चीनने कायमच तैवान आपलाच भूभाग असल्याचा दावा करत तैवानवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, तैवानला अमेरिकेची कायमच साथ मिळत आलीय. त्यामुळेच तैवान आजही चीनच्या विविध दबावतंत्रानंतरही पाय रोवून उभा आहे. मात्र, नुकतीच अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांनी ४ ऑगस्टला तैवानला भेट दिली आणि चीनने तैवानच्या सीमेवर आक्रमक पवित्रा घेत युद्ध सराव सुरू केला. या पार्श्वभूमीवर युद्ध झाल्यास शक्तीशाली चीनसमोर तैवानचा कसा उभा राहणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, तैवानने चीनच्या कमतरतांचा अभ्यास करून त्यांना सडेतोड प्रत्युतर देण्याची एक खास रणनीति बनवल्याची चर्चा आहे. ही युद्धनीति नेमकी काय? याविषयी जाणून घेऊयात.
चीनने तैवानवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत युद्ध सुरू केलं तर त्या परिस्थितीत तैवानने देखील जोरदार तयारी केली आहे. यासाठी तैवानने २००८ मध्ये अमेरिकेच्या नौदल युद्ध संशोधन विभागाचे प्राध्यापक विलियम मुरे यांच्या युद्धनीतिचा वापर केल्याचं बोललं जातं. यानुसार शत्रूच्या शक्तीचा सामना करण्यापेक्षा त्यांच्या उणिवा शोधून त्यावर हल्ला करण्याची रणनीति आखली जाते. त्यामुळे तैवान देखील चीनच्या कमतरता शोधून त्यांचा वापर करून चीनला प्रत्युत्तर देण्याची रणनीती आखत असल्याचं सांगितलं जातं.
“हल्ला करा, नुकसान होईल, पण पराभव होणार नाही”
तैवानच्या या नीतितून शक्तीशाली शत्रूराष्ट्र हल्ला करू शकते, नुकसान करू शकते मात्र पराभव करू शकणार नाही, असंही जाणकार सांगत आहेत. असं असलं तरी या रणनीतिचा वापर करण्यासाठी तैवानला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागेल.
लंडनमधील ‘डिफेन्स स्टडिज डिपार्टमेंट ऑफ किंग्ज कॉलेज’चे प्राध्यापक डॉ. झेनो लिओनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तैवानच्या या युद्धनीतित तीन स्तर आहेत. सर्वात बाहेरील स्तरात शत्रूच्या सैन्याबाबत गुप्त माहिती संकलित करण्याचा समावेश आहे.
या रणनीतिचा दुसरा स्तरा म्हणजे समुद्रात ‘गोरिला’ पद्धतीने युद्ध करायचा. हे करताना समुद्रात लढणाऱ्यांना हवेतून वायूदलाचं संरक्षण ठेवायचं. यासाठी तैवानला अमेरिकेकडून खास विमानं उपलब्ध करून दिल्याचीही चर्चा आहे. यानंतर या रणनीतिचा सर्वात आतला स्तर म्हणजे तैवानची भौगोलिक रचना आणि प्रत्यक्ष युद्ध. याचा अवलंब करून तैवान चीनच्या बलाढ्य सैन्याला घुसखोरी करण्यापासून रोखू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
हेही वाचा : नॅन्सी पलोसी यांच्या तैवानभेटीचे परिणाम काय?
सर्वात बाहेरचा स्तर चीनकडून होणारे अचानक हल्ले रोखेल, दुसरा स्तर चीनच्या सैन्याला तैवानच्या जमिनीवर पायच ठेवू देणार नाही. या दुसऱ्या स्तरात गोरिला युद्ध, छोट्या जहाजांचा वापर करून हवेतून हेलिकॉप्टरची मदत घेत चीनच्या सैन्याला लक्ष्य करण्याच्या नीतिचा समावेश आहे. विशेष म्हणजे चीनने हे दोन्ही स्तर भेदून तैवानच्या जमिनीवर पाय ठेवला तरी तैवानची भौगोलिक रचना, तेथील डोंगररांगा आणि प्रतिकूल वातावरण यामुळे चीनच्या सैन्याला घुसखोरी अवघड होईल, असं डॉ. लिओनी यांनी नमूद केलंय.