केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना‘ हे पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाला नवी नावं आणि पक्षचिन्हं सुचवण्यास सांगितले. सोमवारी (१० ऑक्टोबर) दिवसभर आयोगासमोर झालेल्या सुनावणीत अखेर त्यावर निर्णय झाला. यानुसार ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे पक्षाचं नाव आणि ‘मशाल’ हे पक्षचिन्ह मंजूर झालं. मात्र, ठाकरे गटाने मागितलेलं ‘त्रिशूळ’ हे पक्षचिन्ह नाकारण्यात आलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानेही ‘त्रिशूळ’ या चिन्हाची मागणी केली होती. त्यांनाही ते नाकारण्यात आलं. निवडणूक आयोगाने हे चिन्ह का नाकारलं? त्यामागे नेमकी कारण काय? या प्रश्नांचा आढावा घेणारं हे विश्लेषण…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकरे गटाकडून कोणत्या नावांची आणि चिन्हांची मागणी?

‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेकडून (ठाकरे गट) रविवारी (९ ऑक्टोबर) त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या चिन्हांपैकी एकाची मागणी केली. याशिवाय शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना प्रबोधनकार ठाकरे या तीन पक्षाच्या नावांचा मागणी केली.

दुसरीकडे सोमवारी (१० ऑक्टोबर) शिंदे गटानेही त्रिशूळ आणि उगवता सूर्य या चिन्हांची मागणी केली होती. याशिवाय शिंदे गटाने पर्यायी पक्षाचं नाव म्हणून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची अशी तीन नावं दिली होती.

निवडणूक आयोगाने त्रिशूळ पक्षचिन्ह का नाकारलं?

केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह मंजूर केलं आहे. मात्र त्याचवेळी बंडखोर गटाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला कोणतेही निवडणूक चिन्ह देण्यात आलेलं नाही. उद्धव ठाकरे गटाने त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल या चिन्हांची यादी निवडणूक आयोगाकडे दिली होती. तर शिंदे गटाकडून त्रिशूळ, गदा, आणि उगवता सूर्य अशी तीन चिन्हं सुचवण्यात आली होती. मात्र या सहा चिन्हांपैकी केवळ एका चिन्हाला मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचा : ढाल तलवार, रेल्वे इंजिन, मशाल ते धनुष्यबाण…शिवसेनेच्या निवडणूक चिन्हांचा प्रवास

निवडणूक आयोगाने दोन्ही गटाच्या नेत्यांना वेगवेगळी पत्र पाठवून निवडणूक चिन्हं का नाकारण्यात आली आहेत याबद्दलची माहिती दिली. निवडणूक आयोगाने २३ सप्टेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या यादीमधील उपलब्ध निवडणूक चिन्हांच्या यादीमध्ये दोन्ही गटांकडून सुचवण्यात आलेल्या चिन्हांपैकी अनेक चिन्हांचा समावेश नव्हता, हे सर्वात महत्त्वाचं कारण ठरलं.

त्रिशूळ नाकारण्याची तीन कारणं

आयोगाने त्रिशूळ चिन्हं नाकारताना तीन कारणं सांगितली. त्यातील पहिलं कारणं या चिन्हाचा थेट धार्मिकबाबींशी संबंध आहे. त्यामुळे हे चिन्हं देणं निवडणूक चिन्हांसंदर्भातील नियमांचं उल्लंघन ठरेल. दुसरं कारण म्हणजे दोन्ही गटांकडून त्रिशूळ हे चिन्हं पहिली पसंती म्हणून मागणी झाली. तिसरं कारण म्हणजे हे चिन्ह आयोगाने जारी केलेल्या उपलब्ध चिन्हांच्या यादीत नाही.

उगवता सूर्य का नाकारला?

उगवता सूर्य हे चिन्ह आधीपासूनच द्रविड मुन्नेत्र काझिगम म्हणजेच डीएमके पक्षाची निशाणी आहे. हा पक्ष तामिळनाडूमधील आहे. १९६८ च्या निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे राज्य स्तरावरील इतर पक्षांसाठी राखीव चिन्हं दुसऱ्या पक्षांना देता येत नाहीत. तसेच या चिन्हाचीही त्रिशूळप्रमाणे दोन्ही गटांकडून मागणी करण्यात आल्याने ते कोणालाच देता येणार नाही असा निर्णय आयोगाने दिला.

हेही वाचा : विश्लेषण : शिंदे वि. ठाकरे… निवडणूक आयोगापुढील सुनावणीत काय होणार?

गदा पक्षचिन्ह का नाकारलं?

ठाकरे आणि शिंदे गटाने गदा या चिन्हाचीही मागणी केली होती. मात्र, त्रिशूळप्रमाणेच गदा हे चिन्हही धार्मिकबाबींशी संबंधित आहे. तसेच हे चिन्ह उपलब्ध चिन्हांच्या यादीत नाही, अशी दोन कारणं देत निवडणूक आयोगाने हे चिन्हही नाकारलं.

उद्धव यांना मशाल का दिली?

मशाल हे चिन्ह उपलब्ध चिन्हांच्या यादीत नाही. हे चिन्ह समता पक्षासाठी राखीव आहे. मात्र २००४ साली या पक्षाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. तुम्ही ९ ऑक्टोबर रोजी केलेल्या विनंतीनुसार निवडणूक आयोगाने मशाल या चिन्हाचा उपलब्ध चिन्हांमध्ये समावेश केला आहे. ते तुमच्या गटाला दिलं जात आहे, असं आयोगाने म्हटलं आहे.

हेही वाचा : Photos : आनंद दिघेंची संपत्ती कुणाच्या नावावर ते बापाला विकण्याचा आरोप, एकनाथ शिंदेंच्या भाषणातील २० महत्त्वाचे मुद्दे, वाचा…

नाव काय?

उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मंजूर करण्यात आलं. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मंजूर करण्यात आलं. दोन्ही गटांनी पहिली पसंती म्हणून ‘शिवसेना (बाळासाहेब ठाकरे)’ हे नावं सुचवलं होतं. मात्र दोन्हीकडून या नावाची मागणी झाल्याने दोन्ही गटांना दुसऱ्या पसंतीची नावं देण्यात आली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained on why election commission of india reject demand of trishul and other party symbol to uddhav thackeray eknath shinde pbs
Show comments