– ज्ञानेश भुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अननुभवी खेळाडू, देशातील यादवीचे संकट, पहिल्या सामन्यात झालेला पराभव अशा सगळ्या मानसिक दडपणातून जाणाऱ्या श्रीलंका संघाने तमाम क्रिकेट पंडितांचे अंदाज चुकवले. सरस सांघिक कामगिरी आणि प्रत्येक खेळाडूने विजयासाठी दाखवलेले मनोधैर्य यामुळे श्रीलंकेने थेट आशियाई विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी पाकिस्तानला निष्प्रभ केले. त्यांच्या या यशाचा घेतलेला आढावा.

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेच्या नागरिकांना मिळाले आनंदाचे क्षण…

श्रीलंका देश सध्या अराजकतेच्या संकटातून जात असताना त्यांच्या क्रिकेट संघाने मायदेशातील चाहत्यांना जल्लोषाची संधी दिली आहे. राजकीय गोंधळ, आर्थिक संकट अशा यादवीत अडकलेल्या श्रीलंकेला या स्पर्धेच्या यजमानपदावरही पाणी सोडावे लागले होते. ऐनवेळी स्पर्धा श्रीलंकेतून यूएईत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

श्रीलंकेतील नागरिक कमालीच्या हालअपेष्टा सहन करत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून श्रीलंका खेळाडू या स्पर्धेत खेळले. मायदेशातील या भयानक परिस्थितीचे दडपण त्यांनी मैदानात कुठेही दाखवून दिले नाही. कमालीच्या एकीने हा संघ स्पर्धेत खेळला. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट संघाचे हे विजेतेपद नक्कीच तेथील नागरिकांना एक वेळ आनंदाचा क्षण देणारे ठरले. कदाचित यामुळेच श्रीलंका संघाने हे विजेतेपद आपल्या देशवासियांना अर्पण केले.

श्रीलंकेची सरस सांघिक कामगिरी…

आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी श्रीलंका संघ जाहीर झाला, तेव्हा तो समतोल असल्याचे सांगितले गेले. मात्र, दरम्यानच्या काळात दुष्मंता चामीरा या त्यांच्या प्रमुख गोलंदाजाला दुखापत झाली. त्यामुळे त्यांच्या वेगवान गोलंदाजांच्या फळीत अनुभवाचा अभाव होता. फिरकी गोलंदाजी हे त्यांचे बलस्थान होते. त्यामुळे विश्लेषक श्रीलंकेच्या आव्हानाविषयी खात्री देण्यास तयार नव्हते. त्यात अफगाणिस्तानविरुद्धचा पहिलाच सामना ते हरले. त्यामुळे आणखीनच ते पसंती क्रमापासून दूर गेले. पण, त्यानंतर सलग पाच सामने जिंकून त्यांनी या सर्व जाणकारांचे अंदाज चुकवले.

अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवाचा वचपा त्यांनी केवळ त्यांना हरवून नाही, तर थेट विजेतेपदाने काढला. संभाव्य विजेतेपदावर आघाडीवर असणाऱ्या भारत आणि पाकिस्तानलाही त्यांनी हरवले. या कामगिरीने त्यांचा आत्मविश्वास दुणावला. हाच आत्मविश्वास त्यांनी अंतिम सामन्यात दाखवला.

अंतिम सामन्यात भानुका राजपक्षची खेळी ठरली निर्णायक…

दुबईच्या मैदानावर आतापर्यंत केवळ स्कॉटलंड आणि आयर्लंड हे दोनच संघ आव्हानाचा पाठलाग करताना हरले होते. यात आता पाकिस्तानचे नाव जोडले गेले. पाकिस्तानच्या फलंदाजांना जे जमले नाही, ते श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना दाखवून दिली. एकामागून एक धक्के बसत असताना भानुका राजपक्ष खंबीरपणे उभा राहिला.

