगरला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बेस्ट बस हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे मेट्रोचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, त्यासाठी मेट्रो३ चा विस्तार कफ परेड ते नेव्ही नगर असा करावा अशी मागणी नौदलाने केंद्र सरकारला दिली होती. या मागणीचा विचार राज्य सरकारने करावा अशी सूचना केंद्राने केली होती. ही सूचना मान्य करून राज्य सरकारने मेट्रो ३ नेव्ही नगरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार व्यवहार्यता अभ्यास पूर्ण केल्यानंतर प्रकल्प आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान २०२२-२३ च्या राज्याच्या अर्थसंकल्पात या विस्तारीकरणास हिरवा कंदील देण्यात आला.
प्रकल्प मार्गी कधी लागणार?
अर्थसंकल्पात कफ परेड ते नेव्ही नगर मेट्रो ३ ला मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाचा बृहत आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र हे काम काही मार्गी लागले नाही. आता भिडे यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेत मंगळवारी सल्लागाराच्या नियुक्तीसाठी निविदा मागविल्या आहेत. या निविदेनुसार सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासह पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन आणि सामाजिक प्रभाव मूल्यांकन अहवाल तयार करण्याची जबाबदारी सल्लागारावर असणार आहे. निविदेची प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतर आराखडा तयार करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी किमान वर्षभराचा काळ अपेक्षित आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास बांधकामासाठी निविदा मागविण्यात येतील. पुढील वर्षी म्हणजेच २०२३ अखेरीस या निविदा निघण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : आरेमधील मेट्रो कारशेडविरोधात वंचित मैदानात, आंदोलनाची घोषणा करत प्रकाश आंबेडकर म्हणाले…
नेव्ही नगरला जाणे सोपे होणार?
नेव्हीनगर हा परिसर नौदलाच्या अखत्यारीत येतो. नौदल, सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांचा निवास तळ या परिसरात आहे. मात्र याठिकाणी जाण्यासाठी बेस्ट बस हाच पर्याय आहे. मात्र आता भविष्यात मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे चर्चगेट किंवा कफ परेडवरून नेव्ही नगरला जाणे सहज सोपे होणार आहे. त्याचबरोबर भविष्यात सर्व मेट्रो मार्गिका एकमेकांशी जोडण्यात येतील. त्यामुळे मुंबईतील कोणत्याही ठिकाणावरून नेव्ही नगरला पोहचणे सोपे होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.