७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलच्या हद्दीत अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले करत १२०० इस्रायलींना ठार केले. कित्येकांचे अपहरण केले. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने १३ ऑक्टोबर रोजी सुरू केलेल्या कारवाईनंतर या संघर्षाची व्याप्ती कितीतरी अधिक वाढली आहे. आता तो इस्रायल आणि इराण यांच्यातील संभाव्य लढाईपर्यंत पोहोचला आहे. यामुळे संपूर्ण पश्चिम आशियात युद्धाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता असून, जागतिक राजकारण आणि अर्थकारणावर दूरगामी परिणाम संभवतात.
इस्रायल-हमास संघर्षाची सद्यःस्थिती काय?
हमास नेता याह्या सिनवार याच्या आग्रहाखातर, इस्रायलींना धडा शिकवण्याच्या उद्देशाने हमासने इस्रायली हद्दीत घुसून ७ ऑक्टोबर रोजी अनेक भागांमध्ये हल्ले केले. यात जवळपास १२०० इस्रायली मरण पावले. इस्रायलच्या इतिहासातील हा सर्वांत भीषण हल्ला ठरला. इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत गाझा पट्टीवर अक्षरशः दिवसरात्र आग ओकली. यात जवळपास ४२ हजार पॅलेस्टिनींचा – ज्यात इस्रायलच्या मते १७ हजार हमासचे दहशतवादी होते – मृत्यू झाला. पॅलेस्टाइनच्या इतिहासातील ती सर्वांत भीषण मनुष्यहानी ठरली. याशिवाय दोन तृतियांश पॅलेस्टिनी निर्वासित झाले असून, अपरिमित वित्तहानी झाली आहे. हमासने अपहरण केलेल्या जवळपास २५० इस्रायलींपैकी ७० जणांचा मृत्यू झाला, ११७ जणांची सुटका झाली आणि ६४ अजूनही हमासच्या ताब्यात आहेत. हमासचे नुकसान झालेले असले, तरी त्यांनी शरणागती पत्करलेली नाही. तसेच, याह्या सिनवारसारखे काही नेते अद्याप गाझातील भूमिगत भुयारांमध्ये वस्ती करून संघर्षाची सूत्रे हलवत आहेत.
इराणचा सहभाग…
इराण आजवर अॅक्सिस ऑफ रेझिस्टन्सच्या माध्यमातून (प्रतिरोध अध्यक्ष) म्हणजे हमास, हेझबोला आणि हुथी या दहशतवादी आणि बंडखोर संघटनांना सक्रिय पाठिंबा देऊन इस्रायलच्या विरोधात लढत होता. पण या वर्षी १३ एप्रिल रोजी इराणने प्रथमच इस्रायली भूमीवर ड्रोन हल्ला केला. दोघांमध्ये थेट लढाईची ती नांदी ठरते. याशिवाय १ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा इस्रायलवर इराणने १८० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. इस्रायल कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रत्युत्त देणार हे निश्चित. यात इराणच्या तेल संकुलांवर हल्ला करायचा, की अणुभट्ट्यांना लक्ष्य करायचे याविषयी इस्रायली नेतृत्वाचा विचारविनिमय सुरू आहे. पण हा हल्ला केव्हाही होऊ शकतो, असे बोलले जाते.
इराणसमर्थित संघटना खिळखिळ्या…
हमासचा इस्मायल हानिये, हेझबोलाचे हसन नासरल्ला, फुआद शुक्र असे बडे नेते इस्रायलने ठार केले. याशिवाय इराणच्या काही जनरलनाही संपवले. येमेनमध्ये मध्यंतरी तेथील हुथी बंडखोरांच्या तळांवर इस्रायलने हल्ले केले. तर इस्रायलच्या समर्थनार्थ नुकतेच अमेरिका आणि ब्रिटनच्या लढाऊ विमानांनीही तेथे हल्ले केले. हेझबोला आणि हमास या संघटनांची लष्करी ताकद इस्रायलने जवळपास पूर्ण खिळखिळी केलेली आहे. हुथींनाही इस्रायलच्या आक्रमक पवित्र्यामुळे फार कुरापती काढता येत नाहीयेत. हमास, हेझबोला आणि हुथी या इराणच्या अॅक्सिस ऑफ रेझिस्टन्सला अशा प्रकारे इस्रायलने नेस्तनाबूत केलेले दिसते. त्यामुळेच इराण अस्वस्थ झालेला आहे.
हेही वाचा >>>अखेर मुंबईकरांना घडणार भुयारी मेट्रोचा प्रवास… कशी आहे आरे – बीकेसी मेट्रो मार्गिका?
‘फॉरेव्हर वॉर’ला इस्रायली जनता कंटाळली?
इस्रायलने रणांगणात काही मोक्याचे विजय मिळलेले असले, तरी सतत क्षेपणास्त्र आणि दहशतवादी हल्ल्यांच्या भयाखाली राहून इस्रायली जनता युद्धजन्य परिस्थितीला कंटाळल्याची स्पष्ट चिन्हे आहेत. पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहूंनी दरवेळी वाटाघाटी आणि तोडग्याच्या प्रयत्नांना सुरुंग लावला. हे त्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी केल्याची भावना इस्रायलमध्ये प्रबळ होऊ लागली आहे. गोलन टेकड्यांच्या परिसरात हेझबोलाच्या संशयित हल्ल्यात १२ इस्रायली मुले दगावली. हुथींच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात तेल अवीवमध्ये एकाचा मृत्यू झाला. शिवाय लष्करी कारवाईदरम्यान इस्रायली ओलिसांच्या बाबतीत पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळे अनेक जण दगावल्याबद्दल त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे इराणचे अनेक शत्रू नामोहरम होत असले, तरी ‘फॉरेव्हर वॉर’ला इस्रायली जनताही विटल्याच्या खुणा दिसू लागल्या आहेत.
अरब देशांची तटस्थ भूमिका…
पॅलेस्टिनींना नैतिक आणि आर्थिक पाठिंबा देणाऱ्या बहुतेक सर्व प्रमुख अरब देशांनी इस्रायलच्या कारवाईबद्दल निषेध व्यक्त केला असला, तरी त्यापलीकडे इस्रायलविरोधी भूमिका घेतलेली नाही. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती आजही इस्रायलशी व्यवहार करत आहेत. इजिप्त, कतार हे अरब देश हमास-इस्रायलदरम्यान तोडग्यासाठी आजही प्रयत्न करत आहेत. बहुधा या संघर्षात इराण आणि इराण-समर्थित प्राधान्याने शिया बंडखोरांचे नुकसान होत असल्यामुळे सुन्नी अरबांना फार तक्रार करण्याची गरज भासलेली नाही. इराण, सीरिया, लेबनॉन या शियाबहुल देशांमध्ये इस्रायलच्या विद्यमान किंवा संभाव्य कारवायांना त्यामुळेच अरब देशांनी कोणताही विरोध केलेला नाही.
अमेरिकेत डेमोक्रॅट्सची राजकीय पंचाईत
या सर्व साठमारीत अमेरिकेची आणि विशेषतः डेमोक्रॅट्सची राजकीय पंचाईत होण्याची शक्यता आहे. अध्यक्ष जो बायडेन यांनी अनेकदा नेतान्याहू यांना युद्धखोरीबद्दल कानपिचक्या दिल्या आहेत. तर डेमोक्रॅटिक पक्षाने गाझातील हजारो पॅलेस्टिनींच्या संरक्षणासाठी पुरेशी पावले उचलली नाहीत, याबद्दल अमेरिकेतील मुस्लिम मतदार नाराज आहेत. याचे प्रतिबिंब तेथील अनेक विद्यापीठांमध्ये झालेल्या उग्र आंदोलनांमध्ये उमटले. माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार उघडपणे नेतान्याहूंची बाजू घेतात, त्यामुळे येहुदी मतदार मोठ्या संख्येने त्या पक्षाकडे झुकतील अशी आणखी एक भीती डेमोक्रॅट्सना वाटते. त्यामुळे नेतान्याहू यांना किती प्रमाणात वेसण घालायचे आणि त्यांच्या संभाव्य इराणविरोधी कारवाईस किती पाठिंबा द्यायचा या कोंडीत बायडेन प्रशासन सापडले आहे.
संघर्ष आणखी भडकण्याची शक्यता किती?
इराणवर कोणत्याही परिस्थितीत हल्ला करण्याची तयारी इस्रायलने केली आहे. हा हल्ला तेथील तेल संकुलांवर होईल की अणुभट्ट्यांवर होईल, याविषयी निर्णय होत नाही. अनेक विश्लेषकांच्या मते हा हल्ला बराचसा प्रतीकात्मक असेल. कारण हल्ल्यात मनुष्यहानी झाली, तर इराणकडूनही हल्ले सुरू होतील आणि दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकेल. पश्चिम आशियातील खनिज तेल प्रकल्पांचे प्रमाण, तेथे असलेले अनेक मोक्याचे सागरी व्यापारी मार्ग यांचे जाळे पाहता, असा संघर्ष भडकणे जगालाच परवडण्यासारखे नाही.