रशिया-युक्रेन युद्ध एका वेगळ्या वळणावर पोहचलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आता निकराच्या लढाईचे संकेत दिलेत. अशातच रशियासाठी महत्त्वाचा असलेला विजय दिवस अगदी काही दिवसांवर येऊ पोहचला आहे. रशियात ९ मे हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, यंदा हा दिवस युक्रेनसोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर साजरा केला जाणार आहे. याचा युक्रेन युद्धावर काय परिणाम होणार आणि पुतीन यांच्या निकराच्या लढाईचा नेमका अर्थ काय यावरील हे खास विश्लेषण…
सोव्हिएत युनियनने दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीला पराभूत केला तो दिवस म्हणजे ९ मे. हाच दिवस रशिया विजय दिवस म्हणून साजरा करते. सरकारी सुट्टी घोषित करून या दिवशी संपूर्ण रशियात सैन्य प्रात्यक्षिके आणि कवायती होतात. नागरिकही मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होतात. मात्र, यंदा या विजय दिवसाच्या साजरीकरणाला युक्रेनसोबतच्या युद्धाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे या दिवसाला वेगळ्या पद्धतीने वापरण्याचा रशियाकडून प्रयत्न केला जाऊ शकतो.
रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केल्यानंतर सुरू झालेल्या युद्धाला आता २ महिने लोटले आहेत. मात्र, ९ मे हा रशियाचा विजय दिवस या युद्धासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो, अशी भीती पाश्चिमात्य युद्ध जाणकारांकडून व्यक्त केली जातेय. आधीच हजारो जणांचे बळी घेणाऱ्या या युद्धाला ९ मेच्या पार्श्वभूमीवर अधिक हिंसक वळण लाभू शकते. आतापर्यंत रशियाने युक्रेनवरील हल्ल्याला विशेष सैन्य अभियानाचं नाव दिलंय. मात्र, विजय दिवसाच्या निमित्ताने रशिया युक्रेनसोबत संपूर्ण युद्धाची घोषणा करू शकतो. असं असलं तरी रशियाचे माध्यम सचिवांनी विजय दिनाच्या दिवशी युद्धाची घोषणा होण्याची शक्यता फेटाळली आहे.
मागील दोन दशकांपासून पुतीन यांनी रशियाच्या विजय दिवसाला अधिक महत्त्व देत त्याला मोठ्या राष्ट्रीय उत्सवाचं रूप दिलंय. पुतीन यांच्या कार्यकाळात विजय दिनी मोठ्या संख्येने रशियन नागरिक रस्त्यावर उतरतात. तसेच विविध कार्यक्रम आणि सैन्य कसरतींचा आनंद घेतात. अनेक रशियन नागरिक तर या दिवशी दुसऱ्या युद्धात मृत्यू झालेल्या आपल्या नातेवाईकांचा फोटो घेऊन या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षे विजय दिनाचा उत्सव साजरा करता आला नसला तरी सार्वजनिक वृत्तवाहिन्यांवर युद्धात मृत्यू पावलेल्या सैनिकांची नावं दाखवली जातात.
यंदाचा रशियाचा विजय दिवस वेगळा का?
मागील काही काळापासून पुतीन यांनी विजय दिवसाला एका पवित्र सणाचं स्वरुप दिलंय. तसेच या दिवशी वारंवार नव्या युद्धाचा इशारा दिलाय. मागील वर्षीच्या या दिवसाच्या भाषणात पुतीन यांनी रशियाचे शत्रू पुन्हा एकदा नाझी शक्तींच्या विचाराने वागत असल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे युक्रेनमध्ये घुसखोरी करताना देखील रशिया आणि पुतीन यांनी युक्रेनमधील नाझी शक्तींचा बिमोड करण्यासाठी सैन्य कारवाई करत असल्याचा दावा केला होता. मात्र, अनेक जाणकारांनी ही रशियाची युद्धाचा युक्तिवाद करण्याची रणनीती असल्याचं म्हटलं.
हेही वाचा : विश्लेषण : जगात कुठेही मारा करू शकेल असे रशियाचे आरएस – २८ सरमत क्षेपणास्त्र किती संहारक?
आता रशियाकडून यंदाचा ९ मेचा विजय दिवस आपला प्रपोगंडा पुढे रेटण्यासाठी वापर होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रशिया युक्रेन युद्धाला आणखी जीवघेणं रूप येण्याची शक्यता आहे.
पाश्चिमात्य देशांना काळजी का?
पाश्चिमात्य देशांना काळजी आहे की पुतीन ९ मे या विजय दिवसाचा वापर युक्रेन हल्ल्याची तीव्रता वाढवण्यासाठी आणि त्याला जनतेतून पाठिंबा मिळवण्यासाठी करू शकतात.