जुन्नर वनक्षेत्रातून नुकताच कल्याण वनक्षेत्रात स्थलांतरित झालेल्या बिबट्याला रेडिओ कॉलर लावलेली असतानाही त्याचा काहीच थांगपत्ता लागला नाही. महाराष्ट्रात यापूर्वी उमरेड-करांडला अभयारण्यातील ‘जय’ वाघाला रेडिओ कॉलर लावण्यात आले होते, पण या वाघाचे गूढ आजही उलगडलेले नाही. तर मध्यप्रदेशात वाघाचे रेडिओ कॉलर ‘हॅक’ करण्यात आले. त्यामुळे लाखो रुपये खर्चून वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक यंत्रणेच्या मर्यादा या घटनांमुळे समोर आल्या आहेत. यातून वन्यप्राण्यांना असलेला शिकारीचा धोका अजूनही कमी झालेला नाही, हे देखील सपष्ट झाले आहे.
रेडिओ कॉलरचा वापर कसा केला जातो?
वन्यजीवांच्या सुरक्षेतील मानवी हस्तक्षेप कमी करुन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांच्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा म्हणजे रेडिओ कॉलर. वन्यजीवांचा अभ्यास, त्यांच्या भ्रमणमार्गाचा अभ्यास आणि त्यांची सुरक्षा यासाठी रेडिओ कॉलर लावली जाते. प्राण्यांच्या गळ्यामध्ये ती लावण्याआधी त्या प्राण्याला बेशुद्ध केले जाते. ‘जीएसएम’ किंवा ‘सॅटेलाईट’ या दोन माध्यमातून ती कार्यान्वित केली जाते. यातून तो प्राणी कुठे जातो, कोणत्या भ्रमणमार्गाचा वापर करतो, किती किलोमीटर चालतो या सर्वांची माहिती मिळते. प्रामुख्याने त्या प्राण्याच्या हालचालींवर लक्ष असल्याने शिकारीपासून त्याला रोखता येते. याच रेडिओ कॉलरमुळे हजारो किलोमीटरचे वाघांचे स्थलांतरणही समोर आले आहे.
रेडिओ कॉलरचे कोणकोणते प्रकार आहेत?
‘जीएसएम’ तंत्रज्ञानावर आधारित रेडिओ कॉलरचा वापर वन्यजीव संशोधनासाठी केला जातो. त्या ‘मोबाईल सेल्युलर नेटवर्क’च्या आधारे कार्यान्वित असतात. या माध्यमातून तो वन्यप्राणी नेमका कुठे आहे याची माहिती मिळते. तर ‘सॅटेलाईट’ तंत्रज्ञानावर आधारित कॉलर हे उपग्रहांशी जोडलेले असतात. हे रेडिओ कॉलर ज्या कंपनीचे असतात, त्यांचा उपग्रह अवकाशात असतो. वन्यप्राण्यांना रेडिओ कॉलर लावल्यानंतर आधी त्याचे ठिकाण म्हणजेच तो कोणत्या क्षेत्रात आहे याची माहिती उपग्रहाकडे जाते आणि सर्व्हरच्या माध्यमातून त्याचे जीपीएस लोकेशन रेडिओ कॉलर हाताळणाऱ्या संशोधकांपर्यंत पोहोचते. पूर्वी संगणकावरुनच रेडिओ कॉलर हाताळता येत होते, आता भ्रमणध्वनीवरही त्याची माहिती घेता येते. त्यासाठी दोन तास, चार तास अशी वेळेची मर्यादा बसवता येते.
रेडिओ कॉलरच्या मर्यादा काय आहेत?
‘जीएसएम’ आणि ‘सॅटेलाईट’ या दोन्ही रेडिओ कॉलरच्या वापराला मर्यादा आहेत. भारतात वन्यप्राण्यांसाठी रेडिओ कॉलरचा वापर वाढला असला, तरीही अजूनही भारतात रेडिओ कॉलर तयार केल्या जात नाहीत. त्यासाठी इतर देशांवरच अवलंबून राहावे लागते. विदेशातून त्या आयात कराव्या लागतात. रेडिओ कॉलर वापरताना भारतीय संचार मंत्रालयाची परवानगी आवश्यक असते. तसेच जंगलात नेटवर्क नसल्यामुळे ‘जीएसएम’ कॉलर प्रभावी ठरत नाही. अशावेळी ‘सॅटेलाईट’ कॉलर वापरावी लागते. ‘जीएसएम’ पेक्षा ‘सॅटेलाईट’ कॉलर महाग असतात. प्रत्येक प्राण्यांसाठी वेगवेगळ्या रेडिओ कॉलर असतात आणि प्राण्यानुसार त्या तयार केल्या जातात. १० ते २० हजारांपासून तर ५ ते १० लाख रुपयांपर्यंत त्याच्या किंमती असतात. त्या महाग असून खराब झाल्यानंतर दुरुस्तीच्या समस्या असतात.
हेही वाचा : सिंधुदुर्गात सापडलेल्या दुर्मिळ ब्लॅक पँथरसाठी थरारक ‘मिशन’, अखेर बछडं आणि आईची भेट
रेडिओ कॉलर किती काळ चालते?
वन्यप्राण्याला रेडिओ कॉलर लावताना आधी त्याला बेशुद्ध केले जाते. त्याच्या वयाचा विचार करुन रेडिओ कॉलर लावली जाते. बरेचदा रेडिओ कॉलरचा पट्टा गळून पडतो. रिमोटच्या सहाय्याने देखील ती गळ्यातून काढता येते. मात्र, बरेचदा वन्यप्राणी झाडांना, जमिनीवर मान घासत असल्यामुळे ती खराब होते. रेडिओ कॉलरमध्ये त्याची बॅटरी हा एक महत्त्वाचा भाग असतो, कारण त्या आधारावरच रेडिओ कॉलर काम करत असते. ही बॅटरी संपली, तर प्राण्याचा ठावठिकाणा लागत नाही. अनेकदा रेडिओ कॉलर चालत असली तरीही त्याचे सिग्नल मिळत नाही. या बॅटरीचे आयुष्य साधारण एक ते तीन वर्ष असते.