एकवेळच्या ५ बाद ५८ अशा स्थितीत धावांचे शतकही अशक्य वाटत होते. तेव्हा वानिंदू हसरंगाने आक्रमक खेळायला सुरुवात केली. त्यावर राजपक्षने कळस चढवला. शेवटी त्याला दनुष्का करुणारत्नेचीही संयमी साथ मिळाली. यामुळे दुसऱ्या बाजूने राजपक्ष तुटून पडला. अखेरच्या चार षटकांत श्रीलंकेने ५० धावा कुटल्या. राजपक्षने ४५ चेंडूंत ७१ धावांचे बहुमोल योगदान दिले.

कर्णधाराचे अचूक निर्णय, गोलंदाजांची साथ आणि त्याला भक्कम क्षेत्ररक्षणाची जोड…

श्रीलंका संघाच्या आव्हानात राजपक्षच्या फटकेबाजीचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कर्णधाराच्या निर्णयांना प्रत्येक खेळाडूने उत्तम साथ दिली. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १७१ हे फार मोठे आव्हान नाही, हे लक्षात घेऊन प्रत्येक धाव वाचवण्यासाठी त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी मैदानावर अक्षरशः झोकून दिले होते. एकही झेल त्यांनी सोडला नाही. कर्णधार दसून शनाकाचे गोलंदाजीतील बदल महत्त्वाचे ठरले. वानिंदू हसरंगाला एका षटकात १४ धावा चोपल्यावर त्याने बदली गोलंदाज म्हणून धनंजय डिसिल्वाला षटक दिले. त्याने केवळ चार धावा दिल्या. त्यानंतर पाकिस्तानला सुरुवातीला धक्का देणाऱ्या प्रमोद मदुशनने इफ्तिकारला बाद केले.

लगेच शनाकाने पुन्हा हसरंगाला पाचारण केले. हसरंगाने त्या षटकात मोहम्मद रिझवान, असिफ अली, खुशदिल शाह यांना बाद केले आणि पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पाकिस्तानी फलंदाजांसमोरील आवश्यक धावगतीचे आव्हान वाढले, तेव्हा पाकिस्तानी फलंदाज मोठे फटके खेळणार हे गृहित धरून सर्व क्षेत्ररक्षक पांगवले. एकेरी-दुहेरी धावा काढून किती काढणार असा विचार करून पाकिस्तानी फलंदाजांनी मोठे फटके खेळले आणि ते बरोबर जाळ्यात अडकले. शनाकाची ही निर्णयक्षमता त्याच्यातील एका उत्तम कर्णधाराची चुणूक दाखवणारी ठरली.

हेही वाचा : PAK vs SL Asia Cup 2022 : पाकिस्तानला विजयाने दिली हुलकावणी, २३ धावांनी पराभव; आशिया चषकावर श्रीलंकेनं कोरलं नाव

प्रत्येक सामन्यात वेगळ्या खेळाडूंची चमकदार कामगिरी…

श्रीलंकेचा पहिला पराभव वगळता नंतरच्या प्रत्येक पाच सामन्यांत वेगवेगळ्या खेळाडूंनी आपले योगदान दिले. अंतिम सामना वगळता कुशल मेंडिस सलामीला लढवय्यासारखा लढला. त्याला पथुन निसंकाने प्रत्येक वेळेस साथ केली. या दोघांची सलामी निश्चित उर्वरित फलंदाजांना प्रेरणा देणारी ठरली. भारताविरुद्ध भानुका राजपक्षे आणि दसून शनाका चमकले. अफगाणिस्तानला हरवताना राजपक्षे खेळलाच. पण, त्याला दनुष्का गुणतिलकाची साथ मिळाली. गोलंदाजीत वानिंदू हसरंगाची फिरकी कमाल ठरली. दिल्शान मधुशंका, चामिका करुणारत्ने, प्रमोद मदुशान यांनी देखील आपला वाटा उचलला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained on success of sr lanka cricket team in asia cricket cup amid political crisis in country print exp pbs
Show comments