सिद्धार्थ खांडेकर
कसोटीपटू आणि माजी कर्णधार मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या ताज्या विधानामुळे नवीन चर्चेला तोंड फुटले आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन दौऱ्यात रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ०-१ अशा पिछाडीवरून येऊन २-१ असा अविस्मरणीय मालिका विजय मिळवला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिल्या कसोटीनंतर विराट कोहली मायदेशी परतला आणि उर्वरित मालिकेत रहाणेने नेतृत्व केले.
ऑस्ट्रेलियात रहाणेसमोर कोणती आव्हाने होती?
आव्हानांची मालिकाच रहाणेसमोर होती. अॅडलेडला झालेल्या पहिल्या कसोटीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला वर्चस्व गाजवूनही दुसऱ्या डावात ३६ धावांतच गारद झाल्यामुळे भारताचा दारुण पराभव झाला. त्या सामन्यानंतर विराट पितृत्वरजेवर भारतात परतला. मेलबर्न कसोटीमध्ये भारताचे तीन प्रमुख खेळाडू (विराट, रोहित, शमी) गैरजहजर होते. त्या कसोटीच्या आधी बहुतेक ऑस्ट्रेलियन आणि मायकेल वॉनसारख्या इंग्लिश माजी क्रिकेटपटूंनी भारत ही मालिका ०-४ अशी गमावणार वगैरे विधाने केली होती. मेलबर्न कसोटीनंतर सिडनी कसोटीमध्ये जसप्रीत बुमरा खेळू शकला नाही. प्रत्येक सामन्यात कोणी ना कोणी प्रमुख खेळाडू जायबंदी होत गेला. सिडनी कसोटीमध्ये मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला होता. प्रत्येक कसोटी नवीन आव्हाने घेऊन अवतरत होती.
मेलबर्न कसोटीतली रहाणेची ती खेळी…!
अॅडलेडमधील पराभवानंतर मेलबर्नला झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात ३ बाद ६४ अशी स्थिती असताना रहाणे फलंदाजीसाठी उतरला. त्याची खेळी पूर्णतः निर्दोष नव्हती. पण त्या ११२ धावांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण खेळीमुळे भारताला पहिल्या डावात १३१ धावांची आघाडी मिळाली. रवींद्र जडेजाबरोबर त्याने केलेली १२१ धावांची भागीदारीही मोलाची ठरली. मेलबर्नच्या कसोटीत भारताने ८ विकेट्सनी विजय मिळवला आणि मालिकेत भारताला १-१ अशी बरोबरी साधता आली. पण दडपणाखाली एखाद्या कर्णधाराने केलेल्या सर्वोत्तम खेळींपैकी ती एक असल्याचे मत इयन चॅपेल यांच्यासारख्या विख्यात माजी क्रिकेट कर्णधारांनी व्यक्त केले. यापूर्वी २००८मध्ये ग्रॅमी स्मिथने कर्णधार या नात्याने विजयात शतकी हातभार लावला होता. तेव्हा ही कामगिरी विशेषतः ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुर्मीळ मानावी अशीच.
रहाणेचे नेतृत्व
कर्णधार या नात्याने अजिंक्य रहाणेने अद्याप एकही कसोटी सामना गमावलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच भारतातील कसोटी मालिकेत धरमशाला येथे निर्णायक सामन्यात रहाणेच्या नेतृत्वाची चुणूक दिसून आली होती. अफगाणिस्तानविरुद्ध त्याच्या नेतृत्वाखाली सामना दोन दिवसांतच संपला. ऑस्ट्रेलियातील त्या मालिकेत त्याच्या नेतृत्वाखाली मेलबर्न, ब्रिस्बेन येथील सामने भारताने जिंकले, सिडनीतील कसोटी अनिर्णित राहिली. ५ कसोटी सामन्यांमध्ये ४ विजय आणि १ अनिर्णित अशी रहाणेची आजवरची कामगिरी आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा आणि आर. अश्विन या सिनियर सहकाऱ्यांसोबत वेळोवेळी चर्चा करून मैदानात मोक्याचे निर्णय घेतले. रहाणे क्वचितच दडपणाखाली येतो आणि त्याहून क्वचित तसे दर्शवतो. हा त्याचा नेतृत्वगुण त्याच्या सहकाऱ्यांवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो.
रहाणे काय म्हणाला? आताच हा विषय चर्चेत का आणला?
ड्रेसिंगरूममध्ये आणि मैदानावर मी काही निर्णय घेतले, ज्यांची मला कल्पना आहे. पण या निर्णयांबद्दल श्रेय दुसरे कोणी घेत राहिले. मी कधीही स्वतःकडे श्रेय घेणाऱ्यांपैकी नाही. मी कधीही माझ्या निर्णयांविषयी फार वाच्यताही करत नाही, तो माझा स्वभाव नाही. आपण मालिका जिंकली, हेच माझ्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचे आहे.
रहाणेचा रोख कोणाकडे?
रहाणेने कोणाचेच नाव घेतलेले नाही. विराट कोहली त्या मालिकेत पहिल्याच सामन्यात खेळला. शिवाय विराटविषयी रहाणेला नितांत आदर आहे आणि दोघांत मैत्रीपूर्ण संबंध आजही आहेत. रहाणेचा रोख इतर कोणापेक्षाही रवी शास्त्री यांच्याकडे असण्याची शक्यता सर्वाधिक. सहसा रहाणे कधीच वादग्रस्त विधाने करणाऱ्यांपैकी नाही. तरीही तो बोलला याची काही कारणे असू शकतील. ऑस्ट्रेलियातील मालिकेनंतर त्या वेळच्या संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मुलाखतींचा धडाका लावला. त्यात अनेकदा विराटच्या अनुपस्थितीत काही निर्णय माझ्या आग्रहास्तव कसे घेतले गेले याची जंत्री होती. शास्त्री नेहमीच मोकळेढाकळे वागणाऱ्यांपैकी असल्यामुळे हे घडले असावेच दुसरीकडे फॉर्म गमावल्यामुळे अजिंक्य रहाणेचे कसोटी संघातील स्थानही धोक्यात आलेले आहे. गेल्या १३ कसोटींमध्ये रहाणेला २०.८२च्या सरासरीने ४७९ धावाच जमवता आल्या आहेत. यात केवळ दोन अर्धशतकांचाच समावेश आहे. एरवी उच्चरवात माध्यमांसमोर श्रेय घेणाऱ्यांनी त्याच आवाजात आपली बाजूही मांडायला हवी होती, अशी रहाणेची खंत असू शकते.