झारखंड, ओडिसा आणि आसामसह देशातील एकूण पाच राज्यांमधील आदिवासी वेगळ्या ‘सरना’ धर्माला मान्यता देण्याची आणि आगामी जनगणनेत त्यांचा समावेश या नव्या धर्मांतर्गतच करावी, अशी मागणी केली जात आहे. ही मागणी करताना आदिवासींचा धर्म, संस्कृती, प्रथा-परंपरा वेगळ्या असल्याचा आणि त्याला सरकारने मान्यता द्यावा, असा युक्तिवाद केला जात आहे. आदिवासींना इतर धर्मांचं पालन करण्यासाठी दिशाभूल केली जात असल्याचाही आरोप केला जात आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? हा धर्म काय आहे? अशा अनेक प्रश्नांचे विश्लेषण.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदिवासी नेत्या सल्खन मुर्मू यांनी पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे, “आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन. आमची जगण्याची स्वतंत्र पद्धत, प्रथा-पंरपरा, संस्कृती आणि धार्मिक विचार आहे. हे सर्व इतर धर्मांपेक्षा वेगळं आहे. आम्ही मूर्तीची पूजा करत नाहीत, तर निसर्गाची पूजा करतो. आदिवासी समाजात वर्ण व्यवस्था किंवा विषमता नाही.”

सरना धर्म काय आहे?

सरना धर्मात विश्वास असणारे लोक निसर्गाचे पूजक असतात. ते जल, जंगल आणि जमीन याची उपासना आणि संरक्षण करतात. त्यामुळेच ते झाडं, डोंगर यांची पूजा करतात. तसेच जंगलाच्या परिसराचं संरक्षण करण्याचंही काम करतात. झारखंडमध्ये एकूण ३२ आदिवासी समूह आहेत. यातील ८ समूह तर लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. यातील अनेकजण हिंदू धर्म पाळतात, तर काही लोक ख्रिश्चन धर्मात गेले आहेत. यानंतरच आदिवासी समुहात आपली धार्मिक ओळख जपण्याची चळवळ सुरू झाली. ते वेगळ्या धर्माच्या कायद्याची आणि त्यानुसारच आगामी जनगणना करण्याची मागणी करत आहेत.

विशेष म्हणजे सरना धर्माला कायदेशीर मान्यता नसताना देखील २०११ च्या जनगणनेत ५० लाख लोकांनी आपली धार्मिक ओळख सरना धर्म म्हणून सांगितली होती, असे रिपोर्ट्स समोर आले आहेत.

सरना धर्माच्या चळवळीचा इतिहास

नोव्हेंबर २०२० मध्ये झारखंड सरकारने ठराव संमत करत केंद्र सरकारकडे सरना धर्माचा वेगळा कायदा करण्याची आणि त्याचा पुढील जनगणनेत समावेश करण्याची मागणी केली होती. झारखंडमध्ये आदिवासींची लोकसंख्या घटताना दिसत आहे. १९३१ मध्ये राज्यात आदिवासींची लोकसंख्या ३८.३ टक्के होती, ती २०११ मध्ये २६.०२ टक्के झाली. काम किंवा नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेलेल्या आदिवासींची इतर राज्यांमध्ये आदिवासी म्हणून जनगणना होत नाही, असाही यामागे युक्तिवाद केला जातो. तसेच सरना धर्माचा कायदा झाल्यास या सर्वांना उपयोग होईल, असंही सांगितलं जातं.

हेही वाचा : विश्लेषण : धर्म केव्हा अस्तित्वात आला? तुर्कस्तानमधील उत्खननात मिळाले पुरावे?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्था संघटना आदिवासींना झारखंडमध्ये हिंदू म्हणून मोजण्याची मागणी करत आहेत. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी ख्रिश्चन धर्मप्रचारकांनी गरीब आदिवासींना इंग्रजी शिक्षण, नोकरी व आरोग्य सुविधांचं प्रलोभन देऊन धर्मांतरण करून घेतलं. त्यानंतर आता हिंदू धर्मातील काही गटही अशीच पद्धत वापरत आहेत. अशातच आता आदिवासींमधून स्वतंत्र धर्माची मागणी होत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained on why tribal demanding separate sarna religion for next census pbs