अभिनेते, खासदार अमोल कोल्हे यांनी एका चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका केल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा गदारोळ उठलेला दिसतो. नथुराम गोडसे यांच्याशी संबंधित विषयांवर आलेली नाटके, चित्रपट वा अन्य कोणत्याही माध्यमातील कलाकृती या कायम वादाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. या वादाच्या दोन महत्वाच्या बाजू आहेत. गोडसेंवरील कलाकृती ही एका अर्थी त्यांच्या विचारांचे पर्यायाने हिंसेचे समाजासमोर उदात्तीकरण ठरते ही एक भूमिका. तर त्यांच्यावरील कोणत्याही कलाकृतीला बंधन घालणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे ही दुसरी वादाची भूमिका. दरवेळी ‘गोडसे’ या नावाबरोबर दोन्ही बाजूने वाग्युद्ध लढले जाते, तरीही ‘गोडसे’ कलाकृतींमधून उमटत राहिले आहेत.
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’चा संघर्ष
महाराष्ट्राने ठळकपणे अनुभवलेला संघर्ष म्हणून प्रदीप दळवी लिखित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचा उल्लेख केला जातो. त्याआधी नथुराम यांचे बंधू गोपाळ गोडसेंनी लिहिलेल्या ‘गांधीहत्या आणि मी’ या पुस्तकावर तत्कालीन सरकारने बंदी घातली होती. या बंदीविरोधात ते न्यायालयात गेले आणि १९६८ साली या पुस्तकावरची बंदी उठवण्यात आली. त्यानंतर हिंदी आणि इंग्रजी भाषेतही हे पुस्तक प्रकाशित झाले.
गोपाळ गोडसे यांनी लिहिलेली पुस्तके आणि खुद्द नथुराम गोडसेंनी न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान दिलेले जबाब यांच्या आधारावर दळवींनी लिहिलेले नाटक १९९७ साली रंगभूमीवर आले. या नाटकाचे १३ यशस्वी प्रयोग झाले आणि वर्षभराने या नाटकावर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली. १९८८ साली लिहून तयार असलेल्या या नाटकाला त्यावेळी काँग्रेस पक्षाचे सरकार असल्याने सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळाले नव्हते. १९९८ साली महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते आणि केंद्रातही भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार असतानाही नाटकाला झालेल्या विरोधाची दखल सरकारला घ्यावी लागली.
हेही वाचा : “गांधींच्या हत्येचा कट सावरकरांच्या नेतृत्वाखाली”, सरदार पटेल यांचं नेहरूंना पत्र, ‘या’ नव्या पुस्तकात दावा
महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ठामपणे नाटकाच्या बाजूने उभे होते. मात्र काँग्रेसने त्याविरोधात आंदोलन सुरू केले. अखेर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे आला. गांधींबद्दल असलेल्या जनमानसातील भावना दुखावल्या जाऊ नयेत, हा मुद्दा अधोरेखित करत नाटकावर बंदी घालण्यात आली. या नाटकाला नंतरही प्रेक्षकांसमोर येण्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागली. २००१ मध्ये पुन्हा रंगभूमीवर आलेले नाटक विरोधामुळे दहा वर्षे बंद पडले. नाटकाच्या बसची जाळपोळ, नाट्यगृहांसमोर निदर्शने अशा संकटांचा सामना करत दहा वर्षांनी झालेला या नाटकाचा प्रयोगही पोलिसांच्या तैनातीत पार पडला होता.
आणखी एक नाटक, आणखी एक वाद
२०१६ मध्ये ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकात गोडसेची भूमिका करणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘हे राम नथुराम’ हे नाटक रंगभूमीवर आणले. पोंक्षेंनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले हे नाटक दोन वर्षे प्रयोग केल्यानंतर त्यांनीच थांबवले. याच अनुभवावर आधारित ‘मी आणि नथुराम’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तकही गेल्या वर्षी प्रकाशित झाले.
हेही वाचा : गांधीजींवर दोषारोप करून मोकळे होण्यापूर्वी…
‘गोडसे’ चित्रपटांवरून वाद…
गेल्या वर्षी गांधी जयंतीच्याच मुहूर्तावर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘गोडसे’ या चित्रपटाची घोषणा केली आणि पुन्हा एकदा उदात्तीकरण की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा वाद उफाळून आला. चित्रपटाच्या चित्रीकरणाला अजून सुरुवात झालेली नाही. त्याआधी २०२० मध्ये दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी आपल्या ‘द मॅन हु किल्ड गांधी’ या चित्रपटाची समाजमाध्यमांवरून घोषणा केली. त्यात त्यांनी गांधीजी आणि गोडसे यांचा अर्धा-अर्धा चेहरा एकत्रित घेऊन पोस्टर प्रदर्शित केले होते. त्यावेळीही गांधीजी आणि त्यांचा मारेकरी यांना एकत्र आणण्याच्या या प्रयत्नावर सडकून टीका करण्यात आली. या चित्रपटाची आता चर्चाही होत नाही.
वेबमालिका आणि ओटीटी…
तर दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या ‘गोडसे वर्सेस गांधी’ या वेबमालिकेला करोनाकाळात चित्रीकरण सुरू असताना विरोध करण्यात आला होता. ही वेबमालिका हिंदीतील प्रसिद्ध नाटककार असगर वजाहत यांच्या ‘गोडसे@गांधी डॉट कॉम’ या नाटकावर आधारित आहे.
हेही वाचा : Exclusive : “अमोल कोल्हेंना नथुराम आवडत असेल, आदर्श वाटत असेल तर…”, वादावर तुषार गांधींनी स्पष्टच सांगितलं
आता लाईमलाईट या ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरून गोडसे वाद सुरू झाला आहे. अर्थात, आताच्या वादाला अभिनेते अमोल कोल्हे यांचे राष्ट्रवादी पक्षातील स्थान जास्त कारणीभूत ठरले आहे. तरी येथेही पुन्हा एकदा नथुराम गोडसेंवरची कलाकृती म्हणजे त्यांचे उदात्तीकरण की अभिव्यक्ती स्वातंत्र्य?, कोणती भूमिका महत्वाची हा पेच निर्माण झाला आहे